संपादकीय : सतलूज !

सतलज नदीला पंजाबी भाषेत ‘सतलूज’ म्हणतात. सध्या ‘झी ५’ ॲपवर प्रसारित झालेल्या ‘सतलूज’ नावाच्या चित्रपटाचे प्रसारण सरकारच्या आदेशानंतर देशात रोखण्यात आल्यानंतर सर्वत्र ‘सतलूज’चीच चर्चा आहे. हा चित्रपट पंजाबमधील कथित मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या जीवनावर आधारित आहे. वर्ष १९९५ च्या काळात खलिस्तानी आतंकवाद्यांनी पंजाबमध्ये थैमान घातले होते. त्यांचा बीमोड करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक के.पी.एस्. गिल यांच्या नेतृत्वाखाली पंजाब पोलीस दलाने खलिस्तानी आतंकवाद्यांना वेचून ठार मारले. त्या काळात आतंकवादी असल्याचे सांगत निरपराध शिखांनाही पोलिसांनी ठार मारून त्यांचे गुपचूप अंत्यसंस्कार केल्याच्या वावड्या उठल्या होत्या. हे काही अंशी सत्य होते आणि त्याची आकडेवारी २ सहस्रांच्या आसपास आहे; मात्र खालरा यांच्या मते, ही आकडेवारी २५ सहस्रांहून अधिक होती. त्याविषयी अधिकृत पुरावे त्यांनी कधीही समोर आणले नाहीत. खालरा यांनी मानवाधिकाराचा मुखवटा धारण केला होता; मात्र त्यांची खलिस्तानी विचारसरणी आणि खलिस्तानी आतंकवादाला त्यांनी दिलेला पाठिंबा या गोष्टी लपून राहिल्या नाहीत. चित्रपटात खलिस्तानी आतंकवाद मुळासकट उखडून टाकण्यासाठी जिवाची बाजी लावणारे गिल यांना खलनायक रंगवले आहे, तर काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री बियंत सिंह यांनी खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हत्येचे उदात्तीकरण केले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असतांना खलिस्तानी आतंकवाद फोफावला आणि नंतर तिच्याच काळात त्याचा बीमोड करण्यात आला; मात्र चित्रपटात तिच्याविषयी काहीच उल्लेख नाही, तसेच खलिस्तानी आतंकवाद्यांनी हिंदूंचा केलेला वंशसंहार आणि पंजाब पोलिसांची केलेली हत्या यांकडे डोळेझाक केली आहे. या सर्व गोष्टींमुळे ‘चित्रपट प्रसारित झाल्यास राष्ट्रघातकी लोकांचे फावणार’, असे कारण सांगत त्यावर भारतात बंदी आणली गेली आहे. आता अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवत ‘चित्रपटात काय चुकीचे दाखवले ?’, आदी गोष्टींचे चर्वितचर्वण पुढील काही दिवस भारतात चालेल, यात शंका नाही. निधर्मीवादी, साम्यवादी आणि भारतद्वेष्टे यांच्या हाती या चित्रपटाच्या बंदीमुळे आयते कोलित मिळाल्यामुळे ते स्वतःचा भारतद्वेष आणि हिंदुद्वेष यांचा कंड शमवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. ‘चित्रपटात रंगवण्यात आलेले खोटे कथानक आणि बंदी घातली ते योग्य कि अयोग्य ?’, हा आजच्या लेखाचा विषय नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने खलिस्तानी आतंकवादी, त्याचे पाठीराखे आणि ही विचारसरणी नष्ट करण्यासाठी इतकी वर्षे सरकारने कसोशीने प्रयत्न का केले नाहीत ?, हा कळीचा प्रश्न आहे. खलिस्तानी आतंकवादाचे खरे स्वरूप सरकारने जनतेसमोर सातत्याने मांडले असते आणि लोकांचे याविषयी वैचारिक प्रबोधन केले असते, तर आज ‘तुमची हुकूमशाही चालते’, ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा गळा घोटला’, आदी सूत्रांवर उत्तरे देतांना सरकारी प्रतिनिधींची जी त्रेधा तिरपीट उडत आहे, ती उडाली नसती. सध्या जिहादी आतंकवादाएवढाच सोकावलेला खलिस्तानी आतंकवाद आणि त्यांच्या जिवावर उड्या मारणारे वैचारिक आतंकवादी यांना वेळोवेळी जन्माची अद्दल घडवली असती, तर भारताच्या मुळावर उठणारे असे चित्रपट बनले नसते.

चुचकारण्याचे धोरण घातक

काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये जिहादी आतंकवादाचे पाशवी रूप भारताने पाहिले; मात्र त्यांची पाळेमुळे स्वातंत्र्यानंतर पद्धतशीरपणे रुजवली गेली होती. खलिस्तानी आतंकवादाचेही तसेच आहे. स्वातंत्र्याच्या आधीपासून स्वतंत्र खलिस्तानची मागणी जोर पकडू लागली होती. त्यानंतर वर्ष १९८० आणि १९९० च्या दशकांत त्याने उग्र रूप धारण केले. असे असतांना केंद्रात किंवा पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांनी खलिस्तानी आतंकवाद संपवण्याचा प्रयत्न केला नाही. खरेतर काँग्रेसने खलिस्तानी चळवळ स्वतःच्या स्वार्थासाठी रुजवली आणि जेव्हा हे आतंकवादी डोईजड झाले, तेव्हा ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ वगैरे राबवून हा आतंकवाद संपवण्याचा प्रयत्न केला.

वर्ष २०१४ मध्ये भाजपने केंद्रात सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा आतंकवाद आटोक्यात आणण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक होते. ‘खलिस्तानी आतंकवादाचा नायनाट करणे आवश्यक का होते ?’, हे पंजाबमधील किती तरुणांना ठाऊक आहे ? हा इतिहास का झाकून ठेवला जातो ? ‘पंजाब स्कूल एज्युकेशन बोर्ड’ आणि ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या इतिहास आणि राज्यशास्त्राच्या पुस्तकांमध्ये या अत्यंत संवेदनशील कालखंडाचा उल्लेख अत्यंत त्रोटक आणि मर्यादित स्वरूपात केला आहे. हा काळा अध्याय लोकांसमोर आणण्यासाठी सरकारला कुणी रोखले होते ? आज कॅनडामध्ये बसून गुरुपतवंतसिंह पन्नू हा आतंकवादी भारताला वाकुल्या दाखवतो. ‘वारिस पंजाब दे’ या पक्षाची स्थापना करून खलिस्तानी आतंकवादी अमृतपाल सिंह कारागृहातून निवडणूक जिंकून खासदार होतो. आजही पंजाबमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होतात आणि हे आतंकवादी अमली पदार्थांची तस्करी करून तेथील युवा पिढी नासवतात. आज सुवर्ण मंदिरात भिंद्रनवालेचा जयजयकार केला जातो आणि राजकीय पक्ष त्याला दुजोरा देतात. जेवढा जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद देशासाठी घातक आहे, तेवढाच खलिस्तानी आतंकवादही आहे; मात्र बहुतांश शीख समाज दुखावेल, मतांची गणिते आदी सर्व पाहून या सूत्राकडे जर कानाडोळा केला जात असेल, तर तो राष्ट्रघात होय. यासाठी इतिहास सर्वपक्षीय राजकारण्यांना कदापि क्षमा करणार नाही.

नायकाला ‘खलनायक’ रंगवले जाते तेव्हा …

के.पी.एस्. गिल

आज शोकांतिका अशी आहे की, के.पी.एस्. गिल यांनी धडाडीने जे कार्य केले, त्याविषयी राजकारणी बोलायला सिद्ध नाहीत. आजच्या तरुण पिढीला एवढेच कशाला पंजाबमधील युवा वर्गालाही गिल यांचे योगदान ठाऊक नाही; कारण इतिहासाच्या धड्यातून त्यांच्याविषयी शिकवले जात नाही. ‘पंजाबमधून खलिस्तानवाद निपटला जाऊच शकत नाही’, अशी जेव्हा लोकांची मानसिकता होती, तेव्हा गिल यांनी सर्व सूत्रे हाती घेऊन पंजाब आतंकवादमुक्त केला; मात्र आज त्यांची ‘पंजाबचा कसाई’ अशी प्रतिमा रंगवली जात आहे. त्या काळात १ सहस्र ७०० पोलिसांनी खलिस्तान्यांच्या विरोधात लढतांना वीरमरण पत्करले. आज त्यांना शीख समाज विसरला आहे. पुढील वर्षी पंजाबमध्ये निवडणूक होणार आहे. अमृतपाल सिंहप्रमाणे यात खलिस्तानवादी उतरले आणि त्यांनी निवडणूक जिंकली तर ?

या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रप्रेमी जनतेला ‘सतलूज’वर बंदी का घातली ? या विषयात स्वारस्य नाही; मात्र खलिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळून पंजाब ‘आतंकवादमुक्त’ कधी करणार ?, या प्रश्नाचे उत्तर सरकारकडून मिळवण्यात अधिक स्वारस्य आहे. सरकार या प्रश्नाचे उत्तर देईल का ?

आतंकवादी विचारसरणीचा वैचारिक पराभव करणे, हाही त्याच्या विरोधातील लढ्याचाच एक भाग !