१. ‘सद्गुरु पिंगळेकाका ईश्वराशी एकरूप झाले आहेत’, याची जाणीव होणे
‘वर्ष २०१९ मध्ये रामनाथी (गोवा) येथे होणार्या अष्टम अखिल भारतीय हिंदु-राष्ट्र अधिवेशनासाठी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे रामनाथी आश्रमात आले होते. तेव्हा त्यांना रामनाथी आश्रम दाखवण्याची सेवा मला मिळाली होती. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
मी सद्गुरु पिंगळेकाका यांना प्रथम नूतनीकरण झालेल्या दैनिक कार्यालयात नेले होते. तेव्हा त्यांनी तेथील प्रत्येक साधकाला अत्यंत नम्रपणे नमस्कार केला आणि दैनिक कार्यालयातील चैतन्य पाहून ते म्हणाले, ‘‘येथील साधकांनी केलेल्या कष्टाची ही फलश्रुती आहे. प्रत्येक साधक हा राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी सक्षम बनला आहे.’’ साधकांशी अनौपचारिक बोलतांना साधक त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही आश्रमात १ वर्षानी आलात ना ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘जसे देवाचे १ वर्ष, म्हणजे १ दिवस असतो, तसे ‘मलाही १ दिवसच झाला आहे’, असे वाटते.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘ते ईश्वराशी किती एकरूप झाले आहेत !’, हे लक्षात आले. ‘अशा थोर संतांचा देवाने आपल्याला सत्संग आणि सहवास दिला’, याची जाणीव होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
२. नम्रता आणि इतरांचा विचार करणे
नंतर आम्ही कमलपीठ पहाण्यासाठी जात होतो. तेव्हा वाटेत सद्गुरु काकांना अनेक साधक भेटत होते. त्या सर्वांना ते प्रेमाने प्रतिसाद देत होते आणि माझा अधिक वेळ जायला नको; म्हणून ते ‘आश्रम बघणे चालू आहे’, असे नम्रपणे साधकांना सांगत होते.
३. सतत ईश्वरी चिंतनात रममाण असणारे सद्गुरु पिंगळेकाका !
सद्गुरु पिंगळेकाका कमलपिठाचे दर्शन घेत होते. तेव्हा तेथील काही कमळे पूर्णपणे उमललेली नव्हती. तेथील कमळाची कळी पाहून सद्गुरु काका म्हणाले, ‘‘जसे कळीचे कमळात रूपांतर होते, तसेच आपलाही ईश्वरप्राप्तीचा मार्ग मूलाधारचक्रापासून सहस्रारचक्रापर्यंत नेणारा आहे.’’ त्यांचे हे बोलणे ऐकून ‘ते सतत ईश्वरी चिंतनात असतात’, हे शिकायला मिळाले.
४. ‘साधकांचे प्रारब्ध न्यून झाल्यावर आणि त्यांची प्रगती झाल्यावर संतांना खरा आनंद होतो; म्हणून ते भावनेच्या पलीकडे गेलेले असतात’, हे शिकवणारा एक प्रसंग
सद्गुरु पिंगळेकाका कमलपिठाचे दर्शन घेत होते. तेव्हा आश्रमातील एक साधक त्यांना भेटायला आला. त्या साधकाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे त्याच्या हाता-पायाला पट्ट्या बांधलेल्या होत्या. त्या साधकाने सद्गुरु काकांना नमस्कार केला. तेव्हा त्यांनी ‘काय झाले ?’, असे त्याला विचारले. त्या वेळी त्याने झालेल्या अपघाताविषयी सांगितले. तेव्हा ‘देवाने तुझे प्रारब्ध अल्प केले आहे. आता पुढे तुझी प्रगती होणार आहे’, असे त्यांनी त्या साधकाला हसत आनंदाने सांगितले. मी त्यांच्या जागी असते, तर मला अपघाताविषयी वाईट वाटले असते आणि मी भावविवश होऊन दादाची विचारपूस केली असती; परंतु ‘साधकांचे प्रारब्ध न्यून होऊन त्यांची प्रगती झाल्यावर संतांना खरा आनंद होतो; म्हणून ते भावनेच्या पलीकडे गेलेले असतात’, हे या प्रसंगातून देवाने शिकवले.
५. पू. सौरभ जोशी यांच्या भेटीच्या वेळी सद्गुरु काकांचा संतांप्रती असलेला भाव प्रत्यक्ष अनुभवण्यास आणि शिकण्यास मिळणे
आम्ही पू. सौरभदादांना (पू. सौरभ जोशी यांना) भेटण्यास त्यांच्या खोलीत गेलो होतो. तेथे गेल्यावर सद्गुरु काकांनी पू. सौरभदादांना अत्यंत भावपूर्ण नमस्कार केला. त्या वेळी ते त्यांचे काही अनुभव पू. दादांना सांगत होते. व्यायामाविषयी बोलतांना ‘त्याचा मला कसा लाभ झाला ?’, हे ते सांगत होते. त्या वेळी ‘८ दिवस व्यायाम केला नव्हता आणि शारीरिक त्रासामुळे जमले नव्हते’, हेही त्यांनी प्रामाणिकपणे अन् सहजतेने सांगितले. याचे मला आश्चर्य वाटले. ‘देवाला आपल्या सहज बोलण्यातूनही साधकत्व कसे अपेक्षित आहे ?’, हे मला शिकायला मिळाले. त्या वेळी मला सद्गुरु काकांचा संतांप्रती असलेला भाव प्रत्यक्ष अनुभवण्यास आणि शिकण्यास मिळाला.’
– कु. श्रद्धा लोंढे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.६.२०१९)