
१. ‘श्रीकृष्णाने सुदाम्याला मायेचे स्वरूप दाखवणे’, याविषयीची कथा !
‘श्रीकृष्ण आणि सुदामा बालपणापासून मित्र होते. ते सांदीपनिऋषींच्या गुरुकुलात शिकत होते. एकदा सुदामा कृष्णाला म्हणाला, ‘‘मला मायेचे स्वरूप समजावून सांग.’’ निरागस आणि निर्मळ मित्राने जिज्ञासू वृत्तीने असा प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्णाला फार आनंद झाला. तेव्हा श्रीकृष्ण त्याला म्हणाला, ‘‘वेळ आल्यावर सांगतो.’’
त्यानंतर एकदा श्रीकृष्ण आणि सुदामा गोमती नदीच्या तिरावर अंघोळ करण्यासाठी गेले. अंघोळीच्या वेळी सुदामा नेहमीप्रमाणे ईश्वरभक्तीत आणि ध्यानात तल्लीन झाला होता. त्याच वेळी श्रीकृष्णाने त्याची माया दाखवली आणि अकस्मात् वातावरणात भयानक पालट झाला.
नदीला मोठा पूर आला आणि पाण्याचा प्रचंड लोंढा सुदाम्याला दूर वाहून नेऊ लागला. पाण्याशी संघर्ष करत असतांना सुदाम्याला नदीच्या एका वेगळ्याच किनारी गेल्यावर शुद्ध आली. त्या अनोळखी गावात नुकताच तिथल्या राजाचा मृत्यू झाला होता आणि तिथल्या परंपरेनुसार गावात सभा बोलावण्यात आली होती. त्या वेळी हत्ती त्याच्या सोंडेने ज्याला माळ घालील, त्याला राजा बनवले जाणार होते. सुदाम्याने सभेत प्रवेश करताच हत्तीने सुदाम्याला माळ घातली. लोकांनी लगेचच सुदाम्याचा राज्याभिषेक करून त्याला राजा बनवले. सुदाम्याचे लग्न झाले. तो त्या राजवाड्यातील ऐश्वर्यात रमून गेला. तो त्याचे मूळचे आयुष्य, श्रीकृष्ण, आश्रम इत्यादी सर्वकाही विसरून गेला. त्याला अनेक मुले झाली आणि तो राजवैभवाचा उपभोग घेऊ लागला.
काही वर्षांनंतर दैवयोगाने राणीचे निधन झाले. तिथल्या प्रथेनुसार राजालाही राणीच्या चितेवर जिवंत जाळण्याची सिद्धता चालू झाली. लोक सुदाम्याला स्मशानात घेऊन गेले. चिता पेटवण्यापूर्वी लोकांनी सुदाम्याला, म्हणजे राजाला नदीवर अंघोळ करून येण्यास सांगितले. तो नदीत डुबकी मारत असतांना त्याच क्षणी भानावर आला. क्षणार्धात सर्व दृश्य नाहीसे झाले. सुदाम्याने डोळे उघडले, तर तो गोमती नदीच्या तिरावरच उभा होता. तेव्हा श्रीकृष्ण प्रेमाने हसत त्याच्या समोर उभा होता. सुदाम्याला काहीच समजेना.
तेव्हा श्रीकृष्णाने सुदाम्याला अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले, ‘‘हे सुदामा, आता तू जी माया अनुभवलीस, तीच या संसाराची खरी माया आहे. माणसाला जेव्हा एखादी नवीन स्थिती, धन, कुटुंब किंवा अधिकार मिळतात, तेव्हा तो स्वतःच्या मूळ सत्यस्वरूपाला आणि ईश्वराला विसरून जातो. त्या खोट्या सुखातच स्वतःला धन्य मानतो आणि ते जेव्हा नष्ट होते, तेव्हा दुःखाच्या आगीत जळू लागतो. हीच भ्रम निर्माण करणारी माझी माया आहे.’’
२. वरील कथेवरून शिकायला मिळालेली सूत्रे
अ. ‘खरी शांती भौतिक सुखात नसून प्रभूची भक्ती आणि निष्काम कर्म करणे’, यांमध्ये आहे’, हे जीवनाचे सत्य सुदाम्याला कळल्यामुळे तो आयुष्यभर कोणत्याही प्रलोभनाला बळी पडला नाही.
आ. सुदामा श्रीकृष्णाचा बालपणीचा जीवलग मित्र असतांनाही तो दारिद्र्यात आणि प्रारब्धाने प्राप्त झालेल्या परिस्थितीत आनंदाने जीवन जगला; कारण श्रीकृष्णाने लहानपणीच त्याला मायेचे सत्य स्वरूप दाखवले होते.
इ. सुदाम्याने ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या ।’, म्हणजे ‘ब्रह्म हेच एकमेव सत्य असून अन्य सर्व मिथ्या आहे’, या तत्त्वानुसार आचरण केले. त्याचे जीवन दरिद्री आणि खडतर असूनही त्याच्या मनात कोणताही विकल्प आला नाही; कारण तो श्रीकृष्णाची भक्ती अन् चरण यांपासून दूर गेला नाही.
३. ‘श्रीकृष्णाने सुदाम्याला दाखवलेले मायेचे स्वरूप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सांगितलेले मायेचे स्वरूप अन् वाईट शक्तीचा प्रभाव’, यांमध्ये साम्य असणे
सध्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दैनिक ‘सनातन प्रभात’मधून साधकांना सूचना देऊन जागृत करत आहेत. त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवणार्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या षड्यंत्राला बळी न पडता जोमाने स्वतःची साधना वाढवा !’
‘श्रीकृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीतील श्रीकृष्णाने सुदाम्याला दाखवलेले मायेचे स्वरूप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सूचनेद्वारे सांगितलेले मायेचे स्वरूप अन् वाईट शक्तीचा प्रभाव’, यांमध्ये साम्य आहे. श्रीकृष्णाने निर्मळ सुदाम्याला मायेच्या मोहजालातून सोडवले. आता श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना ‘माया आणि वाईट शक्ती यांच्या प्रखर प्रभावाखालील माया’, यांविषयीच्या सत्याची जाणीव करून देत आहेत अन् जागृती करून त्यापासून रक्षण करत आहेत’, असे मला वाटते.
४. साधकांनो, गुरुदेवांवर दृढ श्रद्धा ठेवा !
साधकांनो, मायेतील कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका आणि शब्दशक्तीच्या माध्यमातून लिखाण अन् वाणी यांच्याद्वारे विकल्प पसरवणार्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या सापळ्यात अडकू नका ! श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून, सत्य जाणून जीवनभर साधनारत रहा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !’
– (पू.) शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे (समष्टी) संत, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.६.२०२६)
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात पुणे येथील शास्त्रीय गायक पंडित डॉ. संजय गरूड यांनी सादर केली गायनसेवा !
गुरुस्तवन भावांजली
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !