Sri Mahakaleshwar Temple : उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराकडे आहे ४७२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी आणि ३०० कोटी रुपयांचे सोने-चांदी !

उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता यांचा सविस्तर तपशील घोषित

श्री महाकालेश्वर मंदिर

उज्जैन (मध्यप्रदेश) – १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या येथील श्री महाकालेश्वर मंदिराच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा सविस्तर तपशील प्रथमच सार्वजनिक करण्यात आला आहे. आतापर्यंत मंदिर समिती केवळ रोख आणि ऑनलाईन देणग्यांची माहिती सामायिक करत असे; परंतु या वेळी मंदिराची एकूण आर्थिक मालमत्ता, बँकेतील मुदत ठेवी, जमीन आणि सोने-चांदीशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे विविध बँकांमध्ये ४७२ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट), १६ कोटी रुपये रोख रक्कम आणि जवळपास ९० एकर भूमी आहे. तसेच वर्षानुवर्षे भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची अंदाजे किंमत ३०० कोटी रुपयाहून अधिक असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे; मात्र सुरक्षेच्या कारणांचा संदर्भ देत सोन्या-चांदीचा संपूर्ण अधिकृत तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

११ ऑक्टोबर २०२२ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘श्री महाकाल लोक’चे लोकार्पण झाल्यानंतर मंदिरात येणार्‍या भाविकांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे. पूर्वी जिथे प्रतिदिन ४० ते ५० सहस्र भाविक दर्शनासाठी येत होते, तिथे आता ही संख्या वाढून प्रतिदिन दीड ते दोन लाखांवर पोचली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मंदिराला १४२ कोटी रुपयांहून अधिक दान मिळाले.

कर्मचार्‍यांचे वेतन, सुरक्षा, स्वच्छता, देखभाल, बांधकाम, अन्नक्षेत्र, गोशाळा, महाकालेश्वर वैदिक शोध संस्थान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सण-उत्सवांच्या व्यवस्थेवर प्रतिवर्षी १३५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरांमध्ये अब्जावधी रुपये दान म्हणून गोळा होत असतांना त्याचा वापर हिंदु धर्माचे रक्षण, शिक्षण, धर्मप्रसार, धर्मांतरितांना पुन्हा हिंदु धर्मात आणणे, यांसाठी होत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • मशिदी, मदरसे आणि चर्च यांना मिळणार्‍या पैशांतून हिंदूंवर अन् धर्मस्थळांवर आघात करणे, हिंदूंना बाटवणे आदींसाठी केला जात असतांना मंदिरांचा पैसा हिंदूंच्या कोणत्याच कामी येत नसेल, तर त्याचा काय उपयोग ?
  • हिंदूंच्या मतांद्वारे सत्तेत येणारे सर्वपक्षीय शासनकर्ते हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करत नाहीत आणि हिंदूही त्यांना जाब विचारत नाहीत, यापेक्षा लज्जास्पद गोष्ट दुसरी ती कोणती ?