राज्यात आतंकवादविरोधी पथकाच्या १५० ठिकाणी धाडी

मुंबई – भारतातील आतंकवाद्यांची भरती आणि देशांतर्गत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवण्याची अनेक गंभीर प्रकरणे या अनुषंगाने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने आंतरराष्ट्रीय जिहाद्यांचे जाळे मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक शोधमोहीम चालू केली आहे. महाराष्ट्र आतंकवादविरोधी विशेष पथकांनी ९ जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यभरात १५० हून अधिक संशयास्पद ठिकाणी एकाच वेळी धाडी घातल्या. मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण राज्यभरातील मराठवाड्यात १३ महत्त्वाच्या ठिकाणी धाडी घातल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात कह्यात घेतलेल्या १० जणांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३ आणि गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी १ आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९, जालना जिल्ह्यातून २, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातून प्रत्येकी १ अशा एकूण १३ जणांना कह्यात घेऊन अज्ञात स्थळी चौकशीसाठी हालवले आहे. सर्व संशयितांचे भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, ‘सिम कार्ड यांची सायबर फॉरेन्सिक टीमकडून कसून पडताळणी केली जात आहे. संशयास्पद कागदपत्रे कह्यात घेण्यात आली आहेत. या धाडींतून मोठ्या घातपाताचा कट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

भारतीय सुरक्षा यंत्रणांना महाराष्ट्रातील काही तरुण समाजमाध्यमातून थेट पाकिस्तानातील लाहोर येथील आतंकवाद्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती.

शहजाद भट्टी कोण आहे ?

पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेल्या शहजाद भट्टी याचे डिजिटल जाळे भारतातही आहे. सध्या तो दुबईत बसून हे आंतरराष्ट्रीय जाळे चालवत असल्याचे उघड झाले आहे. ‘डिजिटल प्लॅटफॉर्म्स’चा गैरवापर करून असुरक्षित भारतीय तरुणांना पैशांचे आमीष दाखवून जाळ्यात ओढणे आणि त्यांच्यात कट्टरतावादी विचारसरणी रुजवून त्यांना आतंकवादी कारवायांकडे वळवणे, असा अत्यंत गंभीर आरोप त्याच्यावर आहे. पाकिस्तानातील सिंध, कराची, लाहोर भागात ही टोळी सक्रीय आहे.

पोलिसांच्या विशेष दलाने ८ जुलै या दिवशी शहजाद भट्टीशी संबंधित २ गट उद्ध्वस्त करून देहली आणि पंजाब येथून ६ संशयित कार्यकर्त्यांना अटक केली. नागपूर जिल्ह्यात पकडलेल्या १० जणांनी भट्टीला संदेश पाठवला होता. भट्टीची टोळी समाजमाध्यमांवरून संशयितांचा शोध घेते. त्यांना संदेश पाठवते. त्यानंतर त्यांना काही ‘लक्ष्य’ दिले जाते. या बदल्यात काही रक्कम ही टोळी ऑनलाईन पाठवते.

छत्रपती संभाजीनगरमधील मिसरवाडी परिसरातून ज्या संशयिताला कह्यात घेण्यात आले, त्याची एक खासगी चारचाकी गाडी काही दिवसांपूर्वी थेट राजस्थान येथील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ गेली होती. हा रस्ते प्रवास सुरक्षा यंत्रणांना अत्यंत संशयास्पद वाटल्याने त्याला कह्यात घेण्यात आले.