‘मी वर्ष २००० पासून पुणे शहरात पूर्णवेळ सेवा करत होतो आणि पुढे मी वर्ष २००१ मध्ये फोंडा, गोवा येथील सुखसागर सेवाकेंद्रात सेवेला आलो. मी पुणे येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह सेवा करतांना आणि पुढे काही सेवा शिकत असतांना त्यांनी वेळोवेळी साधनेविषयी महत्त्वपूर्ण सूत्रे सांगितली. या सूत्रांच्या माध्यमातून साधनेच्या विविध पैलूंचे संस्कार झाले. यातून माझ्या लक्षात आले की, हे सर्व प्रसंग माझी आध्यात्मिक उन्नती करण्यासह गुरुकृपा दर्शवणारेच होते. ते प्रसंग येथे देत आहे. त्यामुळे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयीच्या भावमोतींमधून गुरुकृपा कशी कार्य करते ?’, ते कळेल.

१. यज्ञ झाल्यावर पूर्ण आवराआवर झाली नाही, तर देव यज्ञाचे पूर्ण फळ देत नसल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे

मी सुखसागर सेवाकेंद्रात असतांना प्रत्येक पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी कानिफनाथ यांच्यासंबंधी एक यज्ञ सूर्याेदयापूर्वी केला जात असे. अशाच एका यज्ञानंतर मी ध्यानमंदिरातील देवतांची पूजा आणि आरती केली. त्यानंतर थोड्याच वेळात प्रत्येक बुधवारी होणारा प.पू. डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) सत्संगाची सिद्धता असल्याने माझ्याकडून यज्ञानंतरचे आवरण्याचे शेष होते. प.पू. डॉक्टर सत्संगाला आल्यानंतर त्यांनी ध्यानमंदिरातील देवतांचे दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी यज्ञानंतरचे साहित्य आवरण्याचे शेष राहिल्याचे बघितले. ते मला म्हणाले, ‘‘यज्ञ झाल्यावर पूर्ण आवराआवर झाली नाही, तर देव यज्ञाचे पूर्ण फळ देत नाही. त्यामुळे यज्ञ परिसर आवरणे आणि यज्ञातील भांडी पूर्ण स्वच्छ करून जागेवर ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यातून परिपूर्णता येते.’’ तेव्हापासून यज्ञ झाल्यानंतर यज्ञाची भांडी धुऊन आणि पुसून ठेवणे अन् अन्य गोष्टी त्या त्या वेळी पूर्ण करण्याचा संस्कार माझ्यावर झाला.
२. साधकांना सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि नामजप न केल्यास त्याचा त्रास मला होत असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
एकदा मी काही साधकांच्या आध्यात्मिक त्रासाविषयी आणि त्यांच्या साधनेविषयी प.पू. डॉक्टरांना सांगत होतो. त्या वेळी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘साधकांना सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि नामजप न करणे यांमुळे त्यांचा त्रास तर वाढतोच; पण मलाही त्रास होतो; कारण साधकांचा आध्यात्मिक त्रास वाढू नये, यासाठी मला सूक्ष्मातील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावे लागतात आणि वाईट शक्तींची आक्रमणे साधकांसह माझ्यावरही अधिक प्रमाणात होतात. त्यामुळे साधकांनी प्रतिदिन त्यांना सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि नामजप पूर्ण करायला हवेत.’’ यावरून ‘प.पू. डॉक्टरांची साधकांवरील प्रीती आणि साधकांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय किती गांभीर्याने करायला हवेत ?’, ते लक्षात येते.
३. साधना न करणार्या जिवावरही साधनेचे बिजारोपण करणारे प.पू. डॉक्टर !
सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात एक मोठे उद्योगपती आश्रम पहायला आले होते. प.पू. डॉक्टरांची त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा प.पू. डॉक्टर त्यांना साधना करण्याविषयी सांगत होते. त्या उद्योजकांच्या पत्नी आणि त्यांच्या समवेत आलेले चालक या दोघांचा कल साधनेकडे होता. प.पू. डॉक्टरांनी त्या दोघांनी करावयाचा नामजप आणि साधनेचा भाग सांगितला. ते उद्योजक गेल्यानंतर मी प.पू. डॉक्टरांना विचारले, ‘‘त्या उद्योजकांचा साधनेकडे कल नव्हता, तरी आपण त्यांना साधना सांगायची का ?’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘आपल्याकडे कुणीही आले, तरी आपण त्यांच्यासाठीचा साधना मार्ग सांगायचा; कारण आपण साधना सांगितल्याने त्यांच्या मनावर साधनेचे बीज रोवले जाऊन त्याचा संस्कार होईल. या जन्मात शक्य झाले नाही, तर पुढच्या जन्मात तरी ते साधना करतील.’’ यातून प.पू. डॉक्टरांची प्रत्येक जिवाने साधना करण्याविषयीची तळमळ आणि प्रत्येकावरची कृपावत्सलता दिसून येते.
पू. सखदेवआजी यांची प.पू. डॉक्टरांनी त्यांच्या निवासाच्या खोलीत येऊन भेट घेणे आणि ‘देव भक्ताच्या भेटीला येऊ शकतो’, असे सांगणे

अनुमाने वर्ष २००५ मध्ये सौ. सखदेवआजी (आताच्या देहत्याग केलेल्या सद्गुरु सौ. सखदेवआजी) रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आल्या होत्या. त्यांची रहाण्याची व्यवस्था आश्रमाच्या तळमजल्यावर केली होती. त्या जाण्याच्या आदल्या दिवशी प.पू. डॉक्टर सौ. सखदेवआजींना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत आले होते. त्या वेळी सौ. सखदेवआजी म्हणाल्या, ‘‘तुम्ही मला भेटण्यासाठी खाली कशाला आलात ? तुमची प्राणशक्ती न्यून असते.’’ त्यावर प.पू. डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘देव भक्ताच्या भेटीला कुठेही येऊ शकतो. तुमची भेट मला महत्त्वाची आहे.’’
– श्री. भूषण कुलकर्णी
४. अनावश्यक बोलण्याने जीभेची २ टक्के शक्ती व्यय होत असल्याचे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
आश्रमात काही वेळा साधकांकडून अनावश्यक बोलण्याचा भाग व्हायचा. हा भाग प.पू. डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर ते त्या साधकांना अनावश्यक बोलणे टाळण्यासाठी स्वयंसूचना घेण्यास सांगायचे, तसेच ते साधकांना ‘अनावश्यक बोलण्याने जिभेची २ टक्के शक्ती व्यय होते’, असेही सांगायचे.
५. रामनाथी आश्रमात सर्व साधक स्थलांतरित झाल्यावर प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना सेवेच्या कक्षात भेटी देऊन विचारपूस करणे
सुखसागर सेवाकेंद्रातून रामनाथी येथील आश्रमात सर्व साधकांचे संपूर्णपणे स्थलांतर झाल्यावर प.पू. डॉक्टर आश्रमात रहाण्यास आले. त्या वेळी रामनाथी येथील आश्रमात आल्यावर प्रथम प.पू. डॉक्टर स्वयंपाकघरासह संगणकीय सेवा करणार्या सर्व साधकांना त्यांच्या त्यांच्या जागेवर जाऊन भेटले आणि ‘त्यांना (साधकांना) अपेक्षित अशी व्यवस्था झाली आहे ना ?’, याची निश्चिती करून घेतली अन् त्यांची विचारपूसही केली.
प.पू. डॉक्टरांनी साधकांनी ‘प्रथम गुरुसेवक म्हणून आश्रमसेवा करणे आवश्यक आहे’, असे सांगणे

एकदा रामनाथी येथील आश्रमात विविध आश्रमसेवांसाठी साधकसंख्या न्यून असल्याचे सांगितले. त्यावर प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘साधकांनी गुरुसेवक म्हणून आश्रमसेवेला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. विभागसेवा उत्तरदायी साधकांना प्राधान्य विचारून त्याही करायला हव्यात. कोणताही साधक हा प्रथम गुरुसेवक असतो, मग तो साधक असतो. साधक गुरूंच्या आश्रमात रहात असल्याने त्याने आश्रमसेवा करायला हव्यात. आश्रमसेवा करणार्या साधकाने जर सकाळी उठल्यावर अंघोळीसाठी पाणी गरम केले नाही वा अल्पाहार करणार्या साधकाने अल्पाहार सिद्ध केलाच नाही, तर आपण पुढे विभागसेवा करू शकतो का ? गुरूंचे ऋण साधना करून आनंदी रहाणे आणि मोक्षाला जाणे. यातून गुरूंचे ऋण आश्रमसेवा करूनही फेडता येईल. साधकांसाठी गुरु जे करतात, ते फेडण्यासाठी साधकांनी कितीही सेवा अथवा कृतज्ञता व्यक्त केली, तरी गुरुऋण फेडले जाऊ शकत नाही.’’
– श्री. भूषण कुलकर्णी
६. एका कामगाराने दत्तजयंतीच्या दिवशी प.पू. डॉक्टरांना ‘तुमच्यातच श्री गुरुदेव दत्त भेटले’, असे म्हणून त्यांना वाकून नमस्कार करणे
रामनाथी येथील आश्रमाचे बांधकाम चालू असतांना काही कामगार छत्रपती संभाजीनगर येथून आले होते. त्यापैकी २ जणांचा प.पू. डॉक्टरांविषयी पुष्कळ भाव होता. एक दिवस प.पू. डॉक्टर सकाळी नेहमीप्रमाणे बांधकामाची पहाणी करत असतांना त्यातील एक कामगार त्यांच्यासमोर आला. त्यांना बघताच प.पू. डॉक्टर त्यांना म्हणाले होते, ‘‘आज दत्तजयंती आहे. तुम्ही इतर कामगारांसह दत्त मंदिरात गेला नाहीत.’’ त्यावर तो कामगार प.पू. डॉक्टरांना म्हणाला, ‘‘मला तुमच्या रूपात श्री गुरुदेव दत्त येथेच भेटले. त्यामुळे दत्त मंदिरात जाऊन काय करू ?’’ नंतर त्याने प.पू. डॉक्टरांना वाकून नमस्कार केला.
७. रामनाथी, गोवा येथील आश्रम झाल्यावर ‘साधकांसाठी विविध विषयांची शिबिरे घेऊन साधकांमध्ये साधकत्व आणूया !’, असे प.पू. डॉक्टरांनी सांगणे
मी एकदा गोवा राज्यातील साधकांच्या साधनेविषयी प.पू. डॉक्टरांना काही सूत्रे सांगत होतो. ती सूत्रे ऐकून प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘प्रसारातील साधकांमध्ये साधकत्व निर्माण होणे आवश्यक आहे. साधकांच्या साधनेचा पाया (म्हणजे व्यष्टी साधना) पक्का व्हायला हवा. त्यासाठी रामनाथी आश्रम झाल्यावर पुढे साधकांची विविध विषय आणि सेवांच्या अनुषंगाने शिबिरे घेऊ अन् साधकांच्या साधनेचा, तसेच कार्याचा पायाही पक्का करू.’’ (प.पू. डॉक्टरांच्या द्रष्टेपणामुळे आजही साधकांमध्ये साधकत्व आणि साधनेचा पाया पक्का करण्यासाठीची शिबिरे रामनाथी येथील आश्रमात होत असतात. – संकलक)
(क्रमश:)
– श्री. भूषण कुलकर्णी, फोंडा, गोवा. (११.७.२०२६)
हिंदूंनो, ‘लव्ह जिहाद’ला त्याच भाषेत तोंड देण्याचा विचार कदापि करू नका !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !