‘बुद्धी ही सृष्टीतील एक अनमोल गोष्ट आहे. बुद्धीच्या विकासावर ज्ञानाचे प्रकटीकरण अवलंबून असते. बुद्धी एकाच प्रकारची नसून तिचे विविध स्तर आहेत. त्या प्रत्येक स्तराची वैशिष्ट्ये आणि कार्ये वेगवेगळी आहेत. बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग, यांचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे. लेखात वर्णन केलेले बुद्धीचे विविध स्तर हे महर्षि अरविंद घोष यांच्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर आधारित आहेत.
(भाग १)

१. बुद्धी म्हणजे काय ?
‘बुद्धी म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याची जिवात असलेली क्षमता.’ बुद्धी स्वतः ज्ञानाचा स्रोत नाही; पण तिची संकुचितता किंवा व्यापकता यांवर ज्ञान ग्रहण होण्याचे प्रमाण अवलंबून असते. बुद्धी संकुचित (तामसिक) असल्यास एखाद्या गोष्टीचे ज्ञान तुकड्या-तुकड्यांमध्ये किंवा अपूर्ण होते, याउलट बुद्धी व्यापक (सात्त्विक) असल्यास एखाद्या गोष्टीचे समग्र आणि परिपूर्ण (सूक्ष्म ज्ञानही) होते. आजच्या काळात आपण ज्याला ‘बुद्धी’ म्हणतो, ती ‘तर्कबुद्धी’ होय; पण तर्कबुद्धी हा बुद्धीचा केवळ एक स्तर आहे. जडत्वापासून चैतन्यापर्यंत बुद्धीचे विविध स्तर अस्तित्वात आहेत आणि प्रत्येक स्तरावरून होणार्या ज्ञानाचे स्वरूप निरनिराळे आहे.
२. बुद्धीचे विविध स्तर आणि ग्रहयोग यांचा संबंध
मनुष्याला लाभलेली बुद्धी ही अनेक घटकांवर अवलंबून असते. यामध्ये पूर्वजन्मांचे संस्कार, अनुवंशिकता, वर्तमान जन्मातील कौटुंबिक वातावरण, शिक्षणाचे स्वरूप, कर्म, सामाजिक पार्श्वभूमी आदी अनेक घटक बुद्धीला प्रभावित करत असतात. त्यांपैकी ‘पूर्वजन्मांचे संस्कार’ हा एक महत्त्वाचा घटक आहे. मागील अनेक जन्मांमध्ये जिवावर झालेले संस्कार हे त्याच्या वर्तमान जन्मातील बुद्धीचा मूलभूत स्तर आणि स्वरूप निश्चित करत असतात. जन्मकुंडलीतील ग्रह हे पूर्वजन्मांचे संस्कार दर्शवतात. त्यामुळे ‘जन्मकुंडलीतील ग्रहयोगांवरून व्यक्तीच्या बुद्धीचा स्तर आणि स्वरूप कसे आहे ?’, याचा वेध घेता येतो. बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग आता पाहूया.
महर्षि अरविंद घोष यांनी त्यांच्या इंग्रजीमधील लेखामध्ये बुद्धीला ‘mind’ हा शब्द वापरला आहे, उदा. ‘Physical mind’, ‘Vital mind’ इत्यादी. खरेतर ‘mind’ याचा शब्दशः अर्थ ‘मन’, असा होतो; पण हा लेख त्यांच्या लेखावर आधारित असल्याने येथेही त्याचा तो शब्द तसाच ठेवला आहे आणि मराठीत त्या शब्दाचा अर्थ लिहितांना ‘बुद्धी’, असे लिहिले आहे.
२ अ. जडबुद्धी (Physical mind) : या स्तरावरील बुद्धीद्वारे स्थूल पंचज्ञानेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा) यांद्वारे ज्या संवेदना प्राप्त होतात, तेवढ्याचेच आकलन होते. स्थूल वस्तूंच्या पलीकडे असलेल्या (सूक्ष्म) गोष्टींचे आकलन जडबुद्धीने होत नाही. ही शारीरिक स्तरावरील बुद्धी आहे. शरिराचे संरक्षण करणे आणि प्रजोत्पादन करणे, यांसाठी ती उपयुक्त आहे. तिच्यात तर्क करण्याची क्षमता नसते. पशू-पक्ष्यांमध्ये ही बुद्धी प्रधान असते. मनुष्यात ही प्राथमिक बुद्धी कार्यरत असते; पण या स्तरापेक्षा बुद्धीचे पुढचे स्तर मनुष्यात विकसित झाले आहेत.
