सततच्या पावसामुळे केरळम्च्या वायनाडमध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत ! आतापर्यंत १५० माणसे मृत्यूमुखी आणि ३०० बेपत्ता आहेत.

१. डोंगराच्या माथ्यावर बेसुमार वृक्षतोड आणि खोदकाम यांमुळे होणारा परिणाम
डोंगराच्या माथ्यावर बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर कुशीत बिनडोकपणे केलेला पोकलेनचा (भूमी खोदण्यासाठीचे यंत्र) वापर हा या प्रकारांचा प्रारंभ असतो. माथ्यावर केलेल्या अफाट जंगलतोडीमुळे पावसाचे पाणी अंदाधुंद वाहून कुठल्या तरी खोलगट भागात साठून जाते आणि मुरत मुरत खालच्या बाजूवर दबाव टाकत रहाते. उन्हाळ्यात वर झाडांचे छप्पर नसल्याने भूमी अफाट तापते आणि पहिल्या पावसात त्यात भेगा पडतात. त्यावर मोठा पाऊस झाला की, शेकडो, सहस्रो टन पाणी मुरत ते खाली जाते. दुसर्या बाजूने डोंगर उतारावर ‘पिक्चरस्क्यु लोकेशन’च्या (नयनरम्य ठिकाणाच्या) नावाने अवाढव्य आकाराची घरे, बंगले, नागमोडी रस्ते यांची बांधकामे करतांना पोकलेनचा बेसुमार वापर करून उतारावरची माती अजून शिथिल करून डोंगर अस्थिर केला जातो अन् त्यावर वजनदार बांधकामे ! माती धरून ठेवायला झाडे नाहीत; कारण आता हा भाग ‘मागास’ राहिलेला नसतो, तर त्याचा ‘विकास’ झालेला असतो !
२. कथित विकासामुळे होणारी हानी

मग ज्या दिवशी अचानक सरासरीपेक्षा पुष्कळ प्रमाणात पाऊस पडतो, तेव्हा डोंगर आणि पलीकडचा उतार यांची पाणी शोषून घेण्याची अन् ते पाणी झिरपू देण्याची नैसर्गिक प्रवृत्ती बिघडून जाते. वरून पाणी अधिक प्रमाणात येत जाते; पण झिरपतांना त्यात मानवी बांधकामे अडथळे निर्माण करतात. परिणामी उतारावर भूमीच्या पोटात प्रचंड वजनाचे अदृश्य पाणीसाठे निर्माण होतात. हे सहस्रो टन वजनाचे पाण्याचे अदृश्य साठे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने खाली खाली सरकतांना समवेत दगड, उरलीसुरली झाडे आणि बांधकामे यांना घेऊन जातात अन् वायनाडसारखी घटना घडते.
कोकणात मंडणगडजवळ शेनाळे गावात काही वर्षांपूर्वी प्रचंड भूस्खलन होऊन मोठा रस्ता वाहून गेला होता. सुदैवाने वस्ती नसल्याने मनुष्यहानी झाली नाही. तो प्रकार पठारावर पाणी साठून झाला होता.
३. ‘सी फेसिंग बंगलो स्कीम’ (समुद्राभिमुख बंगल्यांची योजना) – आज वायनाड उद्या कोकण !
अख्ख्या कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिथे जिथे डोंगरावरून समुद्र दिसतो, अशा सर्व जागा आज ‘एन्.ए. प्लॉटिंग’ (नॉन अग्रिकल्चर प्लॉटिंग – बिगरशेती भूमी) उद्योगाने स्वाहा केलेल्या आहेत. या सर्व पठारांवर बेसुमार वृक्षतोड करून भूमीच्या मूळ रचनेत सुरुंग लावून किंवा पोकलेन वापरून अभूतपूर्व आणि बिनडोक पालट केलेले आहेत. पाण्याचे मूळ प्रवाह वळवून किंवा बुजवून त्यात बांधकामे झाली आहेत. उभ्या डोंगराचा ‘स्लाईस’ (तुकडा) काढून त्यावर बंगले उभे रहात आहेत. अशा पठारावरून खाली सुंदर आणि निळाशार समुद्र दिसतो; पण त्याच वेळी खाली डोंगर उतारावर असलेली वस्ती ही एका धोक्याच्या दिशेने इंच इंच सरकत असते.
या दोन्ही जिल्ह्यात समुद्रापासून १ ते ३ किलोमीटरवर असलेल्या सगळ्या डोंगर पठारावर हीच स्थिती आहे. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी न्यूनतम एक ‘वायनाड’ कधी ना कधी होणार आहे !
४. आपल्या हातात काय आहे ?
सध्या तरी आपल्या हातात केवळ बातम्या वाचणे आणि सुस्कारे सोडून गप्प बसणे इतकाच विषय आहे ! आपल्या वडिलोपार्जित जागा आपण विकलेल्या आहेत, आपण दलाली घेतलेली आहे, तिथे बांधकामे आपण करत आहोत. त्यामुळे सध्या आपल्या हातात काहीही नाही !
कुठेही मोठ्या भूस्खलनाची बातमी वाचली की, मला हर्णै-दापोली रस्त्यावर ४५ अंशामध्ये डोंगर कापून बांधलेल्या बंगल्यांच्या योजनेचे दृश्य डोळ्यांसमोर येते ! हे केवळ एक उदाहरण नाही, तर कोकणात समुद्र सान्निध्यात असलेला एकेक डोंगर अशा शेवटच्या घटका मोजत आहे ! महसूल अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, ‘इस्टेट एजंट’ (मालमत्तांच्या व्यवहारामध्ये मध्यस्थी करणारा दलाल) आणि कंत्राटदार प्रत्येक जण आपापल्या परीने या डोंगरांना वायनाडच्या दिशेने इंच इंच सरकवत आहेत !
भूस्खलन होऊन खालची कोकणी गावे गाडली गेली की, योग्य आणि चांगली हानीभरपाई मिळवण्याचे प्रयत्न करणे इतकेच आपल्या हातात आहे !
– विनय जोशी, दापोली, जिल्हा रत्नागिरी.
पर्यावरणाचा र्हास !
किडनी रॅकेट प्रकरणातील बांगलादेशी आरोपींना जामीन संमत करणारे राजस्थान उच्च न्यायालय !
या वर्षी इतकी झाडे का पडली ?
Railway Viral Video : समोसा खाण्यासाठी रेल्वे चालकाने रेल्वेगाडी थांबवल्याचा व्हिडिओ दिशाभूल करणारा ! – रेल्वे विभाग
Karnataka Temples CCTV : राज्यातील सर्व मंदिरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लावण्याचा मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा आदेश !
कुडाळच्या नगरसेविका सौ. संध्या तेरसे यांचे आजपासून उपोषण