‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळा’ने मार्च २०२६ मध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेत ‘मराठी’ विषय घेऊन परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांपैकी ८० सहस्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. आश्चर्याचे हे की, मराठी भाषेला द्वितीय आणि तृतीय भाषा घेऊन परीक्षा देणारे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या घटनेला दीड मासांहून अधिक वेळ लोटला असून इतक्या मराठी भाषेत मोठ्या संख्येने अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात कुठेही त्याची चर्चा, कारणमीमांसा, कोण कारणीभूत आहे, याचा ऊहापोह झाल्याचे किंवा शिक्षण मंडळाने आणि पालक वर्गाने या संदर्भात काही कृती केल्याचे ऐकिवात वा दिसत नाही.
एकीकडे महाराष्ट्र शासन राज्यात रहाणार्या अमराठी नागरिकांना मराठी भाषेत व्यवहार किंवा संवाद साधण्याविषयी आग्रह करत असतांना दुसरीकडे मराठी भाषेकडे दुर्लक्ष होऊन अवनती होत आहे, हे खरोखर अनाकलनीय आहे. खरेतर महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण मंडळाने या घटनेचा परामर्श घेणे आवश्यक आहे. शिक्षक आणि पालक यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काही कृती करणे आवश्यक होते; परंतु तसे झाल्याचे काही दिसत नाही.

१. मराठी भाषेच्या दुर्दैवी निकालाविषयी असलेली कारणे
मराठी भाषेच्या अशा दुर्दैवी निकालाच्या मुळाशी वरकरणी पहाता शिक्षण प्रणाली, शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मराठी भाषेविषयी दिसून येणारी अनास्था ही पुढे दिलेल्या कारणामुळे असू शकते.
अ. इंग्रजी भाषेच्या वाढत्या आवडीमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढत असून मराठी भाषेच्या शाळांची संख्या न्यून होत आहे. काही मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या न्यून असल्यामुळे त्या शाळा बंद करण्यात येत आहेत.
आ. सरकार आणि शिक्षण मंडळ राज्यात इंग्रजी भाषेचा वृद्धींगत होणारा प्रभाव पाहून त्याला प्राधान्य देत असल्यामुळे ठिकठिकाणी इंग्रजी शाळांची संख्या वाढत आहे. पालक वर्गही या भाषेच्या मोहामध्ये अडकून आपल्या लहान मुलांना इंग्रजी भाषेच्या शाळेत भरती करत आहेत. इंग्रजी शिक्षण परवडत नसूनसुद्धा त्यांना त्याचा मोह आवरणे कठीण होत आहे.
इ. पालक वर्ग हा विशेष करून असे मत धरून चालला आहे की, मराठी भाषा ही इंग्रजी भाषेच्या तुलनेत न्यून असून पुढे व्यावसायिक क्षेत्रात तिचा काही लाभ होणार नाही आणि म्हणूनच लहान मुलांना इंग्रजी शाळेत भरती करत आहेत. इतकेच नव्हे, तर घरामध्येही मराठी भाषेऐवजी इंग्रजीतून बोलणे, तसा पोषाख परिधान करणे, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण होत आहे. त्यामुळे मुलांवर तसा कुसंस्कार होतो.
२. इंग्रजी भाषेत शिक्षण घेतल्याचे परिणाम

इंग्रजी भाषेत शिक्षण घेतल्यामुळे परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि पुढे तेथे नोकरी, व्यवसाय करणे, तसेच मुलाची कारकीर्द घडवण्याचा लाभ होण्याविषयी पालक मुलांवर तसे सतत बिंबवण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसून येते; परंतु यामुळे मुलांचे मातृभाषेविषयीचे प्रेम उणावण्यासह राष्ट्रप्रेमही उणावणार, हेही निश्चित आहे. पालकांनी पाल्यांना मातृभाषेची गोडी लावणे, संस्कारांविषयी अवगत करणे, इंग्रजी भाषा अन् पाश्चात्त्य विकृती यांपासून त्यांना दूर करणे पुष्कळ आवश्यक आहे.
३. महाराष्ट्र सरकार आणि शिक्षण मंडळ यांचे कर्तव्य
महाराष्ट्र सरकार आणि शिक्षण मंडळ यांनीही मराठी भाषेचे महत्त्व जाणून ती टिकवण्याचे सर्व प्रयत्न करायला हवेत. भाषेप्रती असलेली अनास्था दूर करायला हवी. सरकारने या विषयात लक्ष घालून काटेकोरपणे योग्य पावले उचलून त्याची प्रभावी कार्यवाही केली, तर अवनती होत चाललेल्या मराठी भाषेचा उत्कर्ष होण्यास मोलाचे साहाय्य होईल. अन्यथा राज्यात मराठी भाषेला दुय्यम स्थान प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.
असे होत असल्याचे नुकतेच घडलेले वृत्त, म्हणजे मुंबईतच एका मोठ्या आस्थापनाने नोकरीसाठी हिंदी भाषिक किंवा राजस्थानी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्यात मराठी भाषिक उमेदवारांना दुर्लक्षित करण्यात आले आहे. यासह मुंबईतील एका खासगी आस्थापनाने नोकरीसाठी दिलेल्या विज्ञापनातून ‘केवळ गुजराती आणि मारवाडी उमेदवारांनी अर्ज करावेत, मराठी उमेदवार नको’, अशी अट घातली आहे.
४. निष्कर्ष
‘इंग्रजी भाषेमुळे स्वतःचे भवितव्य उज्ज्वल आहे’, असे मानणारा विद्यार्थी वर्ग जर ती भाषा योग्यरित्या अवगत करू शकला नाही, तर त्याचे भवितव्य अंधकारमय होईल आणि मराठी भाषेकडे पाठ फिरवल्याने एकाही भाषेवर प्रभुत्व मिळवता येणार नाही. पालक वर्गाने याविषयी विचार करणे आवश्यक आहे. एकूण महाराष्ट्र राज्यात मराठी भाषिक पालक वर्ग, शिक्षण संस्था, विविध सांस्कृतिक मंडळे, सूज्ञ विचारवंत इत्यादींनी एकत्र येऊन मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी योगदान देणे अत्यंत आवश्यक आहे, तसेच या निर्माण झालेल्या ‘अनाकलनीय स्थिती’च्या भ्रमातून वेळीच बाहेर येऊन ठोस कृती करणे आवश्यक आहे.’
– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१२.६.२०२६)
थिरूवनंतपूरम् येथील भाजप नगरसेवकांच्या शपथविधीविषयी केरळ उच्च न्यायालयाची भूमिका !
स्वामी विवेकानंद यांचे विचार दूरदर्शी !
हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !
जीवनातील सकारात्मकता आणि जीवनाचे खरे कार्य !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘मुलगा विदेशात असणे’, ही अभिमानाची नाही, तर अत्यंत दुःखाची गोष्ट आहे’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण आणि महत्त्व !