‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी

जयपूर (राजस्थान) – ‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या. दादी जानकी या गेल्या २ मासांपासून श्‍वसन आणि पोट यांच्या विकाराने आजारी होत्या. ‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या शांतीवन येथील मुख्य केंद्रात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादी जानकी यांचा जन्म १ जानेवारी १९१६ या दिवशी पाकिस्तानमधील हैद्राबाद येथे झाला होता. वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी साधनेला प्रारंभ केला होता. वर्ष १९७० मध्ये त्यांनी पाश्‍चिमात्त्य देशांमध्ये जाऊन भारतीय तत्त्वज्ञान, राजयोग आणि मानवी मूल्ये यांचा प्रसार केला. त्यांनी जगभरातील १४० देशांमध्ये ‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या सेवाकेंद्रांची स्थापना केली. सध्या या संस्थेची जगभरात ८ सहस्र केंद्रे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजयोगिनी दादी जानकी यांच्या निधनाविषयी दुःख व्यक्त केले आहे.