हरवलेल्या श्रद्धेचा हिंदुत्ववाद !

तो मला भेटतो, नेहमीच. कपाळावर भगवा टिळा, गळ्यात रुद्राक्ष, टी शर्टवर ‘Proud Hindu’. तोंडात ‘जय श्रीराम’ची घोषणा आणि हातात भ्रमणभाष, ज्यावर तो दुसर्‍या धर्माच्या आई-बहिणीवरून शिव्या देत हसत लिखाण करत होता. मी विचारले, ‘रामाची उपासना करतो ?’ तो हसला, ‘उपासना ?, ती कमकुवत माणसांची कामे. आम्ही हिंदुत्वासाठी लढतो. धर्म वगैरे थोतांड आहे.’ मी स्तब्ध झालो. तो ‘नास्तिक हिंदुत्ववादी’ होता. तो माझाच आहे, मला परका नाही, हे निश्चित. आजकाल अनेक ठिकाणी गल्लीत, वडापावच्या गाडीवर, विमानातील प्रवासात, तारांकित हॉटेलमध्ये, असा कुठेही सापडतो. त्याला देव नको, साधना नको, आत्म्याचा थरकाप नको. त्याला हवे आहे केवळ एक प्रमाणपत्र, ‘मी कडवा हिंदुत्ववादी !’

१. नवहिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीकोनातून हिंदु धर्म आणि देवता

हा माणूस एकीकडे ‘हिंदु असण्याचा’ गर्व मिरवतो आणि दुसरीकडे मनात भीती बाळगतो, ‘देव खरे कसे असतील ?, धर्म पाळला, तर माझे काही खरे नाही.’ (नास्तिकापेक्षा नास्तिक हिंदुत्ववादी कधीही चांगला; पण त्यापुढे काय ?) हा दुभंगलेला माणूस आहे. दुभंगलेली माणसे घर उद्ध्वस्त करतात, समाज पोखरतात. ती धर्म कसे टिकवतील ?

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

हिंदु धर्म काय आहे हो ? रामाचे नाव घेतले की, डोळे पाणावणे. कृष्णाची बासरी ऐकली की, काळजात वेगळीच लहर उठणे. शिवाचे स्मरण केले की, वैराग्याचा स्पर्श होणे किंवा हे सर्व अथवा यातील काहीतरी आपल्याला कधीतरी अनुभवायला मिळावे, असे वाटणे, हा धर्माचा भाग नसेल का ? हिंदु देवता, म्हणजे केवळ प्रतीक किंवा नावे नाहीत. ती जिवंत अस्तित्व आहेत, त्यांची उपासना ही जगण्याची कारणे आहेत. धर्म ही परमात्मा अनुभूती घेण्याची प्रक्रिया आहे; पण त्या नवहिंदुत्ववाद्यासाठी राम म्हणजे काय ? फलकावरचे चित्र, धनुष्य ताणून असलेला, हॉलीवूडच्या अभिनेत्याचे भारतीय ‘व्हर्जन’ (रूप) ? निवडणुकीचे हत्यार ?

शबरीची ती बोरं नव्हती, ओतप्रोत भरलेली भक्ती होती, हे त्यांना पटत नाही. तो राम आपल्याही घरी येऊ शकतो, हे त्यांना वाटूच शकत नाही. त्यांच्या दृष्टीने तो केवळ एक सांस्कृतिक प्रतीक आहे. त्याचा राम ‘मर्यादापुरुषोत्तम’ नाही, ‘मतांचा हिशोब’ आहे. मंदिर ? आता ते ‘आत्मशुद्धीचे ठिकाण’ नाही. ते ‘व्होट बँकेचे कलेक्शन सेंटर’ (मतपेटी केंद्र) झाले आहे. म्हणूनच तिथे दानपेट्या लुटल्या जातात; कारण देवावर विश्वास नाही, केवळ देवाच्या नावावरच्या धंद्यावर विश्वास आहे. ज्या दिवशी माणसाच्या काळजातील श्रद्धा मरते, त्या दिवशी मंदिरातील देव खरोखर दगड होतो ?

२. नास्तिक हिंदुत्वाची परिणती

‘धर्म म्हणजे फॅशन नाही रे, बाबा. तो श्वास आहे’, याला कसे सांगू. हा मला सांगतो, ‘हिंदुत्व म्हणजे लाईफस्टाईल (जीवनपद्धत) आहे, खाणे-पिणे, सण-वार.’ मी विचारतो, मग तुझी लाईफस्टाईल उद्या पालटली, तर तू हिंदु रहाणार नाहीस का ?’ तो गप्प बसतो. संस्कृती पालटते. ‘फॅशन’ (नवरूढी) पालटते. सणांचे ‘इव्हेंट’ (कार्यक्रम) होतात; पण ‘धर्म’ ? तो त्रिकालाबाधित असतो. तो मोक्ष, कर्म, पुनर्जन्म आणि ईश्वरी न्याय आहे. हे काढले की, हिंदुत्व म्हणजे उरते काय ? बिर्याणी विरुद्ध पुलाव ? एवढेच मिटवायला शत्रूला कितीसा वेळ लागणार ? ‘ईश्वर बघत आहे, तो आहे’, ही श्रद्धा माणसाला सावरते, आवरते, लढाईला बळ देते आणि किरकोळ माणसातून अजेय योद्धे घडवते. ती जाणीव गेली की, ‘मला कोण विचारणार ?’, ही मस्ती येते. मग तोच ‘जय श्रीराम’वाला माणूस संध्याकाळी कार्यालयात धारिका अडवून पैसे खातो; कारण त्याचा राम ‘सत्तेचा लोगो’ (बोधचिन्ह) आहे, ‘मनातील दिवा’ नाही. अयोध्येत मंदिर उभे रहाते आणि त्याच्याच ट्रस्टमध्ये घोटाळा होतो, हा विरोधाभास नाही, तर ही नास्तिक हिंदुत्वाची परिणती आहे.

३. आक्रमण होतात, ती संस्कृती आणि धर्म यांवर !

‘ईशावास्योपनिषद’ म्हणते, ‘ईशावास्यमिदं सर्वं’, म्हणजेच कणाकणांमध्ये देव आहे.’ हा देव नाकारला की, माणूस देवत्वापर्यंत जाण्याचा मार्ग विसरतो, मग प्रवास कोणत्या दिशेचा राहील ? निष्ठा नसेल, तर तलवारीला गंज चढतो. तो म्हणतो, ‘आम्ही कल्चरल (सांस्कृतिक) आहोत, बास.’ अरे, इतिहासाची पाने चाळ. इतर पंथांची आक्रमणे केवळ ‘डान्स आणि ड्रेस’ यांवर होत नाहीत. ती गिधाडे तुमच्या केवळ संस्कृतीवर आक्रमण करत नाहीत, ती धर्मावर होतात, पोटावर होतात आणि संख्येवर होतात. ज्या जमातींनी स्वतःची आध्यात्मिक मुळे उपटून टाकली, त्या शत्रूच्या तोफांच्या वारात टिकल्याच नाहीत. लढायला हात तलवार लागते; पण काळजात निष्ठा लागते. ती नास्तिकतेच्या दुकानात मिळत नाही. युरोप बघ. विज्ञानात माहीर (तज्ञ) झाला; पण ‘गॉड इज डेड’ (देव मेला), असे म्हणत चर्चला कुलूप लावले.

४. हिंदुत्ववाद किंवा हिंदूंची श्रद्धा का टिकली ?

आज पैसा आहे; पण आत्मा मेला. म्हणूनच चर्च विकली जातात आणि त्याच चौकात मशिदींचे भोंगे घुमतात. मग सहस्रो वर्षांच्या माराखाली भारत कसा टिकला ? कारण इथल्या माणसाच्या हाडामांसात श्रद्धा भिनली होती.

अ. हरिहर आणि बुक्क : यांना बळजोरीने बाटवले. मुसलमान झाले; पण विद्यारण्य स्वामींनी काळजातील वात पेटवली. ते इस्लाम त्यागत पुन्हा हिंदु झाले. श्रद्धाळूच ना ? श्रद्धा नसती, तर युद्ध आवश्यक कुठे होते ? भोग तर अपरिमित मिळाले असते, विजयनगर उभे राहिले. ही सत्तेची लढाई नव्हती. ही श्रद्धेची आग होती.

आ. छत्रपती शिवाजी महाराज : वयाच्या १६ व्या वर्षी स्वतःच्या रक्ताने रायरेश्वरच्या शंभू महादेवाला अभिषेक केला. हे राज्य श्रींच्या इच्छेने. आगर्‍याला गेले, औरंग्याला पाठ दाखवण्याचे धाडस, त्याच्याच दरबारात जाऊन त्याचाच अपमान करण्याचे धाडस कुठून आले असेल ? एक कोवळा तरुण त्या शक्तीशाली अफझलखानासमोर उभा राहिला, कशाच्या जोरावर ? जगदंबेच्या निष्ठेवर.

