
१. जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त
जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे परम निष्काम भक्त होते. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग आले; परंतु त्यांनी कधीच विठ्ठलाला वैयक्तिक उद्देशांसाठी प्रार्थना केली नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज हे ईश्वराचे समष्टी स्तरावरील श्रेष्ठ निष्काम भक्त होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनातील दुःखद प्रसंग ईश्वरेच्छा समजून आनंदाने स्वीकारले. त्यांनी सर्व प्रसंगांकडे साक्षीभावाने पाहून प्रारब्धाचे भोग भोगले. असे त्यांनी त्यांच्या अभंगामध्येही म्हटले आहे.
१ अ. जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगातील पंक्ती
१ अ १. ‘हेचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ।।
– तुकाराम गाथा, अभंग २८६७, ओवी १
अर्थ : ‘देवाला तीच ‘थोर’ (मोठी किंवा श्रेष्ठ) भक्ती आवडते, जिच्यामध्ये भक्त या संसारातील मायेचा (मोहाचा) त्याग करण्याचा संकल्प करतो.’
१ अ २. ठेविले अनंते तैसेचि रहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।
– तुकाराम गाथा, अभंग २८६७, ओवी २
अर्थ : त्या परमेश्वराने (अनंताने) आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवले आहे, त्यात आनंदाने राहावे आणि आपल्या अंतःकरणात नेहमी समाधान असू द्यावे.
१ आ. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण धोक्यात असतांना जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाला आर्ततने प्रार्थना करून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य यांचे रक्षण करणे : छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज यांना भेटण्यासाठी देहू गावात गेले होते. तेव्हा संत तुकाराम महाराज सायंकाळी श्री विठ्ठलाच्या मंदिरात कीर्तनातून छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘संन्यास धारण करून त्यांचे शिष्य न बनता राजधर्माचे पालन करून आदर्श राजर्षि बनण्याविषयी’ मार्गदर्शन करत होते. त्या वेळी मोगलांची सेना संपूर्ण विठ्ठल मंदिराला वेढा घालते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी शोधाशोध करू लागते. तेव्हा तुकाराम महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रक्षक छत्रपती शिवाजी महाराज अन् स्वराज्य यांच्यावरील संकट दूर करण्यासाठी व्याकूळ झाले. श्री विठ्ठलाचे निष्काम भक्त असलेले संत तुकाराम महाराज हे आर्तभावाने विठ्ठलापुढे टाहो फोडून पुढील प्रार्थना करून विठ्ठलनामाचा अखंड गजर करू लागले.

१ आ १. अभंगाच्या ओळी आणि त्यांचा भावार्थ
अ. फुटो हे मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ।।
– तुकाराम गाथा, अभंग ४३१५, ओवी २
अर्थ : ‘माझे मस्तक फुटले, तरी चालेल किंवा हे शरीर संपुष्टात आले (शरिराचे तुकडे झाले), तरी चालेल; पण मुखातून होणारा विठ्ठलाच्या नामाचा जयघोष मी कदापि सोडणार नाही. शरिरापेक्षा भगवंताचे नाम मला अधिक प्रिय आहे’, असा ठाम निश्चय तुकाराम महाराज व्यक्त करतात.
जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी उत्कट भावाने केलेली प्रार्थना ऐकून श्री विठ्ठलाने संत तुकाराम महाराजांच्या निष्काम भक्तीवर तात्काळ प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा केली. त्यामुळे मंदिरातील प्रत्येक भाविकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे रूप प्राप्त होते. हा चमत्कार पाहून मोगल सैनिक गोंधळून जातात. त्यामुळे खरे छत्रपती शिवाजी महाराज तेथून निसटून जाण्यास यशस्वी होतात. अशा प्रकारे भगवंताच्या साक्षीभावात निमग्न असणार्या परमश्रेष्ठ निष्काम भक्ताची प्रार्थना ऐकून भगवंताला समष्टीचे कल्याण करावेच लागते.
– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘सिटीझन व्हिजिलान्टे’ : न्याय बंदुकीने करावा कि चांगुलपणा जपत त्याची वाट पहावी ?
कथित स्त्रीवाद्यांकडून हिंदु समाजावर करण्यात येणारे आघात !
मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात स्वतःच्या कार्याविषयी येत असलेल्या विचारांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !