रत्नागिरीतील सनातनचे साधक नामवंत वैद्य मंदार भिडे यांचे निधन

नामवंत वैद्य कै.मंदार भिडे

रत्नागिरी – येथील आयुर्वेदाचार्य, वेदपाठशाळेचे अध्यक्ष आणि सनातनचे साधक वैद्य मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) यांचे ३ जुलै २०२६ च्या रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबई येथील सायन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

शुद्ध आयुर्वेद आणि जीवनशैलीतील पालट यांच्या जोरावर रुग्णांना व्याधीमुक्त करणारे येथील नामवंत वैद्य मंदार भिडे मुंबईत रेल्वे फलाटावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू असतांना त्यांचे निधन झाले.

वैद्य मंदार भिडे यांनी केवळ औषधोपचारांपेक्षा रुग्णाच्या आहारविहारातील पालटांवर अधिक भर दिला. रुग्णाची नाडीपरीक्षा करण्यासह त्याच्याशी संवाद साधून आजाराचे मूळ शोधण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे अनेकांचे जुनाट आजार त्यांनी बरे केले. ‘गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळे’चे ते अध्यक्ष होते. ते अध्यक्ष झाल्यानंतर पाठशाळेत वैविध्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येत होते. वैदिक हिंदु धर्मावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्येही त्यांचे मोठे योगदान होते.

‘दिवंगत वैद्य मंदार श्रीकांत भिडे यांना सद्गती मिळू दे,’ अशी सनातन परिवाराकडून श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !