एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व किंवा तिचे परदेशी नाव तिची हिंदु धर्मावरील श्रद्धा ठरवू शकत नाही ! – Madras High Court

अमेरिकी हिंदु महिला लॉरा फ्रान्सिस अय्यंगार हिला मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश करण्यापासून रोखल्याच्या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

AI निर्मित चित्र

चेन्नई (तमिळनाडू) – एखाद्या व्यक्तीचे राष्ट्रीयत्व किंवा तिचे परदेशी नाव तिची हिंदु श्रद्धा ठरवू शकत नाही. हिंदु धर्म अत्यंत उदार आहे आणि तो स्वीकारण्यासाठी कोणत्याही औपचारिक समारंभाची किंवा धर्मांतरच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने एका खटल्यात दिला. लॉरा फ्रान्सिस अय्यंगार या अमेरिकी हिंदु धर्म स्वीकारलेल्या महिलेला तमिळनाडूतील तंजावर येथील श्री अरुलमिगु अभिष्ट वरदराजपेरुमाळ मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यापासून केवळ यासाठी रोखण्यात आले होते; कारण प्रशासनाने त्यांच्या परदेशी नावामुळे आणि अमेरिकी नागरिकत्वामुळे त्यांना ख्रिस्ती मानले होते.

न्यायालयाने आदेशात केवळ त्या महिलेचे अधिकारच पुनर्संचयित केले नाहीत, तर हिंदु धर्माची व्यापकता, उदारता आणि त्याच्या ऐतिहासिक स्वरूपावरही महत्त्वपूर्ण भाष्य केले. न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की, लॉरा यांनी पूर्ण निष्ठा आणि आचरण यांद्वारे हिंदु धर्म स्वीकारला असून त्यांना इतर हिंदु महिला भक्तांप्रमाणेच मंदिरात पूजा-अर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे.