कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने पुण्यातील सार्वजनिक छठ पूजेस बंदी

पुण्यातील सार्वजनिक छठ पूजेस बंदी

पुणे – दिवाळीनंतर आणि हिवाळा लक्षात घेता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तलाव, नदी किनारी सार्वजनिकरित्या छठ पूजा साजरी करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनुमती नाकारली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी १८ नोव्हेंबर या दिवशी काढलेल्या परिपत्रकात सामूहिक छठ पूजा करता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.


उत्तर भारतीय नागरिकांच्या वतीने छठ पूजेचे आयोजन केले जाते. पूजेच्या वेळी कोरोनाच्या नियमांचे पालन होणार नाही, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले आहे. भाविकांनी छठ पूजा घरगुती पद्धतीने साजरी करावी खासगी जागेत, घरात पूजा करतांना सुरक्षित अंतराचे पालन करून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. तसेच पालिकेच्या अधिकार्‍यांनी नियमभंग करणार्‍यांवर विनामास्क फिरणार्‍यांवर, तसेच विनाअनुमती कार्यक्रम आयोजित करणारे, रस्त्यावर थुंकणारे यांच्यावर कारवाई करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे.