पणजी – पर्यावरण आणि गोमंतकियांचे हित यांच्यासाठी राज्यातील ३ महत्त्वाकांक्षी प्रकल्प रहित करण्याच्या मागणीवरून ‘गोयांत कोळसो नाका’ या अशासकीय संघटनेने राज्य मंत्रीमंडळ बैठक चालू असतांना सचिवालयावर मोर्चा नेला. शासनाने हे तीनही प्रकल्प त्वरित रहित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची चेतावणी या वेळी देण्यात आली.
‘गोयांत कोळसो नाका’ संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘शासनाला अखेरची चेतावणी देत आहे. यानंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. रेल्वे दुपदरीकरणासाठीची भूमी रेल्वे कायद्यान्वये घेण्यात आली होती का ? पंचायत कायदा आणि रेल्वे कायदा यांच्यामध्ये सर्वांत श्रेष्ठ कोणता कायदा आहे ? राज्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना विरोध करणार्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची चेतावणी नुकतीच दिली आहे. पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना हे भाजपचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत आहेत.’’ ‘गोयांत कोळसो नाका’ संघटनेने या वेळी संघटनेच्या मागण्यांचे एक निवेदन शासनाला दिले. संघटनेच्या या आंदोलनाला गोवा आणि गोव्याबाहेरील मिळून एकूण १६२ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.