(‘शिवाजी कोण होता ?’, हे पुस्तक लिहिणारे आज नेमके हेच पुसत आहेत ? छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ (निधर्मी) केले की, पोरांना नास्तिक करायला सोपे जाते. उरला सुरला हिंदुत्ववाद नंतर पुसायला किती वेळ लागतो ?) ‘राजे पालटले, मंदिरे पाडली, तरी आमचा देव आम्ही सोडणार नाही’, या हट्टानेच हिंदु जिवंत राहिला. नास्तिक हिंदुत्ववाद हा हट्ट आणि हा कणा मोडतो.

५. आजच्या नास्तिक नवहिंदुत्ववाद्यांची स्थिती

आज काय दिसते ? तो ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमावर ‘महाकाल भक्त’ लिहितो; पण ‘महाकाल, म्हणजे स्मशानातील वैराग्य’, हे ठाऊक आहे का त्याला ? तो ‘रिल’ (छोटी ध्वनीचित्रफीत) करतो. शिव्या देतो. सणाला ‘डीजे’ (आधुनिक ध्वनीक्षेपक) लावतो. गर्दी जमवतो; पण डोळे मिटून २ मिनिटे ‘शिव’ म्हणतो का ? नाही; कारण त्याला देवाशी देणे-घेणे नाही, देवाच्या नावावरच्या दंगलीशी आहे. तो ‘जय श्रीराम’ ओरडतो; पण ओरडतांना डोळ्यासमोर सीतेचा त्याग केलेला, भरतासाठी राज्य सोडलेला राम असतो का ? रावणाला मारूनसुद्धा त्याचा मान योग्य तो ठेवणारा राम मनात असतो कि केवळ समोरच्याची कॉलर (गळपट्टी) पकडायची स्फूर्ती असते ? घोषणा हवी, हवीच. त्वेष हवा, हवा म्हणजे हवाच; पण तो भक्तीसह हवा. गर्दी हवी, हवी म्हणजे हवीच; पण कळप हवा जनावरांसारखा ? कि ती गर्दी हवी ? छत्रपती शिवरायांना पालखीतून घेऊन पन्हाळ्यावरून त्या काळ्या रात्री कसलीच पर्वा न करता पळणारी ? खिंडीत शत्रूला अंगावर घेणारी ? कि ती गर्दी हवी ? वारीतील ? जिथे केवळ माऊली (संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज), तुकया (जगद्गुरु संत तुकाराम महाराज) आणि विठ्ठल असतो, दोन्हीकडे माणसांचे अहं विरलेले असतात. उरलेली असते श्रद्धा, ध्येयातून येणारी किंवा ध्येये असतात श्रद्धेतून आलेली. हातात तलवारी असोत कि टाळ ? मनात देव हवा, त्याची उपासना हवी. मग ती ध्यानाने वा ज्ञान मार्गाने करा. त्याला कसे सांगू ?

६. देवाला काळजात बसवून श्रद्धेने प्रयत्न करावेत !

औरंगजेबाने तलवार चालवली, मॅक्समुलरने अक्कल. पिढ्यान्‌पिढ्या श्रद्धा हालवायचे प्रयत्न झाले, होत आहेत, होत रहातील. श्रद्धा थोडी डगमगली; पण मेली नाही. असे असले, तरी आता आपणच तिचा गळा घोटला तर ? परत फिरूया का त्या पाऊलखुणांकडे… जिथे राम वनवासात हसला. जिथे कृष्णाने युद्धाच्या आधी गीता सांगितली, त्याने सर्व सार सांगितले (पण ‘युद्धच’ सांगितले.), जिथे छत्रपती शिवरायांनी भवानीदेवीला साकडे घातले तिथे. नाही तर उद्याचा इतिहासकार लिहील… ते हिंदु होते; पण इतरांचे ऐकून ‘हिंदु’पण विसरले. त्यांनी रामाचे मंदिर बांधले; पण त्यातील राम ते हरवून बसले.

‘देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलुख बडवावा की बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ।। (अर्थ : धर्मरक्षणासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी देवाला श्रेष्ठ मानून त्याचा जयजयकार करावा अन् संपूर्ण प्रांत पिंजून काढावा.)’ देव मस्तकी धरूया का ? देवाला काळजात रहायला आमंत्रण देऊया का ?

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (२८.६.२०२६)

संपादकीय भूमिका

आजच्या नास्तिक नवहिंदुत्ववाद्यांना धर्म आणि संस्कृती यांविषयी काही देणे-घेणे नाही, हे जाणा आणि साधना करा !