पुण्यनगरीत दोन्ही पालख्यांचे भक्तीमय वातावरणात स्वागत !

पुणे – पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या सहस्रो वारकर्‍यांसह पुण्यनगरीमध्ये आल्या. संतांच्या पालख्यांनी अवघे शहर भक्तीभावाने आणि चैतन्याने भारावून गेले. ‘संतभार पंढरीत, कीर्तनाचा गजर होत’ या संत जनाबाईंच्या अभंगाप्रमाणे पुणे येथे कीर्तनाचा गजर दुमदुमला आहे. ११ जुलैला पालख्यांचा मुक्काम सासवड येथे असणार आहे.

खांद्यावर भागवत धर्माची पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात टाळ अन् मृदंग आणि मुखात ‘ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’, असा अखंड जयघोष करत वारकर्‍यांचा हा भक्तीमेळा पुणे येथे आला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत पुणेकरांनी पुष्पवृष्टीने केले. टाळ मृदंगाच्या गजरात पालखीमार्ग विठ्ठलमय झाला. वाकडेवाडी येथील मुळा आणि मुठा नदीच्या संगमाच्या तिरावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची भेट झाली.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रथम आगमन झाले. त्या पाठोपाठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले. दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी संगम पुलाजवळील पाटील इस्टेट येथे पुणेकरांनी गर्दी केली होती. दोन्ही पालख्या फुलांच्या आकर्षक रचना आणि विद्युत् रोेषणाईने सजवण्यात आल्या आहेत.

या दोन्ही पालख्यांचे स्वागत पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर यांच्यासह अनेक पदाधिकार्‍यांनी करत पालखीचे दर्शन घेतले.

नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, डेक्कन जिमखाना, टिळक चौक आणि लक्ष्मी रसत येथे दोन्ही पालख्यांवर नागरिकांनी आनंदीत होऊन पुष्पवृष्टी केली.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुका मंदिर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे आरती झाल्यानंतर दोन्ही पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ झाल्या.

पुनीत बालन ग्रूपकडून वारीतील पोलिसांना ‘कीट’ !

आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर आणि सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ९ सहस्र जीवनाश्यक वस्तूंच्या ‘कीट’चे (पाकिटांचे) वाटप करण्यात आले. त्यात दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे.

आळंदीतून ‘आयटी दिंडी’चे प्रस्थान

पुण्यातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तंत्रज्ञांनी चालू केलेल्या ‘आयटी दिंडी’चे प्रस्थान ९ जुलै या दिवशी आळंदी येथून झाले. ते महाराष्ट्राच्या समृद्ध वारी परंपरेची माहिती जगभर देण्यासाठी, त्याची ओळख होण्यासाठी या भक्ती प्रवासात सहभागी होतात. या वर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढवून ‘एआय दिंडी’ असे जोडनाव देण्यात आले. या दिंडीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील १ सहस्र २०० वारकर्‍यांनी सहभाग घेतला आहे.