सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेले पालट आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !

‘वयोमानानुसार आता मला बाहेर कुठे जाणे शक्य होत नाही. खोलीतच माझे ग्रंथ-लिखाणाचे कार्य चालू आहे. असे असतांना देव मला माझ्या खोलीतच नवनवीन विषय शिकवत आहे. सध्या माझ्या देवघरातील देवतांच्या चित्रांमध्ये सकारात्मक पालट होतांना दिसत आहेत. आजवर ऐकिवात नसलेले असे विषय देव शिकवत आहे. केवळ नवीन विषय शिकायला मिळाला, असे न होता त्याचे संशोधनही करता येत आहे. देव इतके देऊन थांबलेला नाही, तर देव त्यांचे शास्त्रही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या माध्यमातून सांगत आहे. हे सर्वकाही शिकवतांना देव त्यातील विविध बारकाव्यांनिशी शिकवत आहे, उदा. देवघरामध्ये अनेक चित्रे/मूर्ती आहेत; पण पालट सहजतेने लक्षात यावेत; म्हणून सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या मोठ्या प्रतिमेत त्याने प्राधान्याने पालट घडवून आणले. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष गेले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

या प्रतिमेचे चित्रीकरण केले आहे आणि दिवसेंदिवस जसे पालट दिसत गेले, त्यानुसार छायाचित्रेही काढली आहेत. जेणेकरून पुढील काळातील जिज्ञासूंना त्याचा अभ्यासही करता येईल. केवळ ‘समष्टीला अध्यात्मशास्त्राचे असे विविध पैलू कळावेत’, यासाठी देव इतके सर्वकाही देत आहे. त्यामुळे ‘ते समाजापर्यंत पोचवणे’, ही आमची साधनाच आहे; म्हणून हा लेख ‘सनातन प्रभात’मधून प्रकाशित करत आहोत.

या लेखात माझ्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत वर्ष २०१४ पासून आतापर्यंत झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण केले आहे. ‘या लेखामुळे देवतांच्या मूर्तींमध्ये होणार्‍या पालटांमागील शास्त्र वाचकांना समजून त्यांची देवावरील श्रद्धा वृद्धींगत होवो’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’  

(भाग १)

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२६.६.२०२६)  

सूक्ष्मातील प्रयोगाचे उत्तर !

मुखावर स्मितहास्य आणि प्रसन्न भाव असलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची वैशिष्ट्यपूर्ण प्रतिमा !

‘एखादी व्यक्ती प्रत्यक्ष हसावी आणि तीही कुटुंबातील सदस्य असावी, अशा प्रकारे प्रेमाने बघत सूर्यदेवाचे हसणे आहे. हे हास्य तात्कालिक नसते, तर दिवसभर असते. असे हास्य आणि प्रेम सर्वसामान्य मनुष्याच्या चेहर्‍यावरही नसते. सूर्यदेवाकडे बघून प्रसन्न वाटते आणि त्याच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य पाहून आपल्या चेहर्‍यावरही हसू येते. ‘तो प्रेमळ दृष्टीने आपल्याकडे पहात आहे’, असे जाणवते. त्याच्याकडे पाहून आपली भावजागृती होते. सर्वसाधारणतः भक्ताच्या डोळ्यांत देवाप्रती भाव असतो. येथे सूर्यदेवाच्या डोळ्यांमध्ये भाव जाणवतो.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (११.७.२०२६)

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी संस्कारित केलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ‘माझे महामृत्यूयोग टळावेत, सनातनच्या साधकांवर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे दूर व्हावीत, सनातनचे सर्व संकटांपासून रक्षण व्हावे आणि ईश्वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी अनेक अनुष्ठाने, जप-तप इत्यादी केले, तसेच वेळोवेळी आध्यात्मिक स्तरावरील विविध उपायही करण्यास सांगितले. त्यांपैकी एक उपाय, म्हणजे धातूने बनवलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची संस्कारित प्रतिमा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात लावण्यासाठी देणे होय.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी ३० जानेवारी २०१४ या दिवशी उपायांसाठी दिलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा माझ्या खोलीत ठेवण्यात आली. एप्रिल २०१४ मध्ये त्यांनी उपायांसाठी दिलेली सूर्यदेवाच्या चेहर्‍याची दुसरी प्रतिमा सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाच्या कलामंदिरात (‘स्टुडिओ’ असलेल्या इमारतीमध्ये) लावण्यात आली.


सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत टप्प्याटप्प्याने झालेल्या पालटांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेली निरीक्षणे !

‘माझ्या खोलीत माझ्या पलंगासमोर; पण थोडे उजव्या बाजूला देवघर आहे. देवघरात सूर्यदेवाच्या चेहर्‍याची प्रतिमा आहे. मी बहुतांश वेळ पलंगावर पडून वाचन करत असतो. त्यामुळे माझी दृष्टी सहजतेने देवघराकडे जाते. ‘देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत पालट होत आहेत’, हे लक्षात आल्यावर मी सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेचे निरीक्षण करण्यास प्रारंभ केला. माझ्या लक्षात आलेले पालट मी नोंद करून ठेवले. ‘माझ्या लक्षात आलेले पालट साधकांनाही अनुभवण्यास मिळत आहेत का ?’, याची निश्चिती मी करत असे आणि त्यानंतर त्याची नोंद करत असे. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत त्याची कृपास्वरूप आध्यात्मिक पालट होत आहेत.

२९.८.२०२१ पासून सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत टप्प्याटप्प्याने होत गेलेले पालट पुढे दिले आहेत.

सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेला नमस्कार करताना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सूर्यदेवाच्या चेहर्‍यातील पालट

१. चेहरा प्रसन्न वाटणे : वर्ष २०१४ पासून २८.८.२०२१ या कालावधीत सूर्यदेवाचा चेहरा मारक आणि गंभीर दिसत असे. २९.८.२०२१ या दिवशी सूर्यदेवाचा चेहरा प्रसन्न वाटू लागला. या प्रतिमेतील सूर्यदेवाचे मुख मोठे असले, तरी ते उग्र वाटत नव्हते. उलट त्याच्याकडे पाहिल्यावर मला प्रसन्न वाटले. त्यानंतर सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रसन्नतेत उत्तरोत्तर वाढ होत गेल्याचे लक्षात आले.

२. प्रेमळ रूप : १.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाकडे कोणत्याही दिशेने बघितले, तरी ‘आपल्याला त्याचे प्रेमच मिळत आहे’, असे जाणवले. सर्वसामान्यतः सूर्यदेवाचे मारक (रजप्रधान) रूप प्रचलित आहे. असे असतांना त्याचे हे प्रेमळ रूप दिसले.

३. निरागसता जाणवणे

अ. १.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍याकडे बघितल्यावर तो लहान बाळासारखा दिसला. ‘त्याला लगेच उचलून घ्यावे’, असे वाटले.

आ. ५.६.२०२६ या दिवशी मला त्याच्या चेहर्‍यावरील हास्य लहान मुलाप्रमाणे जाणवले.

४. आनंद जाणवणे

अ. २९.८.२०२१ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍याकडे पाहिल्यावर मला आनंद जाणवला. त्यानंतर त्याच्याकडे पाहून आनंद वाटण्याचे प्रमाण वाढले.

आ. १३.४.२०२६ या दिवशी त्याच्याकडे पाहिल्यावर आनंद जाणवला आणि माझाही चेहरा प्रसन्न होऊन माझ्या चेहर्‍यावर सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील स्मितहास्याप्रमाणे हास्य आले.

इ. १९.६.२०२६ या दिवशी माझ्या मनात विचार आला, ‘मनुष्याला त्याच्या प्रिय अशी घटना घडल्यावर आनंद होतो. देव तर सत्-चित्-आनंद अवस्थेत असतो. त्यामुळे त्याच्याकडे कधीही बघितले, तरी आनंदच जाणवतो.’

ई. २८.६.२०२६ पूर्वी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावर आनंद जाणवत होता; पण २८.६.२०२६ या दिवशी मला तो आनंद अनुभवता आला.

५. हात जोडले जाणे : ३०.६.२०२६ या दिवशी त्याच्याकडे बघितल्यावर माझे हात लगेच जोडले गेले.

६. ‘चेहर्‍याकडे बघत रहावे’, असे वाटणे : १२.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍यावरील हास्य आणि प्रेम यांमुळे ‘त्याच्याकडे सतत बघत रहावे’, असे मला वाटले. एखाद्या प्रसन्न चेहर्‍याच्या व्यक्तीकडे बघण्यापेक्षाही त्याच्याकडे बघणे, अधिक चांगले वाटले.

७. हावभाव पालटणे : १२.६.२०२६ या दिवशी ‘त्याच्याकडे केवळ बघणे, त्याला नमस्कार करणे, त्याला प्रार्थना करणे अथवा त्याच्याकडे बघून नामजप करणे’, यांनुसार त्याच्या चेहर्‍यावरील हावभाव पालटत आहेत’, असे मला जाणवले.

सूर्यदेवाच्या दृष्टीतील पालट

१. ७.३.२०२२ या दिवशी ‘सूर्यदेव उजव्या डोळ्याने आपल्याकडे बघत आहे आणि डाव्या डोळ्याने वर बघत आहे’, असे जाणवले. त्यापूर्वी सूर्यदेवाची दृष्टी ‘वरच्या दिशेने आहे’, असे जाणवत होते.

२. प्रेमळ दृष्टी

अ. ३.३.२०२४ या दिवसापासून ‘सूर्यदेव आपलेपणाने अन् प्रेमाने माझ्याकडे बघत आहे’, असे मला जाणवले.

आ. २.६.२०२५ या दिवशी सूर्यदेवाने बघणे हे ‘एखाद्या देवाने त्याच्या भक्ताकडे प्रेमाने बघण्या’सारखे वाटले.

३. आपल्या हालचालीप्रमाणे सूर्यदेवाची दृष्टी फिरल्याचे जाणवणे

अ. ९.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाकडे कोणत्याही दिशेने बघितले, तरी सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या बाजूची किरणांची प्रभावळ न हालता ‘केवळ चेहरा हलून आपल्याकडे बघत आहे’, असे दिसले.

आ. १२.६.२०२६ या दिवशी ‘त्याच्या समोर उभे राहून आजूबाजूला गेल्यास त्याची दृष्टी अथवा काही वेळा त्याचा चेहराही आपल्या हालचालीप्रमाणे फिरतो’, असे दिसले.

४. सूर्यदेव माझ्याकडे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे) पहात असल्याचे जाणवणे

४ अ.  २६.६.२०२६

१. सर्वसाधारणतः ‘सूर्यदेव माझ्याकडे बघत आहे’, असे मला वाटते. माझ्या पलंगाच्या मागे, म्हणजेच डोक्याकडे कुणी उभे राहिले, तर त्यांनाही ‘सूर्यदेवाचे डोळे माझ्याकडे बघत आहेत’, असेच दिसते.

२. सूर्यदेवाकडे प्रथमदर्शनी बघता ‘त्याची दृष्टी सरळ आहे’, असे दिसते. ती त्या प्रतिमेची स्थूल दृष्टी आहे. मी त्या प्रतिमेकडे थोडा वेळ बघत राहिलो की, ‘सूर्यदेवाची दृष्टी मी उभा आहे, तिकडे आहे’, असे लक्षात येते.’

सूर्यदेवाच्या डोळ्यांची उघड-झाप होत असल्याचे जाणवणे

१. ‘१.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाकडे बघतांना काही वेळा त्याचा केवळ उजवा डोळा, काही वेळा केवळ डावा डोळा, तर काही वेळा दोन्ही डोळ्यांची उघड-झाप होतांना दिसली. डोळे उघड-झाप होण्याचा कालावधी हा एकसमान नसून त्यामध्ये पालट होत असल्याचे जाणवले.

२. ३.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवतेचे डोळे आणि ओठ यांकडे बघत असतांना ‘त्याच्या डोळ्यांच्या पापण्या प्रत्येक १५-२० सेकंदांनी सावकाश बंद होतात अन् लगेच सावकाश उघडतात’, असे लक्षात आले.

३. ८.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या डोळ्यांकडे बघितल्यावर ते उघडे दिसत होते; परंतु त्याचे ओठ आणि हनुवटी यांच्याकडे बघितल्यावर डोळे बंद झाल्यासारखे वाटत होते.

४. ९.६.२०२६ या दिवशी त्याचे डोळे अर्धवट बंद होतांना दिसले.

५. १२.६.२०२६ या दिवशी काही वेळा त्याचे डोळे उघडे; पण ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे जाणवले.

६. १९.६.२०२६

अ. सूर्यदेवाचे डोळे बंद असण्याचा कालावधी साधारण ४ – ५ सेकंद आणि उघडे असण्याचा कालावधी १ मिनिट होता.

आ. स्वतःचे डोळे बंद करून उघडतांना सूर्यदेवाकडे बघितल्यास ‘त्याचेही डोळे उघडत आहेत’, असे जाणवले; पण त्याच वेळी अन्य कुणी त्याच्याकडे बघत असल्यास त्याला सूर्यदेवाचे डोळे उघडे असल्याचेच दिसले.

७. २०.६.२०२६ या दिवशी ‘सूर्यदेवाचा उजवा डोळा एक मिनिटात ६ – ७ वेळा बंद होऊन उघडतो, तर डावा डोळा केवळ एकदा बंद होऊन उघडतो’, असे लक्षात आले. डोळ्यांची उघडझाप होतांना चेहर्‍यावर अन्य काही पालट दिसून आले नाहीत.

८. २२.६.२०२६

अ. सूर्यदेवाचे डोळे एका मिनिटात साधारण २ सेकंद बंद होते, तर २० – २५ सेकंद उघडे रहात होते.

आ. ‘सूर्यदेवाचे हास्य वाढले, तरी त्याचा डोळ्यांची उघड-झाप होण्यावर काही परिणाम होत नाही’, असे लक्षात आले.

९. २६.६.२०२६ या दिवशी सूर्यदेवाच्या दोन्ही डोळ्यांची उघडझाप साधारण ३० – ४० सेकंदांनी होत होती.

सूर्यदेवाच्या ओठांची हालचाल जाणवणे

१. २३.५.२०२६ या दिवशी सूर्यदेवाचा खालचा ओठ आधीच्या तुलनेत थोडा अधिक प्रमाणात खाली आल्यासारखा जाणवला.

२. १.६.२०२६

अ. सूर्यदेवाच्या हनुवटीकडे लक्ष दिल्यावर त्याचा खालचा ओठ खाली येतांना दिसला आणि त्याच वेळी ‘त्याच्या डोळ्यांच्या पापण्या मिटत आहेत’, असे दिसले.

आ. काही वेळा ओठांची हालचाल होतांना त्याचे दात अथवा जिभेचे टोकही दिसले.

३. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे लक्ष वेधले जाणे : सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेमध्ये झालेल्या पालटांमुळे १९.६.२०२६ या दिवसापासून माझे लक्ष त्याच्याकडे सतत वेधले जाते. वाचन करतांनाही माझे लक्ष त्याच्याकडे गेले, तर माझे वाचन करायचे राहून जाते. त्यामुळे गेल्या काही दिवसांत माझे वाचन न्यून झाले आहे.

४. प्रभावळ दिसणे : २३.५.२०२६ या दिवशी मला सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेभोवती प्रभावळ दिसली.

सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेकडे बघून ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करतांना जाणवलेली सूत्रे

सूर्यदेवाप्रती कृतज्ञता म्हणून मी प्रतिदिन १ माळ ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप करण्यास आरंभ केला. हा नामजप करतांना मला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. २.६.२०२५ या दिवशी सूर्यदेवाचा नामजप करत त्याच्या प्रतिमेतील कपाळ, डोळे, नाक, ओठ आणि हनुवटी यांच्याकडे बघितल्यावर केवळ हनुवटीकडे बघतांना त्याच्या पापण्यांची सावकाश उघड-झाप होतांना दिसली अन् खालचा ओठ आणखी खाली आल्यासारखे वाटले.

२. ३.६.३०२५ या दिवशी सूर्यदेवाच्या चेहर्‍याकडे बघून ‘श्री सूर्यदेवाय नमः ।’ हा नामजप केल्यावर त्याच्या चेहर्‍यावर हास्य जाणवले आणि मलाही तो आनंद जाणवू लागला.

३. ७.६.२०२६ या दिवशी नामजप करण्यास आरंभ केल्यावर त्याच्या चेहर्‍यावरील हास्य आणि आनंद वाढला. त्यानंतर त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्याप्रमाणे जाणवले. त्याच्या पालटणार्‍या भावांमुळे त्याच्याकडे बघणार्‍यांचीही भावजागृती होत होती.

४. २८.६.२०२६ या दिवशी त्याच्याकडे बघून नामजप केल्यावर त्याच्या चेहर्‍यामध्ये पालट झाल्याचे जाणवले. त्या वेळी सूर्यदेवाकडे बघणार्‍या अन्य साधकांनाही त्याच्या चेहर्‍यावर प्रसन्नता आणि त्याचे हास्य वाढल्याचे जाणवले. त्याचे डोळे अधिक पाणीदार होऊन बघणार्‍या साधकाच्याही डोळ्यांत पाणी आले.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले (२८.६.२०२६)                                             (क्रमशः)

पुढील अंकात (२५.७.२०२६) वाचा…

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेच्या संदर्भात त्यांनी केलेले प्रयोग आणि त्यांची निरीक्षणे !

२. सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सनातनच्या सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे

३. पौर्णिमा जवळ आल्यावर सूर्यदेवाच्या चेहर्‍याच्या प्रतिमेत झालेले पालट !

साधक आणि वाचक यांना आवाहन !

देवतांची उपासना केल्यावर भक्ताच्या भक्तीनुसार त्या देवतेच्या मूर्तीमध्येही पालट होण्याचे हे एक उदाहरण आहे. अशा प्रकारे साधक अथवा वाचक यांना अन्य काही उदाहरणे यांची माहिती असल्यास त्याचे छायाचित्र आणि त्याची सविस्तर माहिती लिहून पाठवावी.

माहिती पाठवण्यासाठी इमेल पत्ता : [email protected]

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक