सिंधुदुर्गात १ डिसेंबरपासून क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहीम

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – समाजातील क्षयरोग आणि कुष्ठरोग रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांच्यावर औषधोपचार करणे, संसर्गाची साखळी खंडित करून प्रचार रोखणे, समाजामध्ये या दोन्ही रोगांविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, या उद्देशाने जिल्ह्यात १ ते १६ डिसेंबर २०२० या कालावधीत क्षयरोग आणि कुष्ठरोग यांच्या रुग्णांची शोधमोहीम राबवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ही मोहीम राबवण्याकरता ७ लाख ३४ सहस्र ३१४ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण ‘आशा’ स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या पथकाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी ८१४ पथके नेमण्यात आली आहेत. गृहभेटीमध्ये कुटुंबातील सदस्यांची तपासणी स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत तपासणीसाठी येणार्‍या स्वयंसेवकांना सहकार्य करून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन साहाय्यक संचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी केले आहे.