सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !

‘गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) कलियुगातील सर्वसाधारण मनुष्याला सहज आकलन होणारी, साधी अन् सोपी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगून मानवजातीच्या कल्याणाचे मर्मच सांगितले आहे.

सद्गुरु अनुराधा वाडेकर

१. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी शिकवल्याप्रमाणे साधिकेने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे 

१ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी साधिकेला सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगणे : ‘सप्टेंबर २००४ मध्ये माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली होती. तेव्हा मी मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले श्री. सत्यवान कदम (आताचे सद्गुरु सत्यवान कदम) यांना भेटले आणि त्यांना माझ्या त्रासावरील आध्यात्मिक स्तरावरील उपाय विचारले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा नवीन भाग, म्हणजे स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे !’’ ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्यांनी मला कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) यांचे मार्गदर्शन घेण्यास सांगितले.

१ आ. अनुराधाताईंनी मला ‘स्वतःकडून होणार्‍या चुकांचे निरीक्षण कसे करायचे ? चुका सारणीत कशा लिहायच्या ?’, यांविषयी सांगितले. त्यानंतर मी तसे प्रयत्न चालू केले.

१ इ. साधिकेच्या मनात प्रक्रियेविषयी विकल्प येणे आणि सद्गुरु अनुराधाताईंनी ‘गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून प्रयत्न करत रहायचे’, असे सांगितल्यावर तिचे मन सकारात्मक होणे : त्या वेळी माझ्या मनात विकल्प आला, ‘हे स्वभावदोष कित्येक जन्मांचे आहेत, तर लिहून आणि सूचना देऊन ते कसे जाणार ?’ याविषयी मी अनुराधाताईंना विचारले. तेव्हा अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘कित्येक जन्मांत जे झाले नाही, ते या जन्मात गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) संकल्पाने होणार आहे. आपण श्रद्धा ठेवून प्रयत्न करत रहायचे.’’ अनुराधाताईंच्या या वाक्याने माझे मन एकदम सकारात्मक झाले. आताही मला त्याचा लाभ होत आहे.

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ ! 

पू. (सौ.) संगीता जाधव

२ अ. चूक स्वीकारतांना साधिकेच्या मनाचा संघर्ष होणे आणि तिने गुरुदेवांना प्रार्थना करून प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे : कित्येक वेळा माझ्या स्वभावदोषांची तीव्रता अधिक असल्याने चूक स्वीकारतांना माझ्या मनाचा संघर्ष होत असे; मात्र ‘गुरुदेवांपेक्षा श्रेष्ठ अन्य कुणी असूच शकत नाही आणि त्यांनी सांगितलेली प्रक्रिया हीच माझ्यासाठी योग्य आहे’, याचीही मला लगेच जाणीव होत असे. त्या वेळी मी गुरुदेवांनाच प्रार्थना करून प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असे.

२ आ. प्रक्रियारूपी देवता सतत समवेत असल्याने साधिकेला समाजातील रज-तमाचा स्वतःवर अल्प परिणाम होत असल्याचे जाणवणे : न्यायालय, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, या ठिकाणी असलेल्या रज-तमयुक्त वातावरणात सेवा करतांना प्रक्रियारूपी देवता सतत समवेत असल्याचे मी अनुभवत आहे. त्यामुळे मला ‘समाजात सगळ्यांसमोर न्यूनपणा घेणे, चूक झाल्यास संबंधितांची क्षमा मागणे’, हे सहज शक्य होत आहे. त्यामुळे समाजातील रज-तमयुक्त वातावरणाचा माझ्यावर अल्प परिणाम होत असल्याचे मी अनुभवत आहे.

३. साधिकेला सभेच्या वेळी सूत्रसंचालन करण्याचा ताण येणे आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या भावजागृतीपर बोलण्याने तिचा ताण दूर होऊन ती उत्साहाने सेवा करू शकणे  

वर्ष २००८ मध्ये सांगली जिल्ह्यात हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन केले होते. त्या वेळी सौ. संगीताताई (आताच्या पू. (सौ.) संगीता जाधव) सांगलीत आल्या होत्या. फेब्रुवारी २००८ मध्ये मिरज येथील सभेचे सूत्रसंचालन करण्याची सेवा माझ्याकडे होती. सभेच्या दिवशी सेवेला अनुसरून केशरचना करतांना मी माझ्या केसांना पिना लावल्या होत्या. मला तशी सवय नसल्याने माझे डोके जड झाले आणि मला त्याचा ताण आला होता. मी लगेच सौ. संगीताताईंना माझ्या मनाची स्थिती सांगितली. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘‘तू सूत्रसंचालन करण्यासाठी व्यासपिठावर आलीस की, आम्ही तुझ्यामध्ये श्री दुर्गादेवी, श्री महालक्ष्मी बघणार ! तू तुला होणार्‍या त्रासाचा विचारच करू नकोस.’’ त्यांच्या या भावजागृतीपर वाक्याने मला उभारी आली आणि मी उत्साहाने सूत्रसंचालन करू शकले.

अधिवक्त्या प्रीती पाटील

‘क्लिष्ट वाटणारी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मी सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्याकडून शिकल्याने ती सहजतेने राबवू शकले अन् तिचे लाभ अनुभवू शकले’, याबद्दल गुरुदेव, सद्गुरु अनुराधा वाडेकर, पू. (सौ.) संगीता जाधव आणि प्रक्रियारूपी देवता यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली

(२२.१२.२०२५)

(‘वरील सूत्रे सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी सद्गुरुपद, तसेच पू. (सौ.) संगीता जाधव यांनी संतपद प्राप्त करण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावांच्या आधी ‘सद्गुरु’ अन् ‘पू.’, या उपाधी लावलेल्या नाहीत.’ – संकलक)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.