रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांची ‘गोवंशियांची हत्या आणि अवैध वाहतुकी’च्या विरोधात विशेष मोहीम

रत्नागिरी – जिल्ह्यात गोवंशियांची हत्या, गोवंशियांची अवैध वाहतूक, अवैध मांस विक्री, तसेच संबंधित अन्य अवैध कृत्यांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक विशेष प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवली जात आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना संबंधित कायद्यांची काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना निर्दयपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ या कायद्यांनुसार गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जात आहे.

१. जिल्ह्यातील या अवैध कृत्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी २३ मे २०२६ पासून जिल्हास्तरावर ४ विशेष भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. ही पथके एकूण ४ पोलीस उपविभागांमध्ये सक्रीयपणे कार्यरत आहेत.

२. या पथकामध्ये खेड उपविभागाचे दायित्व पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले  (८७७९६४५०९१), चिपळूण उपविभागाचे दायित्व पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव  (७७७६०५९३७८), रत्नागिरी उपविभागाचे दायित्व पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे
(९०२८३८९४४५) आणि राजापूर-लांजा उपविभागाचे दायित्व पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे (७३५००२८४८२) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

३. या भरारी पथकांना गोवंशीय तस्करी, हत्या किंवा अवैध मांस विक्रीविषयी कोणतीही माहिती मिळताच तातडीने धाड टाकून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून संबंधित कार्यक्षेत्रात सातत्याने गस्त आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे.

४. या गुन्ह्यांमध्ये वारंवार सहभागी होणार्‍या व्यक्ती किंवा संघटित टोळ्यांवर जरब बसवण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कडक चेतावणी दिली आहे. अशा संघटित स्वरूपातील गुन्ह्यांमध्ये सहभागी असणार्‍यांवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.

५. या संपूर्ण विशेष मोहिमेचे मुख्य नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली असून गावपातळीवर प्रभावी माहिती संकलन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांची नोडल समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

६. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेत नागरिकांना सक्रीय सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. गोवंशियांची अवैध वाहतूक, तस्करी किंवा हत्येसारख्या कोणत्याही अवैध कृत्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे (९०११९९५७७७), संबंधित भरारी पथकातील पोलीस अधिकारी, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक ‘डायल ११२’ किंवा थेट पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या ८८५७८४८१५७ या मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.

‘तसेच माहिती देणार्‍या जागरूक नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल’, अशी ग्वाहीसुद्धा पोलीस दलाकडून देण्यात आली आहे.