‘सेवेच्या माध्यमातून साधकांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सतत प्रयत्नरत असणारे आणि साधकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे सद्गुरु सत्यवान कदम !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा (२५.३.२०२०) या दिवशी सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील साधकांनी त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण कलेली शब्दसुमने पुढे दिली आहेत.

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. अपघात होऊन बेशुद्ध असतांना आणि शस्त्रकर्म अन् अन्य वैद्यकीय उपचारांच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांनी घरच्यांना नामजप सांगितल्याने त्रास सोसण्यास शक्ती मिळून अल्प दिवसांत बरे वाटणे, तसेच सद्गुरु सत्यवानदादांचा नेहमी आधार वाटणे

‘मार्च २०१८ मध्ये माझा अपघात झाला होता. त्या वेळी मी १५ दिवस बेशुद्ध होतो. सद्गुरु सत्यवान कदम यांनी माझ्यासाठी नामजप शोधून दिला. घरातील सदस्य आणि साधक सद्गुरु सत्यवानदादांनी माझ्यासाठी शोधून दिलेला नामजप करत असल्याने मी अल्पावधीत शुद्धीवर आलो. त्यानंतरही माझे शस्त्रकर्म आणि अन्य वैद्यकीय उपचारांच्या वेळी सद्गुरु सत्यवानदादा वेळोवेळी मला नामजप शोधून देत असत. नामजपादी उपाय केल्यामुळे मला शारीरिक त्रास सहन करण्याची शक्ती मिळाली. माझ्या हाता-पायांवर झालेल्या जखमा लवकर बर्या झाल्या. मला सद्गुरु सत्यवानदादांच्या सहवासात असतांना शारीरिक वेदनांचा पूर्णत: विसर पडत असे. प्रत्येक संकटाच्या प्रसंगी सद्गुरु सत्यवानदादा आमच्या पाठीशी उभे असतात आणि आम्हाला गुरुकृपा अनुभवायला देतात. त्याविषयी त्यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. गणेश धुरी, साळगाव, ता. कुडाळ

२. सद्गुरु सत्यवान कदम यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

२ अ. कानाच्या त्रासासाठी सद्गुरु सत्यवानदादांनी नामजप शोधून देणे आणि तो नामजप केल्याने कानाचा त्रास दूर होणे : ‘एक वर्षापासून मला कानाचा तीव्र त्रास होत होता. वैद्यकीय उपचार करूनही मला होणारा त्रास न्यून झाला नाही. तेव्हा सद्गुरु सत्यवानदादांनी मला नामजप शोधून दिला. हा नामजप केल्यावर ३ मासांतच मला होणारा त्रास बंद झाला.

२ आ. सद्गुरु सत्यवानदादांमुळे कुटुंबियांमध्ये पालट होणे : एकदा सद्गुरु सत्यवानदादा सत्संगासाठी आले होते. तेव्हा त्यांचे आमच्या घरी शुभागमन झाले. त्या दिवसापासून आमच्या घरातील व्यक्तींमध्येही पालट जाणवले. माझ्या आईचे साधनेविषयी गांभीर्य वाढले. तिची गुरुमाऊलींप्रती श्रद्धा वाढली. ‘साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी, दसरा’, याची मला प्रचीती घेता आली.

२ इ. साधिकेच्या मनावर नामजप करण्याचे महत्त्व बिंबवणे : एके दिवशी पहाटे मला स्वप्न पडले. त्यात मला दिसले, ‘मी साधनेविषयी सद्गुरु सत्यवानदादांशी बोलत होते. त्या वेळी सद्गुरु सत्यवानदादांनी मला विचारले, ‘नामजप होतो ना ?’ मी म्हणाले, ‘सकाळी नामजप करते; पण रात्री नामजप करणे मला शक्य होत नाही. ‘सेवेत असतांना वेळ कसा जातो ?’, ते समजत नाही.’ त्या वेळी सद्गुरु सत्यवानदादा म्हणाले, ‘१० मिनिटे वेळ मिळाला, तरी त्या वेळेत नामजप केला पाहिजे.’
हे स्वप्न पडल्याच्या दुसर्याे दिवसाच्या रात्री मला सद्गुरु सत्यवानदादांसमवेत सत्संगाला जाण्याचे भाग्य मिळाले. आमच्या घरी सद्गुरु सत्यवानदादांच्या महाप्रसादाचे नियोजन केले होते; म्हणून सत्संग संपल्यावर मी सद्गुरु सत्यवानदादांसह घरी आले. त्या दिवशी नामजपाच्या वेळेत मला १० मिनिटे सद्गुरु सत्यवानदादांच्या समवेत नामजप करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला ‘पहाटे पडलेले स्वप्न हे केवळ स्वप्न नसून तो दृष्टांत होता’, याची प्रचीती आली.

