भूस्खलनामुळे सांबरवाडी (सातारा) येथे मुख्य जलवाहिनीला तडे !

सातारा, १० जुलै (वार्ता.) – सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला ३ ठिकाणी तडे गेले आहेत. यामुळे शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठा बंद असून नागरिकांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.

सततच्या पावसामुळे डोंगर उतारावरील माती जलवाहिनीवर कोसळल्याने मोठा दाब निर्माण झाला. परिणामी जलवाहिनीला तडे जाऊन मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम तातडीने चालू केले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. मुसळधार पाऊस, चिखल आणि जलवाहिनीतून होणारी सततची गळती यांमुळे कामात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे विशेष तांत्रिक कौशल्याची आवश्यकता भासल्याने पुण्यातील ‘आयात इंजिनिअरिंग’ आस्थापनाच्या ५ सदस्यीय तज्ञ पथकाला पाचारण करण्यात आले आहे. जलवाहिनी पूर्ववत् करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे.

नागरिकांनी संयम बाळगावा ! – विनोद जळक, मुख्याधिकारी

या आपत्काळात नागरिकांनी संयम बाळगावा. जलवाहिनी दुरुस्तीचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी सातारा नगर परिषदेची सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून उपयोग करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.