श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !

श्री विठ्ठल हे वारकर्‍यांच्या संप्रदायाच्या व्यापक तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत. विष्णु, कृष्ण, राम, विठ्ठल यांचा निर्विवाद ऐक्यसंबंध संप्रदायात लोकमान्य आहे. तो भक्तसखाही आहे. तसाच तो दीनांचा दयाळू, भक्तवत्सल, कृपाळू, भक्तकामकल्पद्रुम आहे. स्वतः संत निवृत्तीनाथांनीच सांगितले आहे, ‘नंदाघरी नांदणारा कृष्णच विठ्ठलरूपात आला आणि विटेवर उभा राहिला.’ भक्तासाठी तो तसाच सतत युगानयुगे उभाच आहे. श्रीकृष्ण जन्म श्रावण कृष्ण अष्टमीस रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री बुधवारी झाला म्हणून विठ्ठलभक्त बुधवार हा विठ्ठलाचा वार मानतात आणि कधीही बुधवारी पंढरपुरातून परतत नाहीत. श्रीविष्णूशी संबंधित एकादशी व्रत ते निष्ठेने करतात आणि विष्णुप्रिय तुळस त्यांना अत्यंत प्रिय असते. (साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, सौ. मालतीबाई नवाथे ट्रस्ट यांच्या अनुमतीने)