पश्चिम महाराष्ट्रातील दुधात आढळली २५ टक्के भेसळ !

  • विधानसभेत अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांची स्वीकृती !

  • राज्यात कार्यवाहीत विलंब होत असल्याचे उघड !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई  – अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर पश्चिम महाराष्ट्रात संकलित होणार्‍या दुधात मोठी घट झाली आहे. ही घट नेमकी किती झाली ? याची माहिती सभागृहाला द्यावी, अशी मागणी भाजपचे आमदार गोपचंद पडळकर यांनी विधानसभेत केली. यावर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरि झिरवळ यांनी ‘कारवाईनंतर पश्चिम महाराष्ट्रात संकलित होणार्‍या दुधामध्ये २०-२५ टक्के घट झाली’, अशी धक्कादायक माहिती सभागृहात दिली. यावरून पश्चिम महाराष्ट्रात संकलित होणार्‍या दुधामध्ये २५ टक्क्यांपर्यंत भेसळ होत असल्याचे आणि कारवाईनंतर भेसळ थांबल्याचा प्रकार उघड झाला.

‘भेसळीविरुद्ध कठोर कायदे आहेत; परंतु कार्यवाहीमध्ये विलंब होतो’, अशी स्वीकृती झिरवळ यांनी दिली. ‘दुधामध्ये भेसळीप्रकरणी दूध संघाच्या मालकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले का ?’ असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला. यावर नरहरि झिरवळ यांनी गुन्हे नोंदवण्यात आल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘जालन्यातील ‘मुंदडा इंडस्ट्रीज’ या तुपाच्या कारखान्यावरील धाडीत भेसळयुक्त तूप आढळले, त्या प्रकरणी काय कारवाई केली ?’ याविषयी तारांकित प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. या वेळी दुधातील भेसळीविषयी चर्चा झाली. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी यापूर्वी ‘मुंदडा इंडस्ट्रीज’मध्ये भेसळ आढळल्याचे सभागृहात सांगितले.

भेसळीमुळे राज्यातील कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त ! – आमदार गोपीचंद पडळकर, भाजप

आमदार श्री. गोपीचंद पडळकर

मक्याच्या पिकाला युरिया टाकून पाणी दिले नाही, तर २ दिवसांत पीक जळून जाते. भेसळखोर युरियाद्वारे दूध करून राज्यातील कोट्यवधी लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. भेसळयुक्त दुधाद्वारे मुलांना विष पाजले जात आहे. त्यामुळे भेसळखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी.

तुपातील भेसळ सिद्ध झाल्यास १ लाख रुपये ते मृत्यूदंडापर्यंत शिक्षा ! – नरहरि झिरवळ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

‘मुंदडा इंडस्ट्रीज’मधील तुपाचे ८ नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांतील ६ नमुने अप्रमाणित आढळले आहेत; परंतु हे नमुने पुनर्पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याविषयीची माहिती २३ जुलै या दिवशी प्राप्त होणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल. भेसळीच्या विरोधातील कायद्यानुसार १ लाख रुपये दंड ते मृत्यूदंडापर्यंत शिक्षेचे प्रावधान आहे. यानुसार संबंधित मालकावर कारवाई केली जाईल.

या वेळी आमदार किशोर पाटील यांनी ‘तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे काम सुरळीत चालू झाले आहे. त्यामुळे पुढील ३ वर्षे तरी त्यांचे स्थानांतर करू नये’, अशी मागणी केली. त्यावर ‘तसे होणार नाही’, असे नरहरि झिरवळ यांनी सांगितले.

काँग्रेस कार्यालयातील जेवणात आढळली माशी !

अधिवेशनाच्या काळात काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यालयातील जेवणात माशी आढळली. त्यामुळे ‘विधानभवनामध्ये येणारे अन्न सुरक्षित आहे का ?’ असा प्रश्न काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे अतिशय गंभीर असून याविषयी चौकशी करण्याचे निर्देश दिले.