अवाजवी वीजदेयकांच्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारने नोंद न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी

जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला मनसेचा मोर्चा

ओरोस – शासनाने केलेल्या वीज दरवाढीच्या विरोधात आणि अवाजवी आलेली वीजदेयके माफ करावीत, या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल मासापासून कडक दळणवळण बंदीमुळे नागरिकांची मोठी हानी झाली आहे. उद्योग, व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेकांनी नोकर्‍या गमावल्या आहेत, तर दुसर्‍या बाजूने कोरोना आजाराची भीती आणि ठप्प झालेले अर्थकारण यांच्या विरोधात जनता लढा देत आहे. असे असतांना महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना अवाजवी वीजदेयके देऊन झटका दिला आहे. त्यातच वीजदेयके न भरल्यास वीजजोडणी तोडण्याची चेतावणी दिली गेल्याने जनतेमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत. या भावना सरकारपर्यंत पोचवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.

 ‘वीजदेयके न भरल्याने वीजजोडणी तोडण्यास वीज कर्मचारी आलेच, तर मनसेशी संपर्क साधा. या मोर्चाने सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.