सिंधुदुर्गातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे, किल्ले आणि स्मारके खुली

कोरोनाविषयीच्या अटी आणि नियम पाळण्याचे बंधन

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटक आणि नागरिक यांच्यासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळेही खुली करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी प्रवेश देतांना ‘कोविड-१९’ (कोरोना) विषयीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, हात वारंवार धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्र वगळता धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली

जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळे चालू करण्यात आली आहेत. या स्थळांच्या वेळेविषयी संबंधित विश्‍वस्त मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यायचा आहे. या प्रार्थना स्थळांमध्ये मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळाविषयीचे नियम पुढील प्रमाणे असणार आहेत. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि १० वर्षांखालील लहान मुले यांनी घरीच रहावे. धार्मिक आणि प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणार्‍या संस्थांनी नागरिकांना सूचना द्याव्यात, असे जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्या आदेशात स्पष्ट केले आहे.