सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर अन् पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य !

‘कलीच्या प्रभावाने काही साधक-जिवांना संतांच्या अस्तित्वाचे महत्त्व लक्षात येत नाही. त्यामुळे त्यांना संतांच्या चैतन्याचा अपेक्षित असा लाभ करून घेणे कठीण होते. साधक संत आणि सद्गुरु यांना ‘देह’ म्हणून पहातात. ‘संतांचे दैवी आणि विश्वव्यापी रूप समष्टीसमोर यावे अन् भीषण आपत्काळ चालू होण्यापूर्वी त्यांच्या चैतन्याचा लाभ होऊन साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी हा लेखप्रपंच ! 

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांच्या अन् गुजरात राज्याच्या सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर (वय ५३ वर्षे) आणि पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५६ वर्षे) यांच्या संदर्भात देवाने दिलेले ज्ञान पुढे दिले आहे. 

सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव

१. अवतारांचे कार्य 

भगवंत पृथ्वीवर प्रगट होतांना त्याच्या परिवारातील देवता आणि भक्तगण यांच्यासहित येतो. त्यामागे भगवंताची लीला असते. त्याचे समष्टी ध्येय ‘विश्वातील असुरांचा नाश करून धर्मसंस्थापना करणे आणि उन्नत, दैवी जिवांच्या इच्छा पूर्ण करून त्यांची आध्यात्मिक उन्नती करणे’, हे असते, उदा. द्वापरयुगात भगवान श्रीकृष्णाच्या समवेत असणारे गोप-गोपी हे उन्नत जीव होते. त्यांना भगवंताच्या अवतारी कार्यात सहभागी व्हायचे होते. द्वापरयुगात भगवान श्रीहरीने कंस इत्यादी असुरांचा नाश केला आणि गोप-गोपींच्या समवेत रासलीला खेळून त्यांची आध्यात्मिक पातळी ६५ टक्क्यांवरून ८५ टक्क्यांपर्यंत नेली, म्हणजे त्यांची ‘चित्तशुद्धी’ करून त्यांची आत्मिक प्रगती करून घेतली. ‘चित्तशुद्धी म्हणजे मायेत राहूनही मायेपासून अलिप्त रहाणे’ होय. (८५ टक्के आध्यात्मिक (आत्मिक) पातळीनंतर स्वभावदोष आणि अहं अथवा प्रारब्ध यांच्यामुळे साधनेत घसरण होत नाही.)

२. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये ! 

अ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्यामध्ये देवी पार्वतीचे, म्हणजे ‘शैलपुत्री’चे ‘हरितालिका’ तत्त्व कार्यरत असून पू. (सौ.) संगीता जाधव यांच्यात हरितालिकेची सखी ‘देवी अलिखा’ हिचे तत्त्व कार्यरत आहे. (‘अलिखा’ या शब्दाचा अर्थ आहे ‘सखी.’)

आ. सद्गुरु अनुराधाताई आणि पू. (सौ.) संगीताताई यांनी अल्प कालावधीत कठोर साधना करून संतपद प्राप्त केले आहे.

३. प.पू. गुरुदेवांनी सांगितलेली ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ !  

कलियुगात प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) साधकांसाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ ही त्याची पहिली पायरी असून चित्तशुद्धीसाठी तो अत्यंत कठोर; परंतु जलद आध्यात्मिक उन्नती करून देणारा साधनामार्ग आहे. या मार्गानुसार साधना करून मोक्षप्राप्ती करण्यासाठी जे जीव पृथ्वीवर जन्म घेतात, त्या जिवांचे ध्येय ‘भोग सकारात्मकतेने भोगून भगवंतप्राप्ती करणे’, हेच असते. हे ध्येय त्या जिवांच्या चित्तात सदैव जागृत असते; म्हणून या आपत्काळात सनातनच्या अनेक साधकांना अनेक अडचणी असूनसुद्धा त्यांनी साधना सोडलेली नाही. अडचणींमुळे साधकांच्या मनात साधना सोडण्याचा विचार आला, तरी श्रीहरि विष्णुरूपी गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) त्यांचा हात सोडत नाहीत. त्यामुळे ज्या काळात साधकांना जगणे कठीण आहे, त्या काळात ते साधना करू शकत आहेत. ही केवळ प.पू. गुरुदेवांची कृपा आहे.

४. सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडून होत असलेले वैशिष्ट्यपूर्ण दैवी कार्य !

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

४ अ. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे दैवी कार्य ! 

४ अ १. प.पू. गुरुदेवांनी साधकांच्या चित्तशुद्धीचे दायित्व सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना देणे आणि त्या ‘प्रक्रियादेवी’ म्हणून प्रगट होणे : प.पू. गुरुदेवांनी गुरुकृपायोगानुसार साधना सांगतांना साधकांच्या चित्तशुद्धीचे दायित्व पृथ्वीवर सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याकडे दिले आहे. या कलियुगात त्या ‘प्रक्रियादेवी’ म्हणून प्रगट झाल्या आहेत. ‘त्याग’ आणि ‘प्रीती’ ही प्रक्रियादेवीची (सद्गुरु अनुराधाताई यांची) आयुधे असून तिने कलियुगात समष्टीच्या कल्याणासाठी मारक भाव धारण केला आहे. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी स्वतःच्या जीवनात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ अतिशय कठोरपणे आचरणात आणली असून त्या ती समष्टीकडूनही राबवून घेत आहेत.

