धर्माचरणाची आवश्यकता विशद करणारी आणि हिंदू धर्माची महानता अधोरेखित करणारी कोरोना महामारीची समस्या !

गेले काही मास संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा धुमाकूळ चालू असून त्यावर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही. ‘त्याची लस यायलाही अजून काही काळ लागेल’, असे तज्ञांचे मत आहे.

१. …आणि अभिवादनाची पद्धत रूढ झाली !

लहानपणापासून एकमेकांना भेटल्यावर आपल्याला हस्तांदोलन करण्यासच शिकवले जाते. हात मिळवणे, गळाभेट घेणे या पाश्‍चात्त्य पद्धतींचा आपण अवलंब करत असतो. कोरोनाची साथ आल्यानंतर शेवटी प्रत्येकाला, नव्हे नव्हे विश्‍वभरातील सर्वांनाच हस्तांदोलनाऐवजी नमस्कार करणे अपरिहार्य झाले; कारण हस्तांदोलन केल्यास कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, हे सत्य सर्वांनाच ठाऊक झाले होते. कोरोनापासून आपला बचाव करायचा असेल, तर नमस्कार करण्याविना पर्यायच कुणाकडे उरला नाही. कोरोनाच्या धास्तीमुळे का होईना, अभिवादनाची ही सनातन पद्धत जागतिक स्तरावर वाखाणली जात आहे.

हस्तांदोलनाला पर्याय एवढेच नमस्काराच्या मुद्रेचे महत्त्व नसून अभिवादनाच्या या पद्धतीमध्ये इतरांपुढे नम्र होणे अथवा समोरच्या व्यक्तीमध्ये असणार्‍या ईश्‍वराच्या अंशापुढे लीन होणे, असा आध्यात्मिक अर्थही सामावला आहे. पाश्‍चात्त्य जग त्या भावनेपर्यंत पोचले नसले, तरी कृतीच्या स्तरावर का होईना हस्तांदोलनाला राम-राम करून जग हिंदु संस्कृतीला नमस्कार करत आहे, हेही नसे थोडके !

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विविध कार्यक्रमांमध्ये हात जोडून नमस्कार करण्यास प्राधान्य दिले. ‘धर्म’ किंवा ‘संस्कृती’ या शब्दांची ‘अ‍ॅलर्जी’ असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही ‘शेकहँड टाळा, नमस्कार करा’, असे आवाहन केले. इंग्लंडमधील प्रिन्स चार्ल्स यांनीही एका कार्यक्रमासाठी गाडीतून उतरल्यावर उपस्थितांशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला; मात्र जाणीव झाल्यावर नमस्कार केला.

२. आयुर्वेदाची देणगी !

कोरोनाचा जेथून प्रारंभ झाला, त्या चीनमध्ये कोरोना पसरण्यामागे ‘विविध प्राण्यांचे अर्धे-कच्चे मांस खाणे’, हे कारण समोर आले होते. त्यानंतर अनेक जण मांसाहारापासून दूर पळाले. हिंदु धर्मात मांसाहाराला तमोगुणीच म्हटले आहे आणि शाकाहाराचा पुरस्कार केला आहे. आजही भारतामध्ये बहुतांश जण शाकाहारी आहेत. भारतियांच्या जेवणामध्ये हळद, आले, मिरे, ओवा यांसारख्या संसर्गविरोधी आणि औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

३. मृतदेहांचे दफन नव्हे, तर त्यांच्यावर केले गेले अग्नीसंस्कार !

हिंदु सोडून अन्य धर्मियांमध्ये त्यांच्या पद्धतीनुसार मृतदेह दफन केला जातो. आता कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे अन्य राष्ट्रांनीही कोणत्याही धर्माच्या नागरिकाच्या मृतदेहाच्या दफनास अनुमती नाकारली असून त्यांच्यावर अग्नीसंस्कार करण्याचेच आदेश दिले आहेत.

४. ‘अधर्माचरण’ हे सर्व रोगांचे मूळ !

गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नवनवीन साथीच्या रोगांचा उद्भव झाला आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तींचेही प्रमाण वाढले आहे. ‘अधर्माचरण’ हे सर्व रोगांचे मूळ आहे’, असे आयुर्वेद सांगतो. धर्माचरण हे कृतीचे शास्त्र आहे. श्रद्धापूर्वक आचरण करणार्‍याला त्याचे फळ मिळतेच. आयुर्वेदिक आणि धर्माधिष्ठित जीवनप्रणालीचा अंगीकार, हीच निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे; पण गेल्या काही दशकांमध्ये ‘धर्माचरण म्हणजे मागासलेपण’ असे मानण्याचा दोष निर्माण झाला आहे. बुद्धीवादी म्हणवणार्‍या अनेक नास्तिकतावादी, पुरोगामी संघटना यांनी हा दोष मोठा केला आहे. हिंदु संस्कृतीला लक्ष्य करण्याचा एकमेव अजेंडा या संघटना राबवत आहेत. आज संपूर्ण जग भारतीय संस्कृतीकडे मोठ्या आशेने पहात असतांना कथित विज्ञानवादाच्या भ्रमात राहून भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ठेवा नाकारणे, हा करंटेपणा आहे.

भारतातील ‘इलीट क्लास’ सोडला, तरी सर्वसाधारण भारतीय समाज मात्र यांच्या भूलथापांना पाठ दाखवून महान हिंदु संस्कृतीचे आचरण करू लागला आहे. कथित पुढारलेपणाच्या नावाखाली सनातन संस्कृती झिडकारण्यापेक्षा धर्माशी पुन्हा नाळ जोडण्यात म्हणजे धर्माचरण करण्यातच व्यक्तीचे, पर्यायाने समाजाचे आणि राष्ट्राचे हित सामावले आहे, हे भारतियांनी आता ओळखले आहे. त्यामुळे सध्याच्या दळणवळण बंदीच्या काळात धर्माने सांगितलेल्या श्रेष्ठ आचारांचे पालन करून भारतीय समाजाने तिचे महत्त्व अनुभवावे.

कोरोना विषाणूने सर्वत्र अराजक माजलेले असले, तरी त्यानिमित्ताने हिंदु धर्माची महानताच संपूर्ण विश्‍वासमोर आली आहे. यातूनच धर्माचरणाची आवश्यकता आणि अपरिहार्यता लक्षात येते. – एक धर्मप्रेमी