‘नाममय’ झाली श्री गुरूंची मानसपूजा ।

साधकांना नाममय करून आनंद देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले
सौ. अंजली जोशी

श्री गुरुचरणांवर नामाचे घातले जल ।
मम हृदयी उमलले भावाचे फूल ॥ १ ॥

घातले चरणांवरी नामाचे पंचामृत ।
पंचप्राण झाले श्री गुरूंच्या अंकित ॥ २ ॥

पुनःश्‍च घातले नामाचे गंगाजल ।
चित्तातून नष्टिले अहंचे हालाहल ॥ ३ ॥

नामरूपी वस्त्राने पुसले चरण ।
मनरूपी पाखरू गेले आनंदून ॥ ४ ॥

चरण ठेविण्या नामाचाच चौरंग ।
मम अंतरंग हो गेले उजळून ॥ ५ ॥

चरणी वाहिले नामाचे अष्टगंध ।
मनी दरवळला भक्तीचा सुगंध ॥ ६ ॥

चरणी नामरूपी कुंकू वाहिले ।
क्षात्रतेज मम अंतरी उपजले ॥ ७ ॥

चरणी नामरूपी वाहिली हळद ।
मांगल्य निर्मिले अंतरी शुद्ध ॥ ८ ॥

नामाचा चरणी वाहिला अबीर (टीप १) ।
वैराग्याचे वाण मिळाले सुंदर ॥ ९ ॥

चरणी वाहिला नामाचा गुलाल ।
अंतरंगी आनंदतरंग उठेल ॥ १० ॥

चरणी वाहिले नामाचे कमळ ।
मम अंत:करण झाले हो निर्मळ ॥ ११ ॥

नामाचाच टिळा लाविला भाळी ।
द्वैताची जाणीवच संपून गेली ॥ १२ ॥

नामाचीच तुळशीमाळ अर्पिली ।
ज्ञानजले मम आेंजळ भरली ॥ १३ ॥

श्री गुरूंना नामाचाच दाविला नैवेद्य ।
ग्रहण करता चित्त झाले ससंवेद्य (टीप २) ॥ १४ ॥

नामाचीच उदबत्ती ओवाळली ।
देहबुद्धी चरणी समर्पिली ॥ १५ ॥

नामाचेच निरांजन ओवाळले ।
मम आत्मज्योत तेजाळली ॥ १६ ॥

नाम हेची साधन, नाम हेची साध्य ।
नामानेच केले जिवाला हो बद्ध ॥ १७ ॥

श्री गुरुचरणी नामाचेच केले नमन ।
नामातच मम विसावले जीवन ॥ १८ ॥

टीप १ – एक सुगंधी पूड

टीप २ – संवेदनशील होणे

श्री गुरुचरणी अखंड कृतज्ञ,

– सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१२.२.२०१६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक