Chhattisgarh High Court : ‘हिंदु ही एक शिवी, याचा अर्थ चोर, डाकू, गुलाम’ असे म्हणणार्‍या ख्रिस्ती संघटनेच्या ११ जणांवरील गुन्हा रहित होणार नाही !

छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगड उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी ‘हिंदु ही एक शिवी असून याचा अर्थ चोर, डाकू, लुटारू आणि गुलाम असा होतो’ असे वक्तव्य करणार्‍या ख्रिस्ती संघटनेशी संबंधित ११ कार्यकर्त्यांविरुद्ध नोंदवण्यात आलेला गुन्हा रहित करण्यास नकार दिला आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की,

या प्रकरणात असे प्रश्न समाविष्ट आहेत ज्यांचा निर्णय केवळ संपूर्ण खटल्याच्या वेळी पुराव्यांची पडताळणी केल्यानंतरच केला जाऊ शकतो. प्रारंभीच्या टप्प्यात हे ठरवले जाऊ शकत नाही. त्यामुळे गुन्हा रहित केला जाऊ शकत नाही.

हे प्रकरण फेब्रुवारी २०२४ मधील आहे. त्या वेळी छत्तीसगडच्या जशपूर येथील एका सार्वजनिक सभेत हिंदु धर्माविरुद्ध वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधाने करण्यात आली होती. याचे आयोजन ‘भारत मुक्ती मोर्चा’ आणि ‘राष्ट्रीय क्रिश्चियन मोर्चा’ या संघटनांनी केले होते.