२ आ. आवेगशील बुद्धी (Vital mind) : या स्तरावरील बुद्धीमध्ये कल्पना करण्याची क्षमता असते. ती कल्पनांचे मनोराज्य निर्माण करते. त्या मनोराज्यात सुखदायक अशा भविष्याची कल्पना असते. त्या भविष्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठीही बुद्धी धडपडते. आवेगशील बुद्धी ही कामनापूर्ती करणे, वर्चस्व मिळवणे, विस्तार करणे, वृद्धी करणे, यशस्वी होणे आदींसाठी मनुष्याला उद्युक्त् करते. ती पारतंत्र्य, दास्यत्व, हानी, अपयश आदी टाळण्याचा प्रयत्न करते. ती सुख-दुःख, प्रेम-द्वेष, क्रोध, गर्व, भय, काम, मोह आदी भावनांच्या अधीन असते. ती स्वकेंद्रित असल्याने नेहमी अस्वस्थ, असंतुष्ट आणि असुरक्षित असते. सामान्य मनुष्यात ही बुद्धी प्रधान असते.
२ आ १. आवेगशील बुद्धीशी संबंधित ग्रहयोग : कुंडलीत ‘बुध’, ‘शुक्र’, ‘चंद्र’, ‘मंगळ’ आणि ‘राहू’ या ग्रहांमध्ये होणारे परस्परयोग (संबंध) हे आवेगशील बुद्धी दर्शवतात.
२ आ १ अ. ‘बुध’, ‘शुक्र’ आणि ‘राहू’ यांच्यातील परस्परयोग : कुंडलीत हा योग असल्यास व्यक्तीमध्ये अन्न, वस्त्र, धन, सुखसुविधा, भौतिक वस्तू आदी गोष्टींमधून सुख मिळवण्याची प्रवृत्ती प्रबळ असते.
२ आ १ आ. ‘बुध’, ‘मंगळ’ आणि ‘चंद्र’ यांच्यातील परस्परयोग : कुंडलीत हा योग असल्यास व्यक्ती इतरांवर वर्चस्व गाजवणे, स्वतःचे महत्त्व सिद्ध करणे, स्पर्धा करणे, विवाद करणे, मनाप्रमाणे वागणे आदी गोष्टींत सुख मानते.
२ आ १ इ. ‘शुक्र’, ‘मंगळ’ आणि ‘चंद्र’ यांच्यातील परस्परयोग : हा ग्रहयोग शारीरिक सुख, विलास, मनोरंजन, भावनिक संबंध, प्रसिद्धी आदींद्वारे सुखाची प्राप्ती दर्शवतो.
वरील ग्रहयोग कुंडलीत राशी आणि स्थाने यांच्या अनुसार प्रबळ असल्यास, तसेच ‘रवि’, ‘गुरु’ आदी सात्त्विक ग्रह निर्बल असल्यास व्यक्तीची बुद्धी आवेगशील असते. व्यक्तीचे अधिकांश जीवन चित्तातून येणारे आवेग आणि इच्छा यांच्या प्रभावाने चालते.

२ इ. तर्कबुद्धी (Rational mind) : आपण सामान्यतः ज्याला ‘बुद्धी’ म्हणतो, ती ‘तर्कबुद्धी’ होय. तर्कबुद्धीमध्ये निरीक्षण, वर्गीकरण, मोजमाप, विश्लेषण, तुलना आणि कारणमीमांसा करण्याची क्षमता असते. ही बुद्धी मनुष्याला पशूंपासून वेगळे करते. ती मनुष्याला अधिक स्वातंत्र्य देते. या बुद्धीच्या आधारे सृष्टीच्या भौतिक नियमांचा वस्तूनिष्ठ अभ्यास करता येतो. त्यामुळे विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजव्यवस्था घडवण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, विश्लेषक, सल्लागार, अभ्यासक आदींमध्ये ही बुद्धी प्रधान असते.
मनुष्यात विकसित झालेली ही बुद्धी विलक्षण आहे; पण तिलाही मर्यादा आहेत. तर्कबुद्धीद्वारे स्थूल जगताची कार्यप्रणाली कळली, तरी सूक्ष्म जगताच्या अस्तित्वाचा अनुभव येत नाही. ज्या गोष्टींचा पंचज्ञानेंद्रियांना वस्तूनिष्ठ पडताळा येतो, तेवढ्याच गोष्टी तर्कबुद्धीला सत्य वाटतात. ईश्वर, आत्मा, सूक्ष्मदेह, सूक्ष्म स्पंदने, सूक्ष्म लोक, आध्यात्मिक अनुभूती इत्यादी अतींद्रीय गोष्टी तिला अंधश्रद्धा वाटतात. त्यामुळे सूक्ष्म जगताचा अनुभव घेण्यासाठी तर्कबुद्धीच्या पुढील स्तरावर जाणे आवश्यक असते.
२ इ १. तर्कबुद्धीशी संबंधित ग्रहयोग : ‘रवि’, ‘बुध’, ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ या ग्रहांमध्ये होणारे परस्परयोग (संबंध) हे तर्कबुद्धी दर्शवतात.
२ इ १ अ. ‘बुध’, ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ यांच्यातील परस्परयोग : हा ग्रहयोग आकलनशक्ती, कुतूहल, नाविन्यता, संशोधकवृत्ती आणि विवेचनात्मक बुद्धी ही वैशिष्ट्ये दर्शवतो. हा ग्रहयोग असलेल्या व्यक्तीची बुद्धीमत्ता तीक्ष्ण असते. हा ग्रहयोग व्यक्तीला तंत्रज्ञान आणि संशोधन यांत गती देतो.