४ अ २. साधकांच्या शुद्धीकरण सत्संगांपूर्वी सद्गुरु अनुराधाताई समष्टीकडून करून घेत असलेली प्रार्थना, म्हणजे पार्वतीने केलेला ब्रह्मांडव्यापी संकल्प असणे : वर्ष २००५ मध्ये साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी (मनाचे शुद्धीकरण होण्यासाठी) सत्संग चालू झाले. सत्संग चालू होण्यापूर्वी सद्गुरु अनुराधाताई समष्टीकडून पुढील प्रार्थना करून घ्यायच्या, ‘हे भगवंता, तू आरंभलेल्या शुद्धीयज्ञात आमच्यातील स्वभावदोष आणि अहं यांची आहुती पडू दे.’ ही केवळ प्रार्थना नसून देवी पार्वतीने ‘प्रक्रियादेवी’चे रूप धारण करून समष्टीसाठी केलेला ब्रह्मांडव्यापी संकल्प आहे; म्हणूनच ‘सनातन संस्था’ हे संत निर्माण करणारे ‘विद्यालय’ बनले आहे.

४ आ. पू. (सौ.) संगीता जाधव यांचे दैवी कार्य ! 

४ आ १. प.पू. गुरुदेवांनी साधकांमध्ये भावनिर्मिती करण्याचे दायित्व पू. (सौ.) संगीता जाधव यांना देणे आणि त्या ‘भावदेवी’ म्हणून प्रगट होणे : कलियुगात चित्तशुद्धीची प्रक्रिया राबवणे अत्यंत कठीण आहे; पण भगवंताप्रती असलेल्या भावामुळे ती सुलभ होते. प.पू. गुरुदेवांनी साधकांमध्ये भावनिर्मिती करण्याचे दायित्व पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडे दिले असून या कलियुगात त्या ‘भावदेवी’ म्हणून प्रगट झाल्या आहेत. ‘त्याग’ आणि ‘भक्ती’ ही भावदेवीची (पू. (सौ.) संगीताताई यांची) आयुधे असून तिने कलियुगात समष्टीच्या कल्याणासाठी तारक भाव धारण केला आहे. ‘दैवी गुण’ या तिच्या ‘साहाय्यक देवता’ आहेत.

४ आ २. ‘प्रक्रिया राबवतांना होणारा संघर्ष सुसह्य होऊन जिवात दैवी गुणांची निर्मिती होणे’, हे भावामुळे शक्य होत असणे : ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ आणि ‘गुणसंवर्धन’ या परस्परपूरक क्रिया आहेत. ‘जिवात असलेले स्वभावदोष आणि अहं घालवले पाहिजेत’, हे ‘प्रक्रिया’ शिकवते. ‘प्रक्रिया राबवतांना होणारा संघर्ष सुसह्य होऊन जिवामध्ये दैवी गुणांची निर्मिती होणे’, हे भावामुळे शक्य होत आहे. जिवामध्ये दैवी गुणांची निर्मिती होऊन चित्तशुद्धीचे ध्येय साध्य होत आहे. त्यामुळेच साधकांना सेवेतील आनंद अनुभवता येत आहे.

४ आ ३. पू. संगीताताई साधकांकडून ‘गुण-संवर्धन’ या टप्प्याचे प्रयत्न करून घेत असल्याने साधकांना प्रक्रिया आनंदाने राबवता येत असणे : साधक-जिवातील स्वभावदोष आणि अहं न्यून झाल्यावरच त्याच्यात देवतारूपी गुण निर्माण होऊ शकतात.

पू. संगीताताई साधकांकडून या प्रक्रियेतील ‘गुण-संवर्धन’ या टप्प्याचे प्रयत्न करून घेत असून त्यांना ‘प्रक्रियादेवी’च्या प्रीतीचा अनुभव करून देत आहेत. त्यामुळे साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आनंदाने राबवू शकत आहेत.

४ इ. प.पू. गुरुदेवांनी सद्गुरु अनुराधाताई आणि पू. संगीताताई यांच्या रूपातून संकल्परूपी आशीर्वाद दिल्याने साधकांना स्वभावदोष अन् अहं यांवर मात करता येणे : आज सनातनचे साधक स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची जी प्रक्रिया राबवत आहेत, तो सद्गुरु अनुराधाताई यांचा समष्टीसाठी संकल्परूपी आशीर्वाद आहे. वैदिक इतिहासात अनेक तपस्वी, ऋषिमुनी स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांवर मात करू शकले नाहीत, उदा. महर्षि दुर्वास, महर्षि विश्वामित्र. सनातनचे साधक स्वभावदोष आणि अहं यांवर मात करू शकत आहेत; कारण प.पू. गुरुदेवांनी सद्गुरु अनुराधाताई अन् पू. (सौ.) संगीताताई यांच्या रूपातून समष्टीला संकल्परूपी आशीर्वाद दिला आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (२१.११.२०२५)

वरील लिखाण करतांना साधिकेला बराच वेळ सद्गुरु अनुराधाताईंचे आडनाव न आठवणे आणि त्याचे देवाने तिला सूक्ष्मातून सांगितलेले कारण ! 

‘वरील लिखाण करतांना मला सद्गुरु अनुराधाताईंचे आडनाव पुष्कळ वेळ आठवले नाही. ‘असे कशामुळे झाले ?’, असे मी देवाला विचारल्यावर उत्तर आले, ‘सद्गुरु अनुराधाताईंचा प्रकृतीशी असणारा देवाण-घेवाण हिशोब संपल्यामुळे त्यांची ९० टक्के देहरूपी स्पंदने अनंतात विलीन झाली आहेत. त्यामुळे देहाशी संबंधित आडनावाची स्पंदने ग्रहण झाली नाहीत. सद्यःस्थितीत त्यांच्यातील ७० टक्के देवीतत्त्व समष्टीसाठी कार्यरत आहे.’ – अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, जिल्हा ठाणे. (२१.११.२०२५)    

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.