कोरोनाविषयी केवळ संरक्षक न होता त्याच्या विरोधात आक्रमक नीती वापरा ! – जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस गेब्रयासस

जिनिव्हा – कोरोना इतक्या झपाट्याने पसरतो आहे की, त्याच्या विरोधात संरक्षक नीती न वापरता आपण आक्रमक नीती वापरायला हवी. कोरोनाला हरवता येऊ शकते; पण त्याच्याशी लढण्यासाठी फूटबॉल खेळाच्या सामन्याला जशी नीती वापरतो, तशी रणनीती वापरावी लागेल, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (‘डब्ल्यू.एच्.ओ.’चे) प्रमुख टेड्रॉस गेब्रयासस यांनी केले आहे. ‘फिफा’ आणि ‘डब्ल्यू.एच्.ओ.’ यांनी जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटूंच्या साहाय्याने कोरोनाच्या विरोधात चालू केलेल्या ‘पास द मेसेज टू किक आऊट कोरोना व्हायरस’ या मोहिमेच्या प्रारंभी त्यांनी वरील प्रतिपादन केले.

गेब्रयासस यांनी म्हटले आहे की, नागरिकांनी घरात रहाणे, कुणाशी जास्त थेट संपर्क न ठेवणे, हा कोरोनाचा प्रसार रोखण्याचा महत्त्वपूर्ण मार्ग आहे; पण हा संरक्षणात्मक उपाय आहे. त्याच्या विरोधात लढा जिंकण्यासाठी आक्रमक अशा रणनीतीने आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक संशयिताचे परीक्षण, त्याला वेगळे ठेवणे आणि त्यांची योग्य देखभाल, त्याच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे, त्यांचे विलगीकरण करणे, ही आपली प्राथमिकता असायला हवी.