याला उत्तरदायी कोण आहे ?
पुष्कळ मोठे प्रलयंकारी वादळ नसतांनासुद्धा केवळ ४ दिवसांच्या पावसात विशेषतः मुंबईमध्ये शेकडो झाडे सहजगत्या कोसळली. मुंबई पाठोपाठ विविध शहरांमध्ये हीच शोकांतिका चालू झाली आहे. नैसर्गिकरित्या कोसळणारी झाडे हा निसर्ग नियम आहे; पण मुंबईतील त्याची कारणे चिंताजनक आहेत. यामुळे निसर्गप्रेमी आणि सामान्य जनता पुष्कळ व्यथित आहे. ही झाडे ३५ ते ४० वर्षे स्वतःची स्वतःच वाढत असतात. तुम्ही त्यांना काहीही दिले नाही, तरी भूमीमधून ही झाडे सर्व काही मिळवतात. कितीही प्रदूषण असले, तरी निमूटपणे सहन करतात आणि आयुष्यभर तुम्हाला भरभरून फुकटचा प्राणवायू देतात, सावली देतात; पण सध्या सगळ्या प्रगतीसह चाललेली ही अधोगती मात्र फार धोकादायक आहे. मुंबईतील झाडांची न्यून होत चाललेली संख्या आणि त्यांचे मोठ्या प्रमाणावर अशा तर्हेने कोसळणे, या दोन्हींची काही कारणे या लेखात पाहूया.

झाडे पडण्यामागील काही कारणे
१. झाडांची पाळेमुळे खोदण्याऐवजी ती करवतीने कापणे : मुंबईमध्ये होत असलेल्या भूमीगत मेट्रो, भूमीगत रस्ते, बोगदे, केबल्स (वीज अथवा इंटरनेट वाहिन्या) टाकणे, पाणीपुरवठा योजना, मल नि:स्सारण योजना, स्वयंपाकाच्या गॅसचे पाईप्स यांचे प्रमाण आता पुष्कळच वाढले आहे. भूमीच्या खाली अनुमाने ३ मजले खोदून तिथे काँक्रीट ओतून भक्कम तटबंदी केली जाते. त्यात झाडांची सहस्रो मुळे तुटतात आणि कमकुवत होतात. त्यांना पुढे वाढणेच अशक्य होऊन जाते. आडवी येणारी झाडांची मुळे चक्क करवतीने कापून काढली जातात. भोवती नको एवढे भक्कम पार बांधले जातात. पाळेमुळे खणून काढणे, ही गोष्टच कालबाह्य होत आहे; कारण पाळेमुळे खोल जाऊच दिली जात नाहीत. मोठमोठ्या इमारतींसाठी पुष्कळ खोलवर पाया खणला जातो; पण त्याउलट मोठ्या झाडांचा निसर्गदत्त खोल पाया मात्र उखडून टाकला जात आहे.

२. काही जण असे सांगतात की, मुंग्यांना तुम्ही अन्न दिले, तर तुमचे पाप नष्ट होते. त्यामुळे सर्वत्र अनेक झाडाखाली सध्या प्रतिदिन फार मोठ्या प्रमाणावर मुंग्यांना साखर किंवा पीठ टाकले जाते. या मुंग्या तेथेच वारूळ बनवतात. त्यामुळे हळूहळू या झाडांचा भक्कमपणा मुळातूनच कमकुवत व्हायला लागतो.
३. मुंबईत सर्वत्र अमर्याद पसरलेले हातगाडीवरील खाद्य विक्रेते, त्यांचे शिल्लक अन्न, खरकटे किंवा तत्सम पदार्थ जवळच्या झाडाखाली फेकून देतात. यामुळे प्रचंड प्रमाणावर उंदीर आणि घुस यांची वाढ होऊन ती तेथेच मोठमोठी बिळे खोदतात.
अनेक झाडांच्या खाली आलेली छोटी छोटी मंदिरे किंवा घुमटी वा देवतांच्या मूर्ती असतात. तेथे अनेक जण तेल, तूप, खाद्यपदार्थ, पेढे, नारळ, नैवेद्य अशा अनेक गोष्टी झाडाखालीच घालून वा टाकून जातात. तेथे कीटक, उंदीर आणि घुशी आकर्षित होतातच.
४. स्वतःचे दुकान किंवा घर यांसमोर येणार्या झाडाच्या मुळापाशी विष घालून, आम्ल (ॲसिड) टाकून, विषारी इंजेक्शन टोचणे, हे आपण ऐकले आहेच.
५. मेट्रो, पूल यांसाठी खोदकाम करतांना, विज्ञापनाचे मोठे फलक आणि दिव्यांचे असंख्य खांब उभारतांना आजूबाजूला झाड असेल, तर ते बेधडक कापले जाते.
६. मुंबई बांधकाम व्यावसायिकांनी गिळंकृत केली आहे. नवीन इमारत बांधतांना जुनी झाडे तोडण्याचे, तिथे नवीन झाडे कुठली आणि किती लावायची ? या सर्वांचे नियम ठरलेले आहेत. हे खरोखर पाळले जातात का ? मग मुंबईतील वृक्ष संख्या झपाट्याने न्यून का होत आहे ?
७. भूमीचा पोत बघून झाडे लावणे बंद झाले असावे. कुठली झाडे कुठल्या भूमीत लावावीत, याचा विचार केला जात नसावा. अनेक विदेशी प्रजातीची झाडे येथे मुळात रुजतच नाहीत.
८. झाडांची छाटणी करतांना अनेकदा एकाच बाजूच्या सर्व फांद्या कापल्या जातात. त्यामुळे झाडाचा तोल बिघडतो. ज्या बाजूच्या फांद्या शिल्लक असतात, त्या बाजूला अधिक वजन झाल्यामुळे त्याच बाजूला झाड कोसळण्याची शक्यता पुष्कळच वाढते.
निसर्गाची अनमोल देणी नष्ट करण्याचा प्रयत्न !
‘झाडांना माणसासारख्या भावना असतात, चेतना असतात’, हे डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी शोधून काढले. विनामूल्य आणि भरपूर ऑक्सिजन मिळवण्यासाठी वृक्षांसारखे दुसरे साधन नाही, असे विज्ञान सांगते. जलतज्ञ माधवराव चितळे यांच्या सूचना आणि ब्रिमस्टोवाड प्रकल्प यांचाही फारसा काही उपयोग केला गेला नाही. अशा वैज्ञानिक गोष्टींवरही माणसाचा विश्वास नाही. पावसाळ्यात वृक्षारोपण, रोपांचे विनामूल्य वाटप, घाटामध्ये विविध बिया फेकणे, वृक्षदिंडी काढणे, असे जनजागृती करणारे उपाय केले, तरी प्रत्यक्षात त्याचा परिणाम काय होत आहे ? वर्षभर त्याची निगराणी कोण करतो ?
विदेशांमध्ये आता कोट्यवधी रुपये व्यय करून कृत्रिम झाडे आणि ऑक्सिजन देणारे कृत्रिम मनोरे उभारण्यात आले आहेत. मुंबईतही समुद्राच्या खार्या पाण्यापासून गोडे पाणी सिद्ध करण्याच्या संयंत्रांविषयी चर्चा चालू आहे. पूर्णपणे विनामूल्य मिळत असलेले शुद्ध पाणी आणि हवा ही निसर्गाची अनमोल देणी नष्ट करून अत्यंत खर्चिक कृत्रिम पर्याय आपल्या डोक्यावर बसून घेण्याकडे आपण वाटचाल करत आहोत
का ? ‘विविध वृक्षांवर वेगवेगळे देव रहातात, काही झाडांवर पिशाच्च असतात आणि ती माणसांना झपाटतात, देवांना विविध झाडांची पाने प्रिय असतात, वृक्ष तोडणार्यांचा निर्वंश होतो’, असे मानणारे आमचे पूर्वजच बरे होते, असे वाटू लागले आहे !
– श्री. मकरंद करंदीकर, ठाणे (९.७.२०२६)
पर्यावरणाचा र्हास !
किडनी रॅकेट प्रकरणातील बांगलादेशी आरोपींना जामीन संमत करणारे राजस्थान उच्च न्यायालय !
‘पोकलेन’ विकासाने केरळम्मधील ‘वायनाड’ जात्यात, तर कोकण सुपात !
राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !
अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी गृहविभागासह २० शासकीय विभाग एकत्रित काम करणार ! – मुख्यमंत्री