२ इ १ आ. ‘रवि’, ‘बुध’ आणि ‘गुरु’ यांच्यातील परस्परयोग : हा ग्रहयोग जिज्ञासा, अभ्यासूवृत्ती, कल्पकता, वक्तृत्व, दूरदृष्टी इत्यादी वैशिष्ट्ये दर्शवतो. हा ग्रहयोग अभ्यासक, सल्लागार आणि शिक्षक यांच्यासाठी पूरक असतो.
२ इ १ इ. ‘रवि’, ‘मंगळ’ आणि ‘गुरु’ यांच्यातील परस्परयोग : हा ग्रहयोग नेतृत्व, नियंत्रण, निर्णयक्षमता, धैर्य, महत्त्वाकांक्षा, तत्परता, समयसूचकता आणि संरचनात्मक बुद्धी ही वैशिष्ट्ये दर्शवतो. व्यवस्थापक, नेता, रणनीतीकार आदींसाठी हा ग्रहयोग अनुकूल आहे.
२ ई. उच्चबुद्धी (Higher mind) : सामान्य तर्कबुद्धी एखाद्या गोष्टीला स्वतंत्र समजून तिचे ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करते, तर उच्चबुद्धी ही त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन तिचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करते. थोडक्यात उच्चबुद्धी ही एखाद्या गोष्टीचे मूळ चित्र पहाते. ती घटनेमागे दडलेला सूक्ष्म अर्थ शोधते. ही बुद्धी विश्वातील सार्वत्रिक आणि शाश्वत तत्त्वे जाणण्याचा प्रयत्न करते. परिणामी ती सत्य, प्रीती, सद्भाव, न्याय, पवित्रता, नैतिकता, आनंद आदी उच्च मूल्यांचा पुरस्कार करते. तत्त्वज्ञ, विचारवंत, कवी, साहित्यिक आदींमध्ये ही बुद्धी प्रधान असते; मात्र या बुद्धीलाही मर्यादा आहेत; कारण ती विचारांच्या कक्षेत आहे. सत्याचे दर्शन होण्यासाठी या बुद्धीला विचारांची मर्यादा ओलांडून पुढे जाणे प्राप्त असते.
२ ई १. उच्चबुद्धीशी संबंधित ग्रहयोग : ‘गुरु’ आणि ‘शनि’ हे ग्रह प्रामुख्याने उच्चबुद्धीशी संबंधित आहेत. त्यांचे ‘बुध’, ‘शुक्र’, ‘रवि’ आदी ग्रहांशी होणारे योग महत्त्वाचे असतात.
२ ई १ अ. ‘बुध’, ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्यातील परस्परयोग : ‘बुध’ हा ग्रह प्राथमिक बुद्धिमत्तेचा कारक आहे. त्याचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्याशी योग असल्यास हा योग असलेल्या व्यक्तीची बुद्धी ही ‘उच्चबुद्धी’ असते. अशा व्यक्तीची चिंतनशीलता, विचारीपणा, संयम, सामंजस्य आदी वैशिष्ट्ये असतात. ही बुद्धी जीवनाचा अर्थ जाणण्यासाठी प्रयत्नरत असते. ती न्याय, एकता, बंधुभाव, दायित्व आदी मूल्यांना महत्त्व देते. ‘बुध’, ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्यातील परस्परयोग तत्त्वज्ञ अन् विचारवंत यांच्यासाठी पूरक असतो.
२ ई १ आ. ‘शुक्र’, ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्यातील परस्परयोग : ‘शुक्र’ हा ग्रह प्रेमाचा कारक आहे. त्याचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्याशी योग असल्यास हा योग असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात व्यापकता येते. अशा व्यक्तीची अलिप्तता, इतरांचा विचार करणे, सहानुभूती दाखवणे, परोपकार करणे, त्यागीवृत्ती आदी वैशिष्ट्ये असतात. ही व्यक्ती प्रीती, करुणा, सहिष्णुता, सद्भाव, सहकार्य, कृतज्ञता आदी मूल्यांना महत्त्व देते. ‘शुक्र’, ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्यातील परस्परयोग समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी अनुकूल असतो.
२ ई १ इ. ‘रवि’, ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्यातील परस्पर योग : ‘रवि’ हा सत्याच्या कारक आहे. त्याचा ‘गुरु’ आणि ‘शनि’ यांच्याशी योग असल्यास हा योग असलेली व्यक्ती सत्याची उपासक असते. तिची सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, तत्त्वनिष्ठता आदी वैशिष्ट्ये असतात. ती सतत परिवर्तनशील असणार्या जगाच्या पाठी असलेली अपरिवर्तनीय सत्ता जाणण्याचा प्रयत्न करते. तिचे लक्ष नेहमी मूळ उगमाकडे लागलेले असते. मूळ सत्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी ती धडपडत असते.’
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.४.२०२६)

सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
पाप-पुण्य
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
शरिराचा वरचा किंवा खालचा भाग येथे आलेली सूज न्यून करण्यासाठी करावयाचा सर्वसाधारण व्यायाम आणि त्याचा योग्य क्रम !
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !