Shri Rammandir Ayodhya : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्याची समयमर्यादा

पदवी आणि प्रशासकीय सेवेचा २० वर्षांचा अनुभव आवश्यक !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची नियुक्ती करण्यासाठी स्थापन केलेल्या ३ सदस्यीय समितीने पात्रतेचे निकष निश्चित केले आहेत. इच्छुक उमेदवार १८ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. मंदिरासाठी १०० पुजार्‍यांची भरती करण्याच्या प्रलंबित प्रस्तावावर न्यासाच्या २२ जुलैला होणार्‍या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

२० वर्षांचा अनुभव आणि हिंदु धर्मीय असणे आवश्यक

मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यांना प्रशासन किंवा वित्तीय व्यवस्थापन यांमध्ये किमान २० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. उमेदवार हिंदु धर्म असणे हीसुद्धा एक अट आहे. ही नियुक्ती ३ वर्षांच्या कालावधीसाठी असेल. निवडलेल्या अधिकार्‍याला न्यास वेतन, निवास आणि इतर सुविधा पुरवेल आणि तो पूर्णपणे न्यासाला उत्तरदायी असेल.

संपादकीय भूमिका

मंदिराचे व्यवस्थापन पहायचे असेल, तर त्याचा कारभार, त्याच्या कार्यपद्धती आणि अन्य व्यवस्था शिकता येऊ शकतात; मात्र मंदिर व्यवस्थापनासाठी आवश्यक गुण म्हणजे तो ‘देवाचा निस्सीम भक्त’ असणे आवश्यक आहे. हा निकष जोपर्यंत लावला जात नाही, तोपर्यंत स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची हमी कोण देणार ?