
थॉमस मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीचा उद्देश होता, ‘भारताची संस्कृती आणि शिक्षणपद्धत नष्ट करणे.’ आज मेकॉले त्यात यशस्वी झाला आहे. त्याने लादलेल्या शिक्षणपद्धतीमुळे भारतीय पिढ्या अधिक पैशांची अतीमहत्त्वाकांक्षा बाळगू लागल्या आहेत आणि भारतीय संस्कृतीची देण असलेली नैतिकता पुसट झाली आहे. एका नोकरीसाठी जेव्हा आयुषीच स्वतःच्या आईचे आयुष्य घेते, तेव्हा नैतिकता शेष असण्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे रहाते. मेकॉलेला भारतात हेच तर हवे होते ! रंगाने आणि रक्ताने भारतीय असलेला; परंतु विचार, नैतिकता आणि विवेकबुद्धी गमावलेला समाज…! त्याने तो निर्माण करून दाखवला आहे.
मुलाने वादातून आईची हत्या केली, भूमीच्या वाटपावरून मुलाने पित्याचा मृत्यू होईपर्यंत त्यांना काठीने मारले; शेतातून जाणार्या रस्त्यावरून भावांमध्ये झालेल्या भांडणात दोघा भावांनी तिसर्या भावाची हत्या केली; छोट्याशा वादातून मित्राची हत्या; पती-पत्नीच्या भांडणात मुलाची हत्या, नुकतेच गाजलेले सियाने होणार्या पतीची केलेली हत्या, अशा बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने भरू लागली आहेत. ‘लोभाची परिसीमा’, ‘माणुसकीचा मृत्यू’, ‘नात्यांचा लिलाव’ यांसारखे मथळे पुनःपुन्हा प्रसिद्ध होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस एकापेक्षा एक गंभीर घटनांची नोंद होत आहे. ‘कोणत्या नात्यावर विश्वास ठेवावा ?’, हा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.
संस्कारांचा संहार
सनातन हिंदु धर्म, संस्कृती सहस्रो वर्षांपासून समाजाला दिशा देत आली आहे. अशा संस्कृतीत सरकारी नोकरीसाठी मुलीनेच आईच्या हत्येची सुपारी देणे, ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी घटना आहे. या घटनेने एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे – भारतीय समाजातील काही घटकांमध्ये नात्यांचे स्थान पैशांपेक्षा अल्प होत चालले आहे का ? अशा घटना आता अपवाद म्हणून दुर्लक्ष करता येणार नाहीत. गेल्या काही वर्षांत संपत्तीसाठी, विम्याच्या रकमेसाठी, विवाहबाह्य संबंधांसाठी, कौटुंबिक वादांसाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी आई-वडील, पती-पत्नी, मुले किंवा भावंडे यांच्या हत्यांची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. घटनांची कारणे वेगवेगळी असली, तरी त्यांचा समान धागा एकच आहे, स्वार्थाने नात्यांवर मात केली आहे.
गुन्हेगारी मानसशास्त्राचे तज्ञ सांगतात की, अशा प्रकारच्या नियोजित हत्या एका क्षणात घडत नाहीत. लोभ, नैतिक अधःपतन, सहानुभूतीचा अभाव, दीर्घकाळ साचलेला राग, स्वार्थ आणि चुकीच्या विचारांचे सातत्य यांतून अशा गुन्ह्यांची निर्मिती होते. अशी कृत्ये करणारी व्यक्ती अनेकदा स्वतःच्या कृतीचे समर्थन करत असते. याचा अर्थ असा की, कायद्याची भीती न्यून झाली आहे; पण अंतःकरणातील नैतिक नियंत्रणाची शक्तीही न्यून झाली आहे.
आज उच्च शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक प्रगती आणि भवितव्याच्या (करिअरच्या) संधी वाढल्या आहेत; पण त्याच वेळी प्रामाणिकपणा, कृतज्ञता, संयम, त्याग, संवेदनशीलता आणि कुटुंबाप्रती प्रेम हे केवळ मूल्यशिक्षणाच्या तासिकांपर्यंत शेष राहिले आहे. जीवन जगण्यात पदोपदी उपयोगी पडणारी ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या आचरणात आणण्यासाठी ना पालक प्रयत्न करत आहेत, ना शिक्षक ! त्यामुळेच वाढती गुन्हेगारी मानसिकता ही चिंतेची गोष्ट ठरली आहे. गुणवत्तापूर्ण ‘करिअर’ घडवणारे शिक्षण आवश्यक असले, तरी चारित्र्य घडवणारे शिक्षण नसल्यास बुद्धीमत्तेचा उपयोग समाजहिताऐवजी स्वार्थासाठी कसा होतो, हे सिया गोयल प्रकरणातून पहायला मिळाले.

शिक्षणाला हिंदु धर्मशिक्षणाचा आधार हवाच !
अशा गुन्ह्यांमध्ये कठोर आणि जलद शिक्षा होणे आवश्यक असते. अन्वेषण प्रभावी असले पाहिजे आणि गुन्हेगारांना कायद्यापासून सुटका मिळणार नाही, हे पोलीस यंत्रणेने पहाणे महत्त्वाचे असते. अशा प्रकरणांमध्ये न्यायालयातून योग्य शिक्षा मिळेल, अशी भाबडी आशा असते; परंतु हे गुन्हे संबंधिताने केलेले असल्याचे न्यायालयात सिद्धच होत नाहीत. त्यामुळे विकृत मानसिकतेचे हे आरोपी पुन्हा पुढचे गुन्हा करायला मोकळे होतात, म्हणजेच कायद्याचा धाक त्यांच्या मनाला शिवतही नाही. शिक्षा ही गुन्हा घडल्यानंतरची प्रक्रिया आहे. खरा प्रश्न असा आहे की, गुन्हा होऊच नये, यासाठी काय करायचे ? बोथट झालेल्या मनांना संवेदनशील बनवणे अद्याप कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला जमलेले नाही. हिंदु धर्माच्या आचरणाने मात्र हे होऊ शकते, याची असंख्य उदाहरणे आजपर्यंतच्या भारताच्या इतिहासात पहायला मिळतात. त्यामुळेच समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हिंदु धर्माचे शिक्षण आवश्यक आहे. समाजाचे भवितव्य केवळ आर्थिक विकासावर अवलंबून नसते; ते त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते. चारित्र्याचा पाया बळकट असेल, तर लोभाला मर्यादा रहाते, स्वार्थावर नियंत्रण रहाते आणि नात्यांचे पावित्र्य टिकते; म्हणूनच आज शिक्षित नाही, तर सुसंस्कृत समाजाची अधिक आवश्यक आहे.
मेकॉलेने पाश्चात्त्य प्रणालीचे शिक्षण भारतात चालू केले आणि भारतातील युवा पिढी जडवादी अन् भोगवादी झाली. आजच्या शिक्षणात ‘राम’ अभावानेही उरला नाही; म्हणून आजचा भारतीय तरुण पाश्चात्त्यांसारखा उच्छृंखल, भोगवादी, लैंगिक आणि विध्वंसक झाला आहे. भौतिक वासनांचा तिरस्कार करून आत्मिक उन्नती साधणारे, निष्ठेच्या परंपरा आत्मसात् करणारे शिक्षण आज अभावानेही आढळत नाही. ऐषोराम, भोगलोलुपता, लैंगिकता, मोडतोड करण्याची वृत्ती यांना आजच्या शिक्षणात प्रतिबंध केला जात नाही. यामुळे ते दुर्गुण हे सद्गुणाचे रूप घेऊन उजळमाथ्याने वावरतात. शिक्षण देण्याचे प्रयोजन काय ? तो माणूस आहे; म्हणून त्याला शिकवायचे कि ‘माणूस’ होण्याकरता शिकवायचे ? खरेतर प्रकृतीच्या जोखडातून मुक्त करणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे; पण आजचे शिक्षण म्हणजे माहितीचे शिक्षण झाले आहे, भरगच्च माहिती मेंदूत कोंबणारे शिक्षण झाले आहे. खरे तेच शिक्षण, जे मानवाला संयम शिकवते, जे पशूवृत्तीपासून वर उचलून देवत्वाच्या पातळीवर पोचवते, जे इंद्रिय, भोग आणि वासना यांच्या जोखडातून मुक्त करते अन् खर्या शाश्वत आनंदाची प्राप्ती करून देते. भौतिकता हाच एकमेव आधार असलेले शिक्षण अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळेच समाजाला अधःपतनाकडे नेत असलेल्या मेकॉले शिक्षणपद्धतीला आता भारतियांनी बाहेरचा रस्ता दाखवून मेकॉलेच्या उद्देशांना अपयशी ठरवायला हवे.
शिक्षण असे हवे आहे, जे समाजाला जगण्याचा विवेक आणि सुसंस्कृतपणा देईल. मेंदूला जड करणारी माहिती नको, तर अंतःकरणाला प्रगल्भ करणारे आणि मानवी संवेदना जागृत करणार्या शिक्षणाची आवश्यकता आहे. भारताची प्राचीन शिक्षणपद्धत ही केवळ भौतिक प्रगतीपुरती मर्यादित नव्हती, तर ती आत्मिक समाधान साधणारी होती; याच प्राचीन गुरुकुल परंपरेचा ‘सा विद्या या विमुक्तये ।’ (अर्थ : विद्या तीच, जी मुक्ती देते.) हा विचार आज पुन्हा रुजवणे अपरिहार्य झाले आहे.
संपादकीय : शुभ्र क्रांतीचा विकास ?
बारसू-सोलगाव अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात पंचायत समितीचा एकमुखी ठराव
कर्नाटकामध्ये शिक्षिकेने धमकी दिल्याने ८ वीतील विद्यार्थिनीने केली आत्महत्या
संपादकीय : सतलूज !
ईश्वरप्राप्तीसाठी साधना प्रथम आणि नंतर तात्त्विक माहितीचे वाचन
Chhattisgarh High Court : शाळांमध्ये गायत्री मंत्राचे पठण करण्याचे निर्देश देणार्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !