छत्रपती संभाजीनगर येथे बाबा फरजान डॉनच्या घरावर धाड

५ कोटींहून अधिक रोख रक्कम, रायफली, पिस्तुल, धारदार शस्त्रे जप्त

छत्रपती संभाजीनगर – ९० च्या दशकात मिटमिटा आणि सिटी चौकात मोठा धाक असणार्‍या बाबा फरजान डॉनच्या घरी पोलिसांनी १० जुलैच्या पहाटे धाड घातली. या धाडीत पोलिसांनी ५ कोटींहून अधिक रुपयांची रोकड, २१ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, ८ लाख रुपयांची चांदी, ४ रायफली, पिस्तुल, सहस्रो जिवंत काडतुसे असा मोठा ऐवज कह्यात घेतला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांनी या धाडीविषयी सविस्तर माहिती दिली आहे. (एवढे पैसे आणि शस्त्रसाठा जिहादसाठी नव्हता ना ? याचे पोलिसांनी अन्वेषण करणे आवश्यक ! – संपादक)

झडतीच्या वेळी घरात शीला साळवे नावाची महिला उपस्थित होती. २ पंचांसमक्ष घराची झडती घेण्यात आली. झाडाझडतीच्या वेळी ५ कोटी २६ लाख २९ सहस्र रुपयांची रोख रक्कम, ६ शस्त्रे, तलवारी, चाकू, गुप्ती, तसेच सोने-चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधित घर बाबा फरजान याचे होते. त्याचे मागील महिन्यात मधुमेहाच्या आजारामुळे निधन झाले आहे. वर्ष १९८० ते १९९० या कालावधीत तो कामगार युनियनचा अध्यक्ष होता. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे नोंद असल्याने ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली, असे शशिकांत सातव यांनी सांगितले. एकूण ६ सहस्र ३५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही शस्त्रे आणि काडतुसे कोठून आणण्यात आली ? त्यांचा वापर झाला आहे का ? तसेच त्यांचा उद्देश काय होता ? याचे अन्वेषण चालू आहे.