ग्राहक वाद निवारण आयोगाने ‘रिलायन्स रिटेल’ दुकानदाराला ठोठावला दंड

मुदतीचा दिनांक उलटून गेलेले नूडल्स खाल्ल्यानंतर मुलगी आजारी पडली !

कांगडा (हिमाचल प्रदेश) – मुदतीचा दिनांक (एक्सपायरी डेट) उलटून गेलेले ‘स्पायसी कोरियन इन्स्टंट नूडल्स’ खाल्ल्यामुळे एक अल्पवयीन मुलगी आजारी पडल्यानंतर ग्राहक आयोगाने ‘रिलायन्स रिटेल’ दुकानाला सदर वस्तूचे पैसे, हानीभरपाई म्हणून २० सहस्र रुपये आणि कायदेशीर खर्च देण्याचा दंड ठोठावला. येथील जुगल किशोर यांनी ‘रिलायन्स स्मार्ट पॉईंट’ या दुकानाविरुद्ध जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगात धाव घेतली होती. त्यांना ३ महिन्यांपूर्वी मुदत उलटलेले नूडल्स विकण्यात आले होते.

रिलायन्सने दायित्व फेटाळले

नूडल्समुळे मुलीचे आरोग्य बिघडले, याचा कोणताही वैद्यकीय किंवा प्रयोगशाळेत चाचणी केल्याचा पुरावा आढळलेला नाही, असा युक्तीवाद ‘रिलायन्स रिटेल’ने केला. तसेच हे पाकिट सीलपॅक होते. त्यावर स्पष्टपणे मुदतीचा दिनांक लिहिलेला होता. ग्राहकाने वस्तू घेतांना व्यवस्थित पडताळणी करायला हवी, असेही दुकान मालकाने सांगितले.

ग्राहकांनी मुदत दिनांक पहाणे अपेक्षित नाही ! – जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोग

आयोगाने निकालात म्हटले की, मुदतीचा दिनांक उलटून गेलेला कोणताही पदार्थ दुकानात न ठेवणे किंवा त्याची ग्राहकांना विक्री होऊ न देणे, हे सर्वतोपरी दुकानदाराचे न टाळता येणारे काम आहे. ग्राहकाने दैनंदिन पदार्थ विकत घेत असतांना सर्व पदार्थ वर-खाली, आलटून-पालटून पाहून त्याच्यावरील मुदतीचा दिनांक पहाणे अपेक्षित नाही.