सौ. वैदेही गौडा यांच्या विवाहानिमित्त रामनाथी आश्रमात वास्तव्यास असतांना साधिकेने अनुभवलेले क्षणमोती !

सौ. वैदेही गौडा (पूर्वाश्रमीच्या वैदेही पिंगळे) यांच्या विवाहानिमित्त भूलोकाचे गोकुळ असलेल्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असतांना साधिकेने अनुभवलेले क्षणमोती !

सनातन आश्रम, रामनाथी
सौ. वैदेही गौडा

१. विवाहसोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे

१ अ. ‘आश्रम म्हणजे साक्षात् चैतन्याचा गोळाच आहे’, असे वाटणे : ‘२९.५.२०१७ या दिवशी मी, माझे पती, दोन मुले आणि इतर कुटुंबीय कु. वैदेही पिंगळे (आताची सौ. वैदेही गौडा) हिच्या विवाहासाठी रामनाथी आश्रमात गेलो होतो. आम्ही ३ दिवस आश्रमात होतो. ‘आश्रम म्हणजे साक्षात् चैतन्याचा गोळाच आहे’, असे मला वाटत होते. ‘आपण काय पुण्य केले; म्हणून आपण आश्रमात आलो ?’, असा विचार होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.

१ आ. सद्गुरु पिंगळेकाकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

१ आ १. थोडीशी सेवा केली असूनही सद्गुरु पिंगळेकाकांनी साहाय्य करणे : गोवादर्शन झाल्यावर मी अन् माझी मुले (चि. अवधूत अन् कु. देवश्री) आश्रमातच सेवेसाठी थांबलो. रात्री लग्नाच्या अहेराच्या सामानाची बांधाबांध केल्यावर ११.३० वाजता आम्ही निवासस्थानी जाणार होतो; परंतु आमची सेवा चालू असतांनाच दोन्ही मुले झोपली. तेव्हा सद्गुरु पिंगळेकाका मला म्हणाले, ‘मी अवधूतला कडेवर घेतो. तुम्ही देवश्रीला घ्या.’ त्यांनी अवधूतला कडेवर घेऊन खाली स्वागतकक्षाजवळ गाडीपर्यंत सोडले. तेव्हा मला वाटले, ‘मी थोडीशीच सेवा केली; पण प्रत्यक्षात सद्गुरु काकांनीच मला साहाय्य केले. गुरूंची कृपा अशीच असते.’

सौ. रोहिणी जोशी

१ आ २. साधकांना आश्रमातील चैतन्याचा लाभ व्हावा, यासाठी प्रयत्नरत असणारे सद्गुरु पिंगळेकाका ! : आलेल्या साधकांना रामनाथी आश्रम आणि तेथील चैतन्याचा लाभ व्हावा, यासाठी सद्गुरु काकांनी मला अन् मुलाला सांगितले, ‘‘आपल्याला आश्रमात रहायला मिळत आहे. येथील चैतन्य आपल्यामुळे न्यून होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. विदेशातील साधकांना आश्रमात येण्यासाठी ३ ते ४ वर्षे प्रतीक्षा करावी लागते. आपण येथील चैतन्याचा लाभ करून घेण्याचा प्रयत्न करूया.’’ सद्गुरु काकांचे हे दृष्टीकोनात्मक वाक्य ऐकून ‘आपली साधना व्हावी, यासाठी गुरु किती प्रयत्नरत असतात !’, हे शिकायला मिळाले.

१ आ ३. कितीही थकले, तरी हसतमुखाने सर्व सेवा करणारे सद्गुरु पिंगळेकाका ! : आश्रमात विवाहाचे सभागृह तळमजल्यावर आणि सद्गुरु काकांची खोली दुसर्‍या मजल्यावर होती. त्यामुळे सद्गुरु काकांना पुष्कळ वेळा वर-खाली करावे लागत असे. उन्हाळा पुष्कळ असल्याने सद्गुरु काकांची घामाने जणू अंघोळच होत होती; पण सद्गुरु काका सर्व सेवा हसतमुखाने करत.

१ इ. सौ. पिंगळेकाकूंकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

१ इ १. पाठपुरावा घेऊन सेवा पूर्ण करवून घेणे : सौ. पिंगळेकाकूंनी मला आणि सौ. कानडे यांना नातेवाईक अन् लग्नविधीच्या दायित्वाची सेवा असणारे साधक यांच्यात समन्वय साधण्याची सेवा दिली होती. त्या वेळोवेळी त्या संदर्भात आमचा पाठपुरावा घेत. त्यामुळे लग्नात माझ्याकडून सेवा होऊ शकली. ही सर्व काकूंचीच तळमळ असल्याने मला सतत कृतज्ञता वाटत होती.

१ इ २. सद्गुरु काकांना विचारून घेऊन सेवा करणे : विवाहाची सर्व सिद्धता करतांना काकू प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी सद्गुरु काकांना विचारून घेऊन त्याप्रमाणे कृती करत असत. तेव्हा ‘काकू सतत विचारण्याच्या आणि शिकण्याच्या स्थितीत असतात’, हे लक्षात आले. विवाहातील सर्व सेवांचे बारकावे काकू सद्गुरु काकांना सांगून ‘सर्व सेवा पूर्ण झाल्या का ?, हे पहात आणि स्वतःही त्या पूर्ण करत.

१ ई. चि. सौ. कां. वैदेही आणि श्री. गुरुप्रसाद यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे !

१ ई १. विवाहाची सिद्धता आणि विवाहविधी गुरूंना अपेक्षित असेच व्हावेत, यासाठी दोघेही प्रयत्न करत होते.

१ ई २. सतत नम्रभावात असणारे दांपत्य ! : दोघेही व्यासपिठावर आणि खाली आल्यावरही सतत नमस्कार मुद्रेतच होते. त्यांना त्या भावातून बाहेर यावे, असे वाटतच नव्हते. तेव्हा ते मायेपासून अलिप्त असल्याचे लक्षात आले.

श्रीगुरुकृपेने मला आणि माझ्या कुटुंबियांना अशा आध्यात्मिक स्तरावरील विवाहसोहळ्यास उपस्थित रहाता आले, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत. त्या वेळी मला जो सत्संग मिळाला त्याला उपमाच नाही. ‘सद्गुरु पिंगळेकाका, सौ. पिंगळेकाकू अन् वैदेही यांच्याप्रमाणे साधना करण्यासाठी मला शक्ती अन् सद्बुद्धी मिळावी’, ही श्रीकृष्णचरणी प्रार्थना करतेे.

२. रामनाथी आश्रमात अनुभवलेला आनंद !

२ अ. मुलीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्यासाठी रडून हट्ट करणे : आम्ही आश्रमात आल्यापासूनच मला आणि मुलांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीची ओढ लागली होती. आम्हाला त्यांचे दर्शनही झाले नाही. देवश्री सतत म्हणत होती, ‘आई, मला परम पूज्यांना भेटायचे आहे. मी त्यांना एकदाही भेटले नाही. मी त्यांना एकदाही पाहिले नाही. मला त्यांना भेटायचे आहे.’’

२ आ. ‘दैवी बालकांचा जन्मतःच देवाकडेे ओढा असतो’, हे शिकायला मिळणे : कु. देवश्रीची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे. तिची परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची तळमळ पाहून ‘दैवी बालकाचा जन्मतःच देवाकडेे ओढा असतोे’, हे मला शिकायला मिळाले. त्यानंतर मी देवश्रीला संगणकावरील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवले अन् तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिच्यातील भाव अन् तळमळ बघून मला तिला कसे समजवावे, ते कळत नव्हते.

२ इ. परात्पर गुुरु डॉक्टरांचेे दर्शन होणे : आम्हाला हा आश्‍चर्याचा मोठा धक्काच होता. परात्पर गुरु डॉक्टर यांचेे दर्शन होणे, हे आम्हाला स्वप्नच वाटत होते. आदल्या दिवशी ३ वाजेपर्यंत आम्हाला ‘त्यांचे दर्शन तरी होणार का ?’, असे वाटत असतांना अचानक त्यांचे दर्शन झाले. यामुळे पुष्कळ कृतकृत्य वाटत होते. त्यांच्या दर्शनापूर्वी आमच्या मनाची स्थिती ‘दर्शन देऽऽरेे दे रे भगवंता । किती अंत आता पहासी अनंता ।’ अशी होती; मात्र त्यांच्या दर्शनानंतर ‘अनंत हस्ते कमलावराने । देता किती घेशील दो कराने ॥’ अशी झाली.

२ ई. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती व्यक्त झालेली कृतज्ञता ! : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला दर्शन देणे, म्हणजेे आमच्यासारख्या अनंत अपराधी जिवांवर केलेली कृपाच आहे. आमची काहीही पात्रता नसतांना आमच्या उद्धारासाठी आणि आमच्या साधनेतील अडथळे दूर होऊन आमची प्रगती व्हावी, यासाठी देवाने केलेली कृपाच आहे. त्यांनाच आमच्या प्रगतीची काळजी आहे’, या विचाराने माझे मन कृतज्ञताभावाने भरून आले. त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

‘गुरुदेव, सतत आपले रूप माझ्या मनात साठवलेले असू दे. ‘तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम ।’ असेच होऊ दे. माझ्याकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना होऊ दे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात आम्हाला सहभागी होता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. रोहिणी गोविंद जोशी, संभाजीनगर

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक