धर्माचरणाची अपरिहार्यता अधोरेखित करणार्‍या घटना

धर्माचरण नसल्याने आज हिंदूंमध्ये हिंदु धर्माविषयीचा अभिमानच उरलेला नाही. त्यामुळे ते अन्य धर्मियांप्रमाणे अनुसरण करू लागतात. स्वतःच स्वतःच्या अधोगतीस कारणीभूत ठरतात. चैतन्यदायी हिंदु धर्माचे सामर्थ्य अनुभवून आपला उत्कर्ष साधण्यासाठी धर्माचरण करणे अपरिहार्य आहे, हे दर्शवणार्‍या घटना येथे मांडल्या आहेत.

मंदिरात ‘ऑर्केस्ट्रा’चे आयोजन करणारे धर्मद्रोही हिंदू !

मंदिरातील देवतांचे चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक !

‘मंदिरातील देवतेचे चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. मंदिरात आलेल्या भाविकांचा त्या त्या देवतेप्रती भक्तीभाव कसा वाढेल, यासाठीच केवळ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे. वाद्यवृंद (ऑर्केस्ट्रा), डान्स स्पर्धा वगैरेसारखे कार्यक्रम आयोजित करून आपण मंदिरांची सात्त्विकता नष्ट करत असतो. त्यामुळे हिंदूंना आज देवळात अपेक्षित असा लाभ होत नाही अन् परिणामस्वरूप आपलेच हिंदू ‘जिझस’ काहीतरी चमत्कार करील म्हणून बिलिव्हर्सच्या मागे लागतात. हे टाळण्यासाठी मंदिराचे या दृष्टीने योगदान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’


धर्मशिक्षणाअभावी हिंदूंच्या धार्मिकतेत घट

हिंदु राष्ट्रात प्रत्येक विद्यापिठात धर्मशिक्षणाचा अभ्यासक्रम प्राधान्याने असेल !

‘भारतात देवावर श्रद्धा ठेवणार्‍यांच्या संख्येत घट होत आहे. भारतात वर्ष २००५ मध्ये करण्यात आलेल्या पहाणीत ८७ टक्के लोकांनी ते धार्मिक असल्याचे म्हटले होते; मात्र २०१३ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हा आकडा ८१ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे, अशी माहिती लंडन येथे घोषित करण्यात आलेल्या ‘धार्मिकता आणि निरीश्‍वरवाद वैश्‍विक निर्देशांका’तून पुढे आली आहे.’


मुली बिघडण्यामागे त्यांची आई कारणीभूत ठरत आहे !

‘भारतीय कुटुंबव्यवस्था मोडकळीस आली आहे. संस्कृती आणि संस्कार कुटुंबातून नाहीसे होत आहेत. भारतीय स्त्री शिक्षणामुळे मोठी होत नसून संस्कृतीमुळे मोठी होते. त्यामुळे संस्कृतीचे भान ठेवले पाहिजे. सध्या मुली बिघडण्यामागे त्यांची आई कारणीभूत ठरत आहे. घरातील माता-भगिनींनी त्यांच्या मुलींना धर्मशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे.’ – अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर, सोलापूर


अधर्माचरणामुळे वासनांधतेची निर्मिती होते !

‘सध्या समाजात युवतींनी अपूर्ण वस्त्रे परिधान करणे, पुरुषांशी जवळीक करणे, पुरुषांनी परस्त्रीकडे मातेसमान न बघणे, स्त्रियांशी लगट करणे, अश्‍लील संकेतस्थळे पहाणे, अशा अधर्माचरणामुळे वासनांधतेची निर्मिती होत आहे.’ (बलात्काराचे मूळ अधर्माचरणातच ! धर्माचरण केल्यास महिलांचे अयोग्य वर्तन थांबेल, तसेच पुरुषांवर नियंत्रण राहून बलात्कार ही समस्याच नसेल ! – संकलक)