सिंधुदुर्गातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ९६६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्रीमंडळाची मान्यता

उद्धव ठाकरे

सिंधुदुर्ग – ओरोस येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठीच्या खर्चाचा ९६६ कोटी ८ लाख रुपयांचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण या दोन्ही विभागांच्या माध्यमातून  सादर करण्यात आला. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. याविषयी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

या वेळी परिवहनमंत्री अनिल परब, ऊर्जामंत्री नितीन राऊत, कृषीमंत्री दादा भुसे आणि शिवसेना नेते संदेश पारकर उपस्थित होते. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी ४ वर्षांच्या टप्प्यात ५७२ कोटी रुपये, महाविद्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांसाठी ११८ कोटी ५५ लाख, रुग्णालयीन अधिकारी अन् कर्मचारी यांसाठी १०९ कोटी १९ लाख, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांसाठी १२० कोटी, आवर्ती खर्च ३१ कोटी ३ लाख, बाह्मस्रोत खर्च १५ कोटी ३१ लाख रुपये, अशा एकूण ९६६ कोटी ८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव ‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या मान्यतेसाठी लवकरच सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.