प्रार्थना – भक्तीचे साकार रूप !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘प्रार्थना करणे’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म ज्ञानातून उमगलेले उत्तररूपी आध्यात्मिक विश्लेषण !

परात्पर गुरुदेवांना शरणागतभावाने प्रार्थना !

प्रश्न – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘प्रार्थना करणे’, म्हणजे देवाकडे काहीतरी मागणे; पण ‘सर्व काही ईश्वराच्या इच्छेने होत असते. त्यामुळे ‘प्रार्थना’ अणि ‘ईश्वरेच्छा’ यांची सांगड कशी घालावी ? साधना करतांना किती टक्के पातळीपर्यंत प्रार्थना करणे योग्य ठरते ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उत्तर – सुश्री मधुरा भोसले :

१. ‘प्रार्थना’ या शब्दाचा अर्थ भगवंताला केलेली आर्त याचना, म्हणजे ‘प्रार्थना’ होय. 

२. प्रार्थना करत असतांना भाविकांचे जागृत होणारे भाव आणि भक्ती

देवाला प्रार्थना करत असतांना भाविकांमध्ये ‘याचकभाव’ प्रामुख्याने जागृत झालेला असतो. त्याचप्रमाणे ‘आर्तभाव, समर्पितभाव आणि शरणागतभाव’ हे ३ प्रकारचे भावही भाविकांमध्ये जागृत होतात. तसेच प्रार्थनेतून भक्ताला भगवंताची याचकभक्ती आणि शरणागतभक्ती यांची प्राप्ती होते. ‘प्रार्थना’ हे भक्तीचे साकार रूप आहे.

३. ‘प्रार्थना’ ही ‘भक्त आणि भगवंत’ यांच्यातील ‘द्वैतभाव’ किंवा ‘द्वैतस्थिती’ यांची सूचक असणे

जेव्हा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये द्वैतभाव असतो, तेव्हा दोघांचे अस्तित्व एकमेकांपासून भिन्न असते. ‘प्रार्थना’ ही ‘भक्त आणि भगवंत’ यांच्यातील ‘द्वैतभाव’ किंवा ‘द्वैतस्थिती’ यांची सूचक असते. अशा वेळी भक्त भगवंताला विविध प्रकारच्या प्रार्थना करत असतो.

(क्रमशः) 

– सुश्री मधुरा भोसले (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ती साधिका, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


प्रार्थनेचे महत्त्व आणि तिचे सामर्थ्य !

भक्तांनी भगवंताला प्रार्थना केल्यामुळे सूक्ष्म स्तरावर घडणारी प्रक्रिया 

सुश्री (कु.) मधुरा भोसले

ईश्वरापासून सृष्टी निर्माण झाल्यानंतर ईश्वर साक्षीभावात राहून ब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे कार्य पहात आहे. भक्तावर कृपा करण्यासाठी ईश्वराला साक्षीभावातून बाहेर येणे आवश्यक असते. ‘प्रार्थना’ हे भक्तीचे साकार रूप असल्यामुळे प्रार्थनेमध्ये भक्तीचे सामर्थ्य सामावलेले असते. त्यामुळे जेव्हा ईश्वराचे भक्त त्याला भक्तीपूर्ण प्रार्थना करतात, तेव्हा भक्ताच्या प्रार्थनारूपी भक्तीचे तरंग ईश्वरापर्यंत जाऊन पोचतात आणि ईश्वर साक्षीभावाच्या स्थितीचा त्याग करून भक्तवत्सल रूपात प्रगट होतो. त्यानंतर भगवंताचे हे भक्तवत्सल रूप भक्तावर कृपावंत होऊन त्याच्या ऐहिक किंवा पारमार्थिक मनोकामना पूर्ण करते. त्यानंतर भगवंत पुन्हा साक्षीभावाच्या स्थितीत जातो. हे प्रार्थनेचे महत्त्व आणि तिचे सामर्थ्य आहे. प्रार्थनेमुळे भगवंत भक्तावर प्रसन्न झाल्यामुळे भक्ताला आनंद होतो आणि तो भगवंताची आणखी भक्ती करू लागतो.

– सुश्री मधुरा भोसले

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.