लातूर – जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही; मात्र मुंबई-पुणे येथून येणार्या नागरिकांनी गावात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे आवश्यक असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज असली, तरी सर्वसामान्य नागरिकांनी ही माहिती देणे अनिवार्य आहे. या नोंदींसाठी ‘आशा वर्कर्स’ काम करत आहेत. त्यानुसार १८ सहस्र लोकांची नोंदणी झाली आहे. यातील ५५ नागरिक संशयित आहेत, त्यातील ३२ जणांचे नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातील सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आहेत. शहरातील नागरिक ग्रामीण भागात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी पडताळणी करून गावात प्रवेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही केली जात नाही. गावाकडे परतलेल्या नागरिकांच्या पडताळणीसाठी एका वैद्यकीय अधिकार्याची नेमणूक केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.