२ ई. प्रयाग येथे कुंभमेळ्याच्या सेवेला जाण्याचा प्रवासाचा व्यय अधिक असल्याने तेथे जाण्यास अडचण येणे, सद्गुरु सत्यवानदादांना अडचण सांगितल्यावर प्रत्यक्षात अल्प दरात प्रवास होणे : फेब्रुवारी २०१९ मध्ये माझे आणि माझ्या बहिणीचे (कु. गुलाबी धुरी हिचे) प्रयाग येथे कुंभमेळ्याच्या सेवेसाठी जायचे नियोजन केले होते; परंतु प्रवासाचा व्यय अधिक असल्याने आम्हा दोघींनाही जाणे अशक्य होते. कुंभमेळ्याच्या कालावधीत साधकांसाठी सद्गुरु सत्यवानदादांचा सत्संग झाला. तेव्हा आम्ही आमची अडचण सद्गुरु सत्यवानदादांना सांगितली. तेव्हा ‘आगगाडीच्या तिकीटांचे दर न्यून झाले आहेत’, असे सद्गुरु सत्यवानदादांनी आम्हाला सांगितले. एकूण प्रवासाचा व्यय ४ सहस्र रुपये होणार होता; परंतु प्रत्यक्षात आम्हा दोघींच्याही प्रवासाचा व्यय केवळ २ सहस्र १०० रुपये झाला. केवळ सद्गुरु सत्यवानदादांच्या कृपेमुळेच आम्हाला कुंभमेळ्याच्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

३. ‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी’, यासाठी सत्संग चालू करणे

‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली व्हावी, सर्व साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती व्हावी अन् सेवेच्या माध्यमातून सर्वांना गुरुकृपा अनुभवता यावी’, यासाठी सद्गुरु सत्यवानदादा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील साधकांचा सत्संग घेतात. त्यामुळे साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले आहेत आणि त्यांची समष्टी सेवेची तळमळही वाढली आहे.’
– कु. पूजा धुरी, साळगाव, ता. कुडाळ (१७.३.२०२०)

सद्गुरु सत्यवान कदम यांच्या नावाचा साधिकेला सुचलेला भावार्थ ।

स – ‘सत्यं शिवं सुन्दरम्’ असलेले ।
त्य – त्याग स्वतः करून इतरांकडून  करवून घेणारे ।
वा – वासुदेवाच्या नामात रंगून जाणारे ।
न – नम्रता ज्यांचा स्थायीभाव आहे ।

अशा आमच्या सद्गुरु सत्यवानदादांना वाढदिवसानिमित्त सर्व साधकांचा भावपूर्ण साष्टांग नमस्कार !

खरेतर ‘स’ शब्दासमोर मी वेगळी ओळ ठरवली होती. मी ध्यानमंदिरात बसले असतांना एक साधिकेने मला विचारले, ‘‘सद्गुरु सत्यवानदादांविषयी तुम्ही लिहून देणार आहात का ?’’ तिने मला असा प्रश्न विचारताच देवाने माझ्या दृष्टीसमोर ‘सत्यं शिवं सुन्दरम्’ ही ओळ आणली. देवानेच सुचवलेेले त्याच्या चरणी अर्पण करते.’
– श्रीमती वैशाली पारकर, कुडाळ सेवाकेंद्र (१७.३.२०२०)

देवा, सद्गुरु सत्यवानदादांच्या रूपे तुझे सगुण साकार रूप मज दिसे ।

गुरुमाऊलीच्या अपार कृपेने
भाग्य आमचे उजळले ।
हिरे, माणिक अन् मोती
यांहूनही तेजस्वी संतरत्न लाभले ॥ १ ॥

अज्ञानाचा अंधकार घालवूनी,
जीवनी साधनादीप लावले ।
आमचे आध्यात्मिक बाबा,
सद्गुरु सत्यवानदादा आम्हांस लाभले ॥ २ ॥

प्रारब्धाचे डोंगर जळती,
परि नयनी ते न दिसे ।
संकल्पशक्ती ठायी असे
अन् हृदयात गुरुमाऊली वसे ॥ ३ ॥

देवा, क्षणभर डोळे मिटूनी मी
रूप तुझे आठवे ।
सद्गुरु सत्यवानदादांच्या रूपे तुझे
सगुण साकार रूप मज दिसे ॥ ४ ॥
– कु. पूजा धुरी, साळगाव, ता. कुडाळ (१७.३.२०२०)