गुरुचरणांकडे नेणारा शरणागतभाव !

हनुमंताजवळ शरणागतभाव असणे !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

शरणागतभाव असलेल्या जिवावर गुरूंची भरभरून कृपा होते आणि तो ईश्वराकडे, म्हणजेच निर्गुणाकडे अल्प काळात पोचतो. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्रीरामभक्त हनुमान. त्याच्यात उत्तम शिष्याचे सर्व गुण असण्यासमवेतच तळमळ आणि शरणागतभाव होता. तसेच त्याचा अहं शून्य टक्के होता. त्यामुळे त्याच्यावर श्रीरामाच्या कृपेचा वर्षाव सदैव होत होता आणि तो श्रीरामाचा सर्वांत आवडता भक्त होता.’

– सुश्री मधुरा भोसले आणि एक विद्वान (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

शरणागतभाव कधी वाढतो ?

गुरु किंवा ईश्वर यांना ‘संपूर्णपणे शरण जात आहे’, असे म्हणून प्रार्थना केल्याने शरणागती वाढण्यास साहाय्य होते. तीव्र प्रारब्ध भोगून संपवतांना शरणागती वाढते. प्रारब्धभोग, दुःख, अडचणी, संघर्षाचे प्रसंग हे सर्व म्हणजे जणू आपली शरणागती वाढवण्याची संधीच असते. एखादा प्रसंग किंवा परिस्थिती स्वीकारता येत नसतांना होणार्‍या संघर्षाच्या वेळी ईश्वराला संपूर्णपणे शरण गेले की, ईश्वर लगेचच काहीतरी मार्ग सुचवतो आणि आपल्याला योग्य विचार देऊन बळ देतो. जणू आपण त्याला शरण यावे म्हणूनच त्याने तशी परिस्थिती निर्माण केलेली असते !

म्हणून असे प्रसंग, परिस्थिती किंवा संघर्ष होण्याची वेळ येण्यापूर्वीच ईश्वराप्रती सतत शरणागती व्यक्त करत राहिले, तर स्थिरता वाढून प्रसंगांना योग्य प्रकारे सामोरे जाता येते. त्यामुळे स्वतःच्या हतबलतेची जाणीव वाढून कर्तेपणा ईश्वरचरणी अर्पण होतो. गुरु किंवा ईश्वर यांना सतत शरण जात रहाणे, म्हणजेच ईश्वराचे अस्तित्व मान्य करणे !


प्रत्येक कृती ‘ईश्वराच्या कृपेने घडत आहे’, असा भाव ठेवल्याने शरणागतभाव वाढतो !


‘साधकांनो, प्रत्येक कृती करतांना ती ‘ईश्वराच्या कृपेने घडत आहे’, हा भाव ठेवून करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे मन तेवढा वेळ ईश्वराच्या चिंतनात राहिल्याने शुद्ध होईल आणि ईश्वराचे चैतन्य तुमच्यासाठी सातत्याने कार्यरत होईल. तुमचा ईश्वराप्रती शरणागतीचा भाव वाढेल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कर्मबंधनात अडकणार नाही आणि पाप-पुण्य अन् देवाण-घेवाण यांचा संबंध निर्माण होणार नाही.’ – श्रीकृष्ण (एका साधिकेच्या माध्यमातून)

शरणागतभावात अहं पूर्णपणे नष्ट होणे !

सुश्री (कु.) मधुरा भोसले

‘भावाचे अनेक प्रकार आहेत. शरणागतभाव हा त्यांतीलच एक आहे. तो सर्वांत श्रेष्ठ भाव आहे. भावाच्या इतर प्रकारांमध्ये अहं निर्माण होऊ शकतो; परंतु शरणागतभावात अहं पूर्णपणे नष्ट होतो. त्यामुळे असा भाव असणार्‍या साधकाची आध्यात्मिक उन्नती सर्वांत शीघ्र होते आणि तो संत बनतो.’

– सुश्री मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

मृत्यूसमयी नामजप होण्यापेक्षा शरणागतभाव भाव महत्त्वाचा !

मृत्यूच्या वेळी जीव हा गुरूंच्या चरणी शरणागत असेल, तर त्या जिवाचा पुढील लोकांत होणारा प्रवास विहंगम पद्धतीने होतो; कारण अशा जिवावर भूलोकातच शरणागतभावाचा संस्कार झालेला असल्याने अशा जिवाचा अहं वाढण्याची भीती अल्प असते. शरणागत भावामध्ये जीव नामातीत झालेला असतो. अशा जिवाच्या भूलोकातील प्रवासासमवेतच पुढील लोकांत होणार्‍या प्रवासातील प्रत्येक क्षणाचे दायित्व गुरूंनीच घेतलेली असते. हा खरा जिवाच्या साधनेतील ‘गुरुकृपायोग’ होय. गुरुकृपायोगात मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतरही जिवावर गुरुकृपा असते.’

– श्री गुरुतत्त्व (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव

गुरूंना कृतज्ञतेचा भाव असणार्‍या शिष्यापेक्षा शरणागत भाव असलेला शिष्य जास्त प्रिय असणे !

‘गुरूंना कृतज्ञतेचा भाव असणार्‍या शिष्यापेक्षा शरणागत भाव असलेला शिष्य जास्त प्रिय असतो. गुरूंची कृपा सातत्याने होण्यासाठी स्वतःत शरणागतभाव निर्माण करा. तो निर्माण होण्यासाठी प्रथम कृतज्ञतेचा भाव येण्यासाठी प्रयत्न करा.’

– श्रीकृष्ण (एका साधिकेच्या माध्यमातून)