पर्यावरणाचा र्‍हास !

सध्या आधुनिकीकरणाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती, रस्ते उभारत आहेत; पण हे सर्व करत असतांना आपण ज्या ‘निसर्गा’मुळे जिवंत आहोत, त्याला मात्र आपण नामशेष करत आहोत. पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. याला कारणीभूत मानवाची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. मानवाच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण होतील, तेवढे देव मानवाला देत असतो; पण त्याची भूक तेवढ्याने भागत नाही. त्याला अजून हवे असते. त्याच्यासमोर जे येईल त्याला तो अतीमहत्त्वाकांक्षेच्या जोरावर नष्ट करत जातो. त्यामध्ये झाडे, नद्या, डोंगर यांची हानी करण्याचा सपाटा मानवाने लावला आहे.

आज आपल्या आजूबाजूला पाहिले, तर सर्वत्र ‘सिमेंट’चे जंगल उभे करण्यात आले आहे. शहरी भागात सुदैवाने मुलांना एखादे पटांगण मिळाले, तर मिळते; नाही तर ते या सर्व सिमेंटच्या जंगलात राहून चिडचिड करतात, नैराश्यात जातात. त्यांच्यातील उत्साह न्यून होत गेलेला आपल्याला पहायला मिळतो. एखादी इमारत उभी करण्यासाठी जितक्या प्रमाणात वृक्षतोड होते, त्याच्या तुलनेत किती झाडे लावली जातात ? याविषयी महानगरपालिका ‘परीक्षण’ करते का ? कि या सर्व आदेशांना शासनच केराची टोपली दाखवते ? एखादी इमारत बांधतांना बर्‍याचदा वृक्ष तोडावे लागतात. त्यामुळे त्या जागेत योग्य ठिकाणी वृक्ष लावणे बंधनकारक आहे आणि प्रशासनाला त्याविषयी माहिती द्यावी लागते; पण सध्या या आदेशाचे काटेकोर पालन होतांना दिसत नाही. या वर्षी उन्हाळ्याने उच्चांक गाठला होता आणि निसर्गतज्ञांच्या मते हे तापमान प्रतिवर्षी अधिक होत जाईल, म्हणजे आपण अजूनही जागरूक झालो नाही, तर विनाश निश्चित आहे. सहस्रो वर्षांचा इतिहास असलेल्या पृथ्वीची मानवाने काय अवस्था करून ठेवली आहे ? पूर्वी विज्ञान प्रगत नसूनही निसर्गचक्र नियमित होते. घड्याळ, दिनदर्शिका नसूनही त्या काळी लोकांना वेळ कळत होती आणि हवामानाचे अनुमान तोंडपाठ होते. आता विज्ञान आणि मानव इतके प्रगत होऊनही हवामानाचे अनुमान चुकते आणि परिणामी मानवाचा विकास हा त्याच्याच सर्वनाशासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामध्ये जागतिक तापमानवाढ, प्रदूषित हवा, पाणीटंचाई, प्रदूषित नद्या, अवेळी पाऊस या सर्व समस्या आहेत. हिंदु धर्मात पर्यावरणाचा व्यापक स्तरावर विचार केल्यानेच पंचमहाभूतांचे पूजन केले जाते. अनेक सण हे निसर्गाच्या पूजनाने साजरे होतात. त्यामध्ये वटपूजा असेल, बैलपोळा असेल, गोमातेची पूजा, गंगापूजन, नर्मदापूजन आदी सारे येते. नद्यांना तर मातेचा दर्जा दिला आहे; परंतु हिंदूंच्या परंपरांना बुरसटलेले म्हटल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे. हिंदु धर्माची महानता हिंदूंना धर्मशिक्षण दिल्याने कळली, तर पर्यावरणाचा र्‍हास करण्यास कुणी धजावणार नाही.

– श्री. जयेश बोरसे, पुणे