देवद (पनवेल) येथील ध्यानमंदिरात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधकाला सूक्ष्मातून झालेले श्रीविष्णुदर्शन !

देवद आश्रम

१. ध्यानमंदिरात बसल्यावर साधकाला ‘देवांच्या सभेत बसून नामजप करत आहे’, असे दृश्य दिसून सिंहासनारूढ श्रीविष्णूचे दर्शन होणे

श्री. नंदकिशोर नारकर

‘गुढीपाडव्याच्या दिवशी (१९.३.२०२६) मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात उपायांसाठी बसलो होतो. त्या वेळी डोळे मिटल्यावर मला सूक्ष्मातून पुढीलप्रमाणे जाणवले, ‘मी देवांच्या सभागृहात (दरबारात) आहे. मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत आहे; परंतु माझ्या शेजारी बसलेल्या साधकाने मला ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करायला सांगितला. त्या वेळी माझे लक्ष समोर गेले. तेथे मला ‘सिंहासनावर साक्षात् श्रीविष्णु विराजमान झालेले दिसले. तेथे नववर्षानिमित्त सभा भरली होती. तेथे सर्व देवता जमल्या होत्या आणि प्रत्येक जण श्रीविष्णूच्या चरणांजवळ जाऊन काही ना काही अर्पण करत होते.

२. कुबेराने श्रीविष्णुचरणी अर्पण केलेल्या पादुका श्रीविष्णूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाठवण्यास सांगणे

मी तेथे गेलो. त्या वेळी देवांचा खजिनदार असलेल्या श्री कुबेराने सुवर्णमय पादुका श्रीविष्णूच्या चरणी अर्पण केल्या. श्रीविष्णूने त्या पादुकांना स्पर्श करून त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाठवण्यास सांगितल्या.

३. ‘पृथ्वीवर लवकरच ईश्वरी राज्याची स्थापना होणार असल्याने तेथे धन आणि औषधे यांची आवश्यकता भासणार आहे’, असे श्रीविष्णूने सांगणे

तेव्हा श्रीविष्णूने श्री धन्वन्तरि देवतेला सांगितले, ‘तेथे सर्व औषधी वनस्पतींची लागवड करा. वैद्यांना धन आणि औषधे यांची आवश्यकता भासणार आहे.’ ‘तेथे लवकरच ईश्वरी राज्याची स्थापना होणार असून त्यासाठी या सगळ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे सर्व तेथे पाठवून द्यावे’, असे श्रीविष्णुदेवाने सर्व देवतांना सांगितले.’

– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर (वय ७१ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.३.२०२६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.