श्रीरामरक्षास्तोत्रात ‘एकटेपणा जाणवणे’ आणि ‘असुरक्षित वाटणे’ या समस्यांच्या निवारणाचा उपाय असणे 

‘एखादी व्यक्ती तिचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र यांपासून दूर असते. त्यामुळे तिला एकटेपणा जाणवतो, तसेच तिला ‘नोकरी जाणे, इतरांशी तुलना करणे, आर्थिक हानी होणे, मृत्यूची भीती वाटणे’ यांमुळे तिच्या भविष्यकाळाविषयी चिंता वाटते. परिणामी तिला जीवनात असुरक्षितता वाटते. श्रीरामरक्षास्तोत्रात अशा समस्यांचे निवारण होण्यासाठी पुढील श्लोक दिला आहे.

सनातनच्या लघुग्रंथाचे मुखपृष्ठ

माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ।
सर्वस्वम् मे, रामचन्द्रो दयालुर्,
नान्यञ् जाने, नैव जाने न जाने ॥ ३० ॥

श्री. राम होनप

अर्थ : राम माझी माता, राम माझे पिता, राम माझा स्वामी, राम माझा सखा आहे. दयाळू रामचंद्र हे माझे सर्वस्व आहे. ‘रामाविना मी अन्य काहीही जाणत नाही’, असे मी त्रिवार सांगतो.

वरील श्लोक मनोभावे आणि अर्थ समजून ३ वेळा म्हटला, तरी व्यक्तीला जाणवणारा एकटेपणा आणि असुरक्षितता न्यून होण्यास साहाय्य होते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.६.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.