सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

१. आईसमवेत रुग्णालयात गेल्यावर भूक लागणे आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केल्यावर भुकेची जाणीव न रहाणे आणि ‘आपत्काळात काही खाण्या-पिण्यासाठी मिळाले नाही’, तरीही ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केल्यास त्वरित भूक शमणार आहे’, असे साधिकेला वाटणे 

सुश्री कल्याणी गांगण

‘आम्ही आईला नेहमीच्या शारीरिक तपासणीसाठी पुणे येथील आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेलो होतो. मी रुग्णालयात जाण्यापूर्वी अल्पाहार केला होता. एका आधुनिक वैद्यांनी आईची तपासणी केल्यावर नंतर एका हाडांच्या आधुनिक वैद्यांकडे आईला नेण्यासाठी आम्ही थांबलाे होतो. बाहेर गेल्यावर मला शक्यतो भूक लागत नाही; मात्र दुपारी १२ वाजता मला अकस्मात् पुष्कळ भूक लागली. मला भूक सहन होत नव्हती. मी बाहेर गेल्यावर बाहेर बनवलेले खाद्यपदार्थ खात नाही. त्या वेळी मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू केला. मी हा नामजप चालू केल्यावर मला भुकेची जाणीव राहिली नाही. ‘आपत्काळात काही खाण्या-पिण्यासाठी मिळाले नाही’, तरीही ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केल्यास त्वरित भूक शमणार आहे’, असे मला वाटले.

२. लांजा (रत्नागिरी) येथे जाण्याच्या आदल्या दिवशी अकस्मात् गारांचा पाऊस पडणे आणि वातावरण भयानक होणे 

आम्ही रुग्णालयात जाऊन आल्यावर दुसर्‍या दिवशी लांजा (रत्नागिरी) येथे जाणार होतो. आम्ही पुणे येथून निघायच्या आदल्या दिवशी ऊन होते. अकस्मात् दुपारी ४ वाजता मला खडखड असा आवाज यायला लागला. मी बाहेर पाहिले, तर गारांचा पाऊस पडत होता. सगळीकडे खड्याच्या आकाराच्या गारा पडल्या होत्या. मी गारांचा पाऊस प्रथमच पहात होते. त्या वेळी बाहेर भयानक वातावरण निर्माण झाले होते. ३० मिनिटे गारा पडत होत्या.

२ अ. ‘वातावरणात पालट होणे’, हा आश्रमात सेवेसाठी जाण्यातील अडथळा आहे’, हे लक्षात येऊन ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करणे आणि भ्रमणभाषवर ‘हनुमानचालिसा’ अन् ‘मारुतिस्तोत्र’ लावल्यावर पाऊस पडायचा थांबणे : मी आकाशाकडे पाहिल्यावर मला आकाशात विचित्र चेहरे दिसत होते. एक क्षण असा होता की, ‘मोठा ढग खाली कोसळणार आहे’, असे वाटून मला भीती वाटली. माझ्या मनात ‘वातावरण असेच राहिले, तर मला इथेच रहावे लागेल आणि मला रामनाथी (गोवा) येथे जाता येणार नाही’, असा विचार आला. मला तातडीच्या सेवेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात त्वरित जायचे होते. ‘वातावरणात पालट होणे’, हा आध्यात्मिक अडथळा आहे’, हे भगवंताच्या कृपेने माझ्या लक्षात आले. तेव्हा मी मनात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप चालू केला आणि ‘हनुमानचालिसा’ अन् ‘मारुतिस्तोत्र’ भ्रमणभाषवर लावले. तेव्हा लगेच गारांचा पाऊस थांबून वातावरण निवळले. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आपत्काळानुसार साधकांना ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करायला आणि श्रीरामरक्षा, मारुतिस्तोत्र किंवा हनुमानचालिसा का म्हणायला सांगितले आहे’, यामागचा कार्यकारणभाव माझ्या लक्षात आला.’

– सुश्री कल्याणी गांगण (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४६ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.६.२०२६)