जेवणात अळ्या सापडल्यामुळे गोवा विद्यापिठाचा खानावळ (मेस) कंत्राटदार निलंबित

प्रतिकात्मक चित्र

पणजी, १० जुलै (वार्ता.) – गोवा विद्यापिठाच्या वसतीगृहातील खानावळीतील जेवणात अळ्या सापडल्या प्रकरणी गोवा विद्यापिठाने वसतीगृहातील खानावळ (मेस) चालवणार्‍या कंत्राटदाराला निलंबित करून काळ्या सूचीत टाकले आहे, अशी माहिती कुलसचिव सुंदर धुरी यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘९ जुलैला खानावळीतील जेवणात अळ्या आणि किडे सापडले होते. हा प्रकार खरोखर दुर्दैवी होता. त्यानंतर लगेचच आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावून दंड ठोठावला होता. आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करायचा नाही. त्यामुळे आम्ही कंत्राटदाराला कायमस्वरूपी निलंबित करून काळ्या सूचीत टाकले आहे. कंत्राटदाराला काढल्याने काही दिवस खानावळ बंद राहील; मात्र यामुळे पैसे भरलेल्या विद्यार्थ्यांची आर्थिक हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.’’

खानावळीमध्ये अळ्या असलेले अन्न दर्शवणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. या घटनेची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ एक चौकशी समिती स्थापन करणार असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. भारतीय जनता युवा मोर्चासह विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली.