भगवान नटराजाला शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर नृत्याचा सराव करतांना आणि स्पर्धेत नृत्य करतांना रत्नागिरी येथील कु. अपाला औंधकर यांना आलेल्या अनुभूती

​‘दळणवळण बंदीमुळे आमचा नृत्यवर्ग सध्या बंद आहे. ‘वर्गातील मुलींचे नृत्यात सातत्य असावे’, यासाठी आमच्या नृत्यशिक्षिकेने ‘जागतिक नृत्यदिना’निमित्त आमच्या नृत्यवर्गातील मुलींची दोन गटांत नृत्यस्पर्धा आयोजित केली होती.

त्यांनी आम्हाला भगवान नटराज शंकराच्या . . .

‘आङ्गिकं भुवनं यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् ।                                
आहार्य चन्द्रतारादि तं नुमः सात्त्विकं शिवम् ॥’

– अभिनयदर्पण, श्‍लोक १

अर्थ : संपूर्ण विश्‍व हेच ज्याचे शरीर आहे, सर्व भाषा हीच ज्याची वाणी आहे आणि चंद्र, सूर्य अन् तारे हेच ज्याचे अलंकार आहेत, अशा सात्त्विक शिवाच्या चरणी मी वंदन करतो.

 . . . ​या १ मिनिट २० सेकंदाच्या श्‍लोकावर नृत्य सादर करायला सांगितले होते. मीही त्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याविषयी मला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

१. मृदंगाच्या बोलावर नृत्य करणे कठीण वाटणे आणि नटराजाला प्रार्थना केल्यावर ते बोल समजण्यास सोपे जाणे

कु. अपाला औंधकर

मी प्रथम तो श्‍लोक ऐकला. त्या वेळी एक वेगळाच मृदंगाचा नाद मला ऐकू येऊ लागला. ‘तो नाद वेगळ्याच लोकात आहे’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली. ‘त्या मृदंगाच्या बोलावर नृत्य करणे पुष्कळ कठीण होते. मला त्यावर नृत्य करायला जमेल का ?’, असा विचार माझ्या मनात आला आणि मला रडू आले. त्या वेळी ‘हे नटराजा, मी तुम्हाला संपूर्ण शरण आले आहे. तुम्हीच मला नृत्यकला शिकवत आहात. त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. हे मृदंगाचे बोल मला समजण्यास कठीण जात आहेत, तुम्हीच मला ते शिकवा’, अशी मी शंकराला प्रार्थना केली आणि नृत्य सराव चालू केला. नंतर ते बोल ४ – ५ वेळा ऐकल्यावर मला थोडे समजू लागले. तेव्हा पुन्हा मी नटराजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

२. नृत्याचा सराव करतांना ‘भगवान शंकरासमोर नृत्य करत आहे’, असे वाटणे

माझे २ दिवसांत त्या श्‍लोकावर नृत्य बसले. ‘त्या श्‍लोकावर नृत्य कधी आणि कसे बसले ?’, ते मला कळलेच नाही. नृत्याचा सराव करतांना मी ‘भगवान शंकरासमोर नृत्य करत आहे’, असेच मला वाटत होते. या श्‍लोकात भगवान शंकराचे वर्णन केल्याप्रमाणे मी भावपूर्ण नृत्य करण्याचा प्रयत्न करत होते.

३. स्पर्धेसाठी नृत्याचे चित्रीकरण करतांना ‘कैलासात नृत्य करत असून गंधर्व श्‍लोक गात आहेत’, असे वाटणे

स्पर्धेसाठी नृत्याचे चित्रीकरण करतांना ‘मी कैलासात नृत्य करत आहे आणि गंधर्व श्‍लोक गात असून मी नृत्य करून भगवान शंकरांना प्रसन्न करत आहे’, असे मला वाटले. नंतर ‘शंकर तांडव नृत्य करत आहे’, असे मला वाटले. शेवटी मी त्याच्यासमोर पूर्णपणे नतमस्तक झाले.

४. स्पर्धेत प्रथम क्रमांक येणे

माझा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याचे मला समजले. तेव्हा ‘हे नृत्य मी केले नसून परात्पर गुरु डॉक्टरांनीच माझ्याकडून नृत्य करून घेतले’, असे मला वाटले आणि माझी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

​हे गुरुदेवा, याआधी मी जेव्हा स्पर्धेत भाग घ्यायचे, तेव्हा माझी स्पर्धात्मक वृत्ती होती. तेव्हा ‘माझ्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत नसल्याने नृत्यातून माझी साधना होत नव्हती’, हे आता माझ्या लक्षात आले. या वेळी माझ्याकडून सातत्याने प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त झाल्याने तुम्हीच माझ्याकडून नृत्य करवून घेतले अन् मला नृत्यातून भाव अनुभवता आला. त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अपाला अमित औंधकर, रत्नागिरी (२७.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक