नेपाळला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी देशभरात मोर्चे !

नेपाळसह भारतामध्येही ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना व्हावी, यासाठी आता केंद्रातील भाजप शासनाने प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पोखरा शहरात २५ नोव्हेंबर या दिवशी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी २० हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये २० सहस्र हिंदू सहभागी झाले होते. अशा प्रकारचे मोर्चे देशात विविध ठिकाणी होत असल्याची माहिती नेपाळी प्रसारमाध्यमांकडून समोर येत आहे. नेपाळी हिंदूंचा विश्‍वास आहे की, पुढील ५ ते ६ मासांमध्ये हिंदु राष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. २८ नोव्हेंबर या दिवशी नेपाळगुंज येथे अशाच प्रकारचा मोर्चा काढण्यात आला, तर ४ डिसेंबरला नेपाळची राजधानी काठमांडू येथे असा मोर्चा काढण्यात येणार आहे. अशा प्रकारचे मोर्चे हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत देशभरात काढण्यात येणार आहेत, असे मोर्च्यांचे आयोजन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घोषित केले